महाराष्ट्राला लोकसाहित्याचा एक मोठा वारसा लाभला आहे. त्यातीलच एक महत्त्वाचे नाव म्हणजे लोकशाहीर विठ्ठल उमप. आजवर १००० हून अधिक लोकगीते, अनेक कोळी गीते, भीम गीते त्यांनी रचली आणि गायली आहेत. त्यांच्या ‘जांभूळ आख्यान’ या गाजलेल्या नाटकाचे आजवर ५०० हून अधिक प्रयोग झाले आहेत. महाराष्ट्राला लाभलेल्या अशा थोर व्यक्तिमत्त्वाची यंदा १५ जुलै, २०२१ रोजी ९० वी जयंती आहे. त्यांच्या नावे सुरु असलेल्या ‘विठ्ठल उमप फाउंडेशन’ मार्फत आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबविले गेले आहेत. यंदा त्यांचे पुत्र श्री. नंदेश उमप यांनी त्यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर ह्या संस्थेमार्फत ‘स्वरविठ्ठल नादविठ्ठल’ नावे शाहीरांनी रचलेल्या व गायलेल्या लोकगीतांची ‘ऑनलाईन गीतगायन स्पर्धा’ आयोजित केली आहे.
स्पर्धकांनी ५ ते ८ मिनिटांचे सादरीकरण व्हिडीओ स्वरूपात रेकॉर्ड करून Nandesh Umap (SwarVitthal Naad Vitthal) ह्या Facebook पेजवर दिनांक १० जुलै, २०२१ पर्यंत अपलोड करायचे आहेत. ह्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संगीतकार राहुल रानडे आणि गायक व संगीतकार प्रवीण कुवर जबाबदारी सांभाळणार आहेत. शाहीर विठ्ठल उमप यांची अनेक गीते स्पर्धकांसाठी www.nandeshumap.com ह्या वेबसाईटवर तसेच यु ट्यूबवर उपलब्ध आहेत.
लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या यावर्षीच्या जयंतीला त्यांना सांगितिक मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोककलाकारांनी आवर्जून ह्या स्पर्धेत भाग घ्यावा.