नाट्य, मालिका व सिनेसृष्टीतील तब्बल चाळीस वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये अभिनेता, नाट्य निर्माता आणि दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा बहुगुणी कलाकार म्हणजे विनय आपटे. ७ डिसेंबर, २०१३ रोजी हा गुणी कलाकाराचे दुःखद निधन झाले. १७ जून रोजी विनय आपटे यांची जयंती आहे. हेच औचित्य साधून १७ जून, २०२१ रोजी ‘विनय आपटे प्रतिष्ठान’तर्फे एक ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विजय केंकरे, संजय जाधव, सतीश राजवाडे, सुलेखा तळवलकर, नितीन वैद्य, भरत दाभोळकर अशा दिग्गज कलाकार मंडळींचा या परिसंवादात सहभाग असणार आहे. तसेच, अजित भुरे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत. प्रेक्षकांना ‘विनय आपटे प्रतिष्ठान’ च्या फेसबूक पेजवर १७ जून, २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम लाईव्ह बघता येणार आहे.
‘विनय आपटे प्रतिष्ठान’चे सर्व काम विनय आपटे यांच्या पत्नी श्रीमती वैजयंती आपटे सांभाळतात. त्यांनी रंगभूमी.com च्या टीमशी बोलताना सांगितले की, विनय आपटे यांच्या जयंतीला दरवर्षी आम्ही नाट्यगृहात एकांकिका अथवा नाटकाचे प्रयोग ठेवतो. परंतु, यावर्षी नाट्यगृह बंद असल्यामुळे आणि सर्वांनी आपापल्या घरी राहणेच हिताचे असल्यामुळे आम्ही ऑनलाईन माध्यमातून हा परिसंवाद आयोजिण्याचे ठरविले. या परिसंवादामध्ये कोरोनानंतरची नाट्यसृष्टी व सिनेसृष्टी कशी असेल? तसेच या मनोरंजन माध्यमांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागेल आणि त्यातूनही बेरोजगार झालेल्या नाट्यसृष्टीतील मंडळींसाठी करिअरच्या कोणत्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील, अशा बऱ्याच विषयांवर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विनय आपटे या आपल्या लाडक्या रंगकर्मीने जिवंतपणी त्यांच्या सशक्त अभिनयाद्वारे आपल्याला भरभरून दिले आणि आजही ‘विनय आपटे प्रतिष्ठान’ संस्थेच्या रूपातून ते आपल्यासाठी खंबीरपणे कार्यरत आहेत असं म्हणायला हरकत नाही. अर्थात, या सगळ्याचं श्रेय त्यांच्या अर्धांगिनी श्रीमती वैजयंती आपटे यांना जातं. तरीही, आपण सर्वांनी या परिसंवादाचा भाग होणे म्हणजे त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळवून देणे असेल हे विसरून चालणार नाही.