‘इडियट बॉक्स’ पासून आपल्या मुलांना कसं काय दूर ठेवावं?, हे सद्याच्या काळात पालकांसमोर उभं ठाकलेलं एक मोठ्ठं आव्हान! दर्जेदार पुस्तकांचं वाचन किंवा मैदानी खेळांसोबतच ‘बालनाट्य’ हाही दूरदर्शन पासून आपल्या पाल्ल्यांना दूर ठेवण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. अधिकाधिक दमदार बालनाट्य येत्या काळात प्रदर्शित होणार आहेत ही आणखी एक जमेची बाजू! त्यापैकीच एक उत्कृष्ट समूहात येऊ घातलेलं नाटक म्हणजे ‘आज्जीबाई जोरात’!
जिगीषा-अष्टविनायक च्या ‘आज्जीबाई जोरात’ या AI महाबालनाट्याची घोषणा झाली आणि त्याविषयी रसिकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली. नाटकातील एकेका पात्राचं नाव दर दिवशी समोर येत असताना नाटकातील मुख्य पात्र, अर्थात, नाटकातील आजी कोण साकारणार याबद्दलची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. नाटकात ‘आज्जीबाई’ कोण साकारणार हे गुपित आता उलगडलं आहे. अभिनेत्री निर्मिती सावंत या नाटकाच्या ‘आज्जीबाई’ आहेत.
Nirmiti Sawant in Aajjibai Jorat
या नाटकाच्या निमित्तानं त्या पहिल्यांदाच बालनाट्यात काम करणार आहेत. बच्चेकंपनीसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत कार्टून्स, बडबडगीतं यांच्यासह मनोरंजनाचं नव माध्यम उपलब्ध व्हावं म्हणून लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन ‘आजीबाई जोरात’ हे नवं कोरं बालनाट्य रंगभूमीवर घेऊन येत आहेत. नाटकाच्या प्रेक्षकांची नवी पिढी निर्माण व्हावी, हाही या नाटकामागचा हेतू आहे.
नव्या नाटकाविषयी निर्मिती सांगतात, “अनेक वर्षांपासून मला बालनाट्य करण्याची इच्छा होती. पुन्हा एकदा माझ्या भूमिकांवर प्रेम करणारा प्रेक्षकवर्ग मला निर्माण करायचा होता. २४ वर्षांपूवी ‘जाऊबाई जोरात’ किंवा नव्या बालनाट्याविषयीचा एक योगायोग निर्मिती सावंत यांनी सांगितला. ३० एप्रिल २००० या दिवशी ‘जाऊबाई जोरात’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आलं होतं. आता ३० एप्रिल याच दिवशी ‘आज्जीबाई जोरात’ चा पहिला प्रयोग होणार आहे. हा खूप छान योगायोग आहे. नाच, गाणी, एआयचा वापर, धमाल, गुणी कलाकार या साऱ्यामुळे आमचं बालनाट्यही बालप्रेक्षक तयार करणार आहे. ती इच्छा ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाच्या निमित्तानं पूर्ण होतेय. या नाटकातील माझी व्यक्तिरेखा लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी आहे. घरात सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी ‘आजी’ची भूमिका मी साकारतेय.”
Nirmiti Sawant’s Exclusive First Look Reveal from Aajjibai Jorat Marathi Natak
निर्मिती यांचं रंगभूमीशी जुनं नातं आहे. इतर माध्यमांमध्ये त्या अभिनय करत असल्या तरी त्यांची नाटकाशी नाळ जुळलेली आहे.
“मी इतर ठिकाणी कितीही कामं केलं तरी माझं नाटकात काम करणं सुरू राहील. प्रेक्षक कधीतरी प्रत्यक्ष भेटून विशिष्ट चित्रपटातील भूमिका आवडली हे आवर्जून सांगतात. पण नाटक पाहिल्यानंतर लगेच त्याविषयी, आमच्या भूमिकांविषयी सांगतात; तेव्हा मिळणारा हा प्रतिसाद आनंद देणारा असतो”, असं त्यांनी सांगितलं.
“या नाटकात पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, मुग्धा गोडबोले, अभिनय बेर्डे अशी कलाकारांची फळी आहे. बालनाट्य करणं, लहान मुलांना हसवणं, त्यांना गुंतवूण ठेवणं हे आव्हानात्मक असतं. त्यामुळे आम्हा कलाकारांवर मोठी जबाबदारी आहे. मनोरंजनाची अनेक माध्यमं नव्या पिढीकडे आहेत; त्यामुळे रंगभूमीचा नवा प्रेक्षक घडवणं हे आव्हान असलं तरी ‘आज्जीबाई ‘जोरात’ हे नाटक तो प्रेक्षकवर्ग निर्माण करेल यावर माझा विश्वास आहे.”, असं निर्मिती सावंत यांनी सांगितलं.
हे नाटक लहान मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत य्य धमाल करण्यासाठी उत्तम पर्याय ठरणार आहे हे नक्की! हे बालनाट्य आणि अनेक बालनाट्य यथायोग्य वेळ काढून पालकांनी आपल्या पाल्यांना दाखवावीत हीच एक नम्र विनंती!