झी मराठी वरील नावाजलेल्या मालिकांपैकी तरुणाईच्या विशेष पसंतीस उतरलेली एक मलिका म्हणजे ‘दिल दोस्ती दुनियादारी’! या मालिकेमधून सुव्रत जोशी आणि सखी गोखले ही जोडी अगदी घरघरात पोहोचली. मालिका संपल्यानंतर, २०१६ साली ‘अमर फोटो स्टुडिओ’ या सुपरहीट नाटकातून ही जोडी पुन्हा आपल्या भेटीस आली. २०१९ साली, विवाह बंधनात अडकून या दोघांनी प्रेक्षकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. ही गोड जोडी पुन्हा एकदा एक दर्जेदार नाटक घेऊन आपल्या भेटीसाठी येत आहे. हे नाटक म्हणजे मल्हार व कलाकारखाना निर्मित दोन अंकी मराठी नाटक ‘वरवरचे वधूवर’!
सुव्रत आणि सखीच्या आजवरच्या कारकीर्दीचा आढावा घेतला तर त्यांची कथेची अचूक निवड आणि कामावरच्या अमाप निष्ठेचा आपल्याला अंदाज येतो. काहीतरी वेगळं आणि दर्जेदार असं ही जोडी नेहमीच आपल्या भेटीसाठी घेऊन येत असते. सुव्रत जोशी या कलाकाराचं सतीश आळेकर लिखित ‘ठकीशी संवाद’ हे नाटकही सध्या प्रेक्षकांचं मन जिंकतंय! ‘वरवरचे वधूवर’ या नाटकाचा अनुभवही नक्कीच प्रेक्षकांसाठी आल्हाददायक अनुभव ठरणार आहे, याबद्दल वादच नाही. नाटकाचं टीजर आजच्या पिढीला लक्षात घेऊन बनवण्यात आलेलं आहे, हे दिसून येतंय. विषय अगदी ताजा आणि खुसखुशीत आहे, असं प्रोमो बघून तरी वाटतंय.
व्हिडिओ संपता संपता लेखक-दिग्दर्शकाचं नाव झळकतंय ते म्हणजे विराजस कुलकर्णी! ‘माझा होशील ना?’ मालिकेतून विराजसने प्रेक्षकांचं मन जिंकलं. विराजसने कित्येक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या ‘गालिब’ नाटकात अंगद देहेलवी(दळवी) नामक लेखकाची भूमिकाही चोख बजावली. बऱ्याच जणांना माहीत नसेल पण विराजसची त्याच्या काही सहकाऱ्यांसह ‘Theatron Entertainment’ नामक नाट्यसंस्था आहे, जी गेली बरीच वर्षे प्रायोगिक रंगभूमीवर सशक्तपणे कार्यरत आहे. आता तो व्यावसायिक रंगभूमीवर लेखक-दिग्दर्शकाच्या भूमिकेत आपल्या भेटीसाठी येत आहे. या नाटकासाठी सुव्रत आणि सखी ही जोडी त्याची फक्त निवडच नाही तर अट्टहास होता!
‘वरवरचे वधूवर’ हे नाटक ‘कलाकारखाना’ व ‘मल्हार’ संस्थेची निर्मिती असणार आहे. ‘अमर फोटो स्टूडियो’ हे नाटक कलाकारखानाचीच प्रस्तुती होतं आणि ‘मल्हार’च्या यशस्वीतेचं उत्तम उदाहरण देणारी सध्याच्या काळात गाजलेली नाटकं म्हणजे ‘गालिब’ आणि ‘काळी राणी’!
तर मंडळी! सगळंच सुंदर जुळून आलेलं आहे. आता फक्त आतुरतेने वाट बघायची या गोंडस जोडप्याची! ते पुन्हा येणार आणि मन जिंकून जाणार एवढं मात्र निश्चित! नाटकाच्या संपूर्ण टीमला रंगभूमी.com कडून भर शुभेच्छा!!!