अजेय संस्थेचा ‘काव्ययोग’ सोहळा दु. ३ ते रा. ८:३० या वेळेत मराठी ग्रंथ संग्रहालय स्टेशन रोड येथे पार पडला. याच सोहळ्याचा आढावा घेणारा हा लेख तुमच्यासमोर सादर आहे.
प्रमुख पाहुण्या म्हणून आम्ही सिद्ध लेखिका अध्यक्षा प्रा. पद्मा हुशिंग आणि काव्यवयोग म.पां.भावे स्मृती पुरस्कार अंतिमफेरी साठी परीक्षक म्हणून कवी विकास भावे आणि कवी रामदास खरे उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन साधना पाटील यांनी केलं असून प्रास्ताविक डॉ. क्षितिज कुलकर्णी यांनी केले. झपुर्झा नाट्य चळवळीचा प्रवास, त्यातली स्वतःची भूमिका, झपुर्झा २०२२ विषयी, म.पां.भावे स्मृती पुरस्कार आणि काव्ययोगचे महत्व आशा मुद्द्यांविषयी प्रास्ताविकात स्पष्टता दिली. अभिनेत्याला एक दृष्टी असावी, हे vision तयार करण्याचं काम गेली दहा वर्षे अजेय संस्था आपल्या परीने करत आली आहे. ठाण्यामध्ये झपुर्झा नाट्य चळवळ सुरू करताना, तरुणांच्या आयुष्यातील एक विषय घेऊन त्याला सामाजिक दृष्टीतून पाहुन त्यावर नाटक लिहून त्याचा प्रयोग करणं असा सुरुवातीचा विचार होता जो पुढे विस्तारत गेला, असं डॉ.क्षितिज कुलकर्णी म्हणाले.
दशक कवींपैकी उपस्थित राजीव जोशी यांनी उपस्थित दशक कवींचे प्रतिनिधी म्हणून संवाद साधला, त्यात, काव्ययोग ही एक महत्वाची घटना आहे. आज अनेकांनी, तरुण पिढीने कवितांचा अभ्यास करून निवेदन सादर केले, त्यामुळे, डॉ. क्षितिज कुलकर्णी ह्यांची काव्ययोग ही संकल्पना विशेष महत्वाची आहे असं म्हणाले. प्रमुख पाहुण्या प्रा. पद्मा हुशिंग यांनी ह्या उपक्रमाचे अभिनंदन करत विशेष नमूद करत संस्कृतातील काव्याचा उगम ते बदलत्या काळानुसार बदलत गेलेली कविता, ते आजची कविता असा अभ्यासपूर्ण प्रवास मांडला.
म.पां.भावे स्मृती पुरस्कार निकालाच्या वेळेस परीक्षक रामदास खरे यांनी पाच टिप्स स्पर्धकांना सांगितल्या.
१. स्वतःच्या कविता लिहिल्यानंतर अनेकदा वाचून बघा.
२. दुसऱ्यांच्या कविता जास्त वाचा, facebook च्या likes च्या मागे लागू नका.
३. शब्दांच्या बाबतीत कंजूसी करा.
४. कवितेला कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं.
५. प्रसिद्धीच्या मागे धावू नका, त्यासाठी कविता करू नका.
‘झपुर्झा २०२२ दशक महोत्सव‘ मध्ये सादर होणाऱ्या काही नाटकातल्या झलक या सोहळ्यात सादर झाल्या. गौरव संभूस, समीर शिर्के, कार्तिक हजारे, आकाश जाधव, अवधूत यरगोळे, हृषीकेश ताम्हनकर, राजस वैद्य, वेदिका नरवणे, प्रथमा कुळकर्णी ह्या कलाकारांनी प्रेक्षकांना झपुर्झा नाटकातले काही प्रसंग सादर करून दाखवले.
दशकातील विशेष १० कवी राजीव जोशी, आदित्य दवणे, गीतेश शिंदे, प्रथमेश पाठक, सतीश सोळंकुरकर, प्रतिभा सराफ, संजय चौधरी, छाया कोरेगावकर, सुजाता राऊत, मंदाकिनी पाटील, प्रिया धारूरकर ह्या कवींच्या कवितांचा रसास्वाद डॉ.क्षितिज कुलकर्णी, विदुला खेडकर, मुग्धा फाटक, हेमांगी कुळकर्णी संभूस, अपर्णा संत, नलिनी पुजारी, पुष्पांजली कर्वे, अस्मिता चौधरी, निलजा जायदे, अवधूत यरगोळे यांनी निवेदनातून सादर केला. राजीव जोशी, प्रथमेश पाठक, गीतेश शिंदे, आदित्य दवणे, सुजाता राऊत, प्रतिभा सराफ, छाया कोरेगावकर, हे कवी कार्यक्रमाला हजर होते.
म.पां.भावे स्मृती पुरस्कार अंतिम फेरीसाठी १० कवींची निवड करण्यात आली होती.
मंजिरी पाटील, किरण बरडे, मधुरा कर्वे, नीलिमा टिल्लू, पुष्पांजली कर्वे, शुभा खांबेकर पाणसरे, सुमन आव्हाड, रवींद्र शेणोलीकर, राधा गर्दे, वर्षा जोशी
विशेष काव्य – शुभदा पाटकर, मीना घोडविंदे, अश्विनी चौधरी
काव्ययोग मध्ये पार पडलेल्या अंतिम फेरीत परीक्षक कवी विकास भावे आणि कवी रामदास खरे यांनी निकाल जाहिर केला.
प्रथम पारितोषिक — सौ. पुष्पांजली कर्वे
द्वितीय पारितोषिक — सौ.मंजिरी पाटील
तृतीय पारितोषिक — सौ. राधा गर्दे
या संपूर्ण सोहळ्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. झपुर्झा चा दुसरा दिवस ‘झपुर्झायन’ अर्थात एक दिवसीय नाट्यसंमेलन ऑगस्टमध्ये होत आहे.