रंगभूमीने आजवर कोणताही मतभेद न करता प्रामाणिक काम करणाऱ्यांना उंची गाठण्यास मदत केली आहे. अशाच एका संस्थेने सातत्याने रंगमंचाची सेवा करत पुन्हा एका नव्या नाटकाची निर्मिती केली. १७ आणि १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता आसक्त कलामंच, पुणे प्रस्तूत करत आहे दिनकर दाभाडे यांच्या कादंबरीवर आधारित ‘व्हाया सावरगाव खुर्द’.
व्हाया सावरगाव खुर्द (Via Savargaon Khurd)
नाटकाला ग्रामपंचयातीच्या निवडणूकीची पार्श्वभूमी आहे. दोन राजकीय गटातील सत्ता संघर्ष नाटकाचा केंद्रबिंदू आहे. ग्रामपंचयातीच्या निवडणूका या एका विषयावर सगळी पात्र एकमेकांशी बांधली गेली आहेत. ‘व्हाया सावरगाव खुर्द’ ह्या कादंबरीतील १९ स्वगतांचा हा एक कोलाज आहे. पात्रांच्या मनसोक्त आणि बेधडक बोलण्यातून नाटकाचं कथानक पुढे पुढे सरकत जाते.
नाटकाला ढोबळ अशी काही एक गोष्ट नाही. नाटकातील पात्रांच्या आत्मकथनात्मक निवेदनातून नाटकाची गोष्ट उलगडत जाते. आपल्याला गावातल्या राजकारणाची, सामाजिक परिस्थितीची, माणसांमधल्या लैंगिक नातेसंबधाची, एकमेकांविषयी असलेल्या द्वेषपूर्ण भावनेची, त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेची कौटुंबिक कलहाची ओळख होत राहते.
काही काळापूर्वी पर्यंत गावे ही गावासारखी होती. अजूनही काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला गावाच्या गावपणाची ओळख करून देतात. पण गावेसुध्दा आता बदलायला लागली आहेत. गावातल्या लोकांच्या महत्वाकांक्षा प्रचंड वाढल्या आहेत. गावात शहर आणि शहरात गाव घुसण्याची ही प्रक्रिया अटळ आहे.
व्हाया सावरगाव खुर्द नाटकातील पात्रांच्या बोलण्यातून, वागण्यातून, वृत्तीतून संपूर्ण गावाचे चरित्रच आपल्यासमोर उभे रहाते.
या नाटकाच्या कल्पनेबद्दल आणि मांडणीबद्दल दिग्दर्शक त्यांचा दृष्टीकोन मांडत म्हणाले “मी जेव्हा पहिल्यांदा ही कादंबरी वाचली तेव्हा यामधील स्वतःशी बोलताना थेट प्रेक्षकांशी संवाद साधणारी पात्र मला प्रचंड आकर्षक वाटली. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राजकारण. ग्रामीण पातळीवर सुध्दा सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारी माणसे आहेत. त्यांच्या बोलण्याने बोलणे हा मनातल्या-डोक्यातल्या कोलाहलाचा निचरा करण्याचा एक मार्ग आहे की काय असे वाटत रहाते. नाटकाला ठोस गोष्ट किंवा घटनांची शृंखला नाही त्यामुळे नाटकाचा प्रवाह सापडणे आव्हानात्मक होते. पण पात्रांच्या मनात सुरू असलेल्या भावनिक गदारोळाला असलेली गतीच कथानक पुढे नेण्यास मदत करत होती. नाटकाला गावातल्या निवडणूकीची पार्श्वभूमी असली तरी नाटकाचे कथानक पात्रांच्या वैयक्तिक पातळीवर सुरू असलेल्या संघर्षाचा ठाव घेत राहते. हा वैयक्तिक संघर्ष देखील टोकाचा आहे.”
लेखक: दिनकर दाभाडे
समकालीन मराठी साहित्यातील दिनकर दाभाडे हे एक महत्त्वाचं नाव आहे. भटकंतीत आलेल्या अनुभवावर त्यांनी ‘गयपातं’ नावाची कादंबरी लिहिली. तिला मुंबईच्या आप्पासाहेब रणपिसे बौद्ध साहित्य संशोधन केंद्राचा ‘कृष्णराव भालेकर पुरस्कार’ मिळाला आहे. त्याआधी विदर्भाचा रॉबीनहुड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्यामा कोलाम या आदिवासी नायकाच्या खडतर जीवनावर बेतलेली त्याची ‘विलामत’ ही कादंबरी मुंबईच्या ग्रंथाली या नामवंत प्रकाशन संस्थेने सन १९९४ साली प्रकाशित केली. ‘पायरव’ आणि ‘पदरव’ हे त्यांचे २ कवितासंग्रह देखील प्रकाशित झाले आहेत.
त्यांच्या शेवटच्या दिवसांत दिनकर दाभाडे सामान्य कार्यकर्त्याचे जीवन जगले. सततची कामे करताना सभोवती पसरलेले वास्तव ते दृष्टीआड करू शकत नव्हते. या सगळ्या घटितांच्या आरपार जाणारी शोधक दृष्टी त्यांच्यातील लेखकाजवळ होती. त्यावृत्तीतून गाव पातळीवरील बदललेल्या राजकारणाचे वेधक तेवढेच भेदक चित्रण त्यांनी ‘व्हाया सावरगाव खुर्द’ ह्या त्यांच्या कादंबरीतून केले आहे.
दिग्दर्शक: सुयोग देशपांडे
सुयोग देशपांडे आसक्त कलामंच ह्या नाट्यसंस्थेत मध्ये गेली ८ वर्षे दिग्दर्शक आणि निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम करत आहे. ‘व्हाया सावरगाव खुर्द’ हे त्याचे नवीन नाटक आहे. सुयोगने आसक्तच्या मोहित टाकळकर दिग्दर्शित ‘गजब कहानी’, ‘मॅथमॅजिशियन’, ‘चहेता’ ह्या नाटकांसाठी आणि ‘द कलर ऑफ लॉस’ ह्या वेब सादरीकरणासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
‘SEASON X | EPISODE Y’, ‘#Hashtag’, ‘ती आणि आपण’, आणि ‘तळ्यात मळ्यात’ ही त्याने स्वतः दिग्दर्शित केलेली नाटके आहेत. त्यापूर्वी ‘योगभ्रष्ट’, ‘बिगुल’, ‘होडी’, ‘दशानन’ ही एकलनाट्ये अभिनीत आणि दिग्दर्शित केली आहेत. ‘प्राईस टॅग, ‘द लास्ट ट्रूथ’, ‘बारासो छबीस बटा सात’ आणि ‘ओसरला रंग’ ह्या नाटकांमधून त्याने भूमिकाही केल्या आहेत. याशिवाय ‘स्वसाक्षांकित दस्ताऐवज’, ‘प्रिय बाई बारबियानाची शाळा’ आणि ‘मुक्कामपोस्ट सांस्कृतिक फट’ ही अभिवाचने दिग्दर्शित केली आहेत. ‘मीडियम स्पायसी’ आणि ‘ऑकेजनल रिफ्लेक्शन ऑन द कंन्टिन्जन्सीज् ऑफ लाईफ’ ह्या चित्रपटांसाठी तर ‘शांतीत क्रांति’ या वेब सिरिज साठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. सुयोग २०१९ – २०२० सालच्या ‘तेंडुलकर दुबे फेलोशिप’ चा मानकरी आहे.
आसक्त कलामंच, पुणे
आसक्तने आजवर चेहेता, गजब कहाणी, चारशे कोटी विसरभोळे अशा अनेक मराठी आणि हिंदी नाटकांची निर्मिती केली आहे. मुंबईतील नामांकित आणि प्रसिद्ध अशा पृथ्वी थिएटरमध्ये त्यांनी अनेक नाटकांचे प्रयोग केले. आसक्त संस्थेची स्थापना होऊन १९ वर्ष पूर्ण झाली. सागर देशमुख, मोहित टाकळकर, जितेंद्र जोशी, आशिष मेहता, प्रदीप वैद्य असे अनेक दिग्गज कलावंत या संस्थेशी जोडलेले आहेत आणि आता २ वर्षाच्या कालावधी नंतर पुन्हा आसक्त प्रायोगिक रंगभमीवर सज्ज झाली आहे.
‘व्हाया सावरगाव खुर्द’ मधील कलाकार
लेखक: दिनकर दाभाडे
दिग्दर्शक: सुयोग देशपांडे
निर्मिती: आसक्त कलामंच, पुणे
रंगमंचावर उपस्थित कलाकार: अभिषेक इंगोले, आनंद डांगरे, अतुल जैन, गिरीजा पातुरकर, इंद्रजीत मोपारी, मृणाल टोपले, मुक्ता कदम, रुपाली गोडंबे, स्वप्नील नवले
गाणी: अश्रुबा अंभोरे, गोविंद गायकी, अवंती लाटणकर
वेशभूषा: देविका काळे
प्रकाशयोजना: सचिन लेले, यश पोतनीस
नेपथ्य: रवी पाटील
निर्मिती व्यवस्थापक: अभिनव जेऊरकर
रंगमंच व्यवस्था: आयुष बाफना, संजय पालवे, तनिष्क शेलारे
सुलेखन: रमेश इंगळे उत्रादकर
पोस्टर डिझाइन: मुक्ता कदम, पायल पाटील
जाहिरात: कौस्तुभ हिंगणे
प्रसिध्दी छायाचित्रे: स्वप्निल पंडित
विशेष आभार: नुपूर दाभाडे पाटील, वीणा दाभाडे कराळे, हेमंत दिवटे, पेपरवॉल मीडिया आणि प्रकाशन, डॉ. पी.आर.राजपूत, रवींद्र इंगळे चावरेकर, स्नेहल नागदिवे, शुभांगी दामले
तालीम हॉल: इन्क्युबेटर, सुदर्शन रंगमंच, ज्योत्सना भोळे सभागृह
या नाटकासाठी फक्त १८ वर्षांवरील व्यक्तींना प्रवेश आहे. तिकीट बुकिंगसाठी ८०८७३७४५७७ या क्रमांकावर संपर्क करा.
आसक्त आणि संपूर्ण ‘व्हाया सावरगाव खुर्द’ टीमला रंगभूमी.com कडून शुभेच्छा.