गिरीश कुलकर्णी यांचं ‘होल बॉडी मसाज’ लवकरच रंगभूमीवर!
नजीकच्या काळात बरीच प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकं प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. या नाटकांच्या मांदियाळीत एक नाटक सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ते नाटक म्हणजे महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे ‘होल बॉडी मसाज’ हे नाटक! ९ डिसेंबर रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर होणार आहे.
‘बाई, मसाज म्हंजे बोटांचे डोळे करायचे आनि पेशंटच्या बॉडीमधील दुःख शोधायचं!’ अशा टॅगलाईनसोबत नाटकाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहे.
विजय शिंदे नामक एक दारुडा इसम. पण त्याच्या बोटांमध्ये अशी काही जादू असते की त्याच्या मालीशने दुर्धर शारीरिक दुखणी बरी होत असतात. ‘ओल्ड गव्हर्नमेंट मेडिकल स्कूल’मधील शारिरिक शास्त्र विभागात तो काम करत असतो. तो मृतदेह कलात्मकतेने जतन करत असतो आणि भावुकपणे शव विच्छेदनही करत असतो. त्याला अचानक एके दिवशी समीर आलेल्या लिली नामक मुलीच्या मृतदेहाशी प्रेम जडते. तो शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने हरप्रकारे सलग तीन वर्षे या मृतदेहाची काळजी घेतो. परंतु, मेडिकल स्कूलमध्ये अभ्यास आणि संशोधनासाठी मृतदेह कमी पडू लागल्यामुळे एक अशी वेळ येते जेव्हा लिलीचा मृतदेह त्याच्यापासून दूर जाणार असल्याचे त्याला समजते. हे वास्तव तो सहन करू शकत नाही. तो लिलीला अशा ठिकाणी पळवून न्यायचं ठरवतो जिथे कोणीही त्यांचा एकांत भंग करू शकत नाही. विजय लिलीसोबत कायमस्वरूपी एकरूप होण्याची स्वप्नं बघू लागतो. त्याला हे करण्यामध्ये यश मिळेल का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला या नाटकाला भेट द्यावीच लागेल.
डॉ. हर्षवर्धन श्रोत्री लिखित ‘होल बॉडी मसाज’ या नाटकाचे दिग्दर्शन किरण यज्ञोपवीत यांनी केले आहे. गिरीश कुलकर्णी आणि श्रीकांत यादव यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका असणार आहेत. नाटकाच्या टीममधील ही तगडी नावं बघता आपण या नाटकाच्या दर्जाबद्दल अंदाज बांधूच शकतो.
रंगभूमी.com कडून ‘होल बॉडी मसाज’ नाटकाच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा!