ज्येष्ठ अभिनेते श्री. विक्रम गोखले यांनीही गरजू रंगकर्मींना मदत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी नाणे गावातील पौड जवळील स्वमालकीचा एक एकराचा प्लॉट महामंडळाच्या नावाने करून द्यायचा ठरवला आहे. आज त्याची बाजारभावानुसार किंमत ही २.५ कोटी रुपयांपेक्षा कमी नाही. या ठिकाणी महामंडळाने ज्येष्ठ व एकटे राहणाऱ्या कलावंताना आसरा आणि सहारा मिळावा म्हणून ज्येष्ठ कलावंतासाठी मोफत राहण्याची सोय करण्साठी सदर जागा विक्रम गोखले अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान करून महामंडळाच्या नावाने करून देण्याची घोषणा केली आहे.
ज्येष्ठ अभिनेते माननीय श्री. चंद्रकांत गोखले म्हणजेच श्री. विक्रम गोखले यांचे वडील स्वत:च्या कमाईतून काही पैसे भारतीय सैन्यदलाला दान करत असत. असाच मौल्यवान दानधर्माचा वारसा पुढे चालवत त्यांचे सुपुत्र श्री. विक्रम गोखले आजच्या या कोरोनारूपी आपत्तीच्या भोवऱ्यात हतबल झालेल्या गरजू कलाकारांसाठी ही श्रेष्ठ कामगिरी पार पाडत आहेत. इतकंच नव्हे तर त्यांनी बॉलीवूडच्या रंगकर्मीनाही नाट्यरंगकर्मीच्या पदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. रंगभूमी.com च्या संपूर्ण टीमकडून आम्ही तुमच्या या प्रयत्नांना यश मिळो ही प्रार्थना करतो आणि तमाम रसिकवर्गाला रंगकर्मींच्या मदतीसाठी उभे राहण्याचे आवाहन करतो.