संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवतोय. अशातच लहान मुलांना सुट्ट्या पडल्यामुळे नाटकांना जाणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढताना दिसतेय. याच कारणामुळे, बऱ्याच नाटकांच्या प्रयोगांच्या संख्येतही वाढ झालेली दिसतेय. काही नाटकांचे महाराष्ट्रभर दौरेही सुरू आहेत. परंतु, या दौऱ्यांमध्ये कलाकारांना बऱ्याच संकटांना तोंड द्यावं लागत आहे, असं दिसतंय. वैभव मांगले या हरहुन्नरी कलाकाराने एका पोस्टद्वारे फेसबुकवर अतिशय परखड शब्दात या सर्व प्रकारावर टीका केली आहे.
‘संज्या छाया’ नाटकाचा दौरा सुरू होता. या दौऱ्यादरम्यान नाटकाच्या संपूर्ण टीमला खूपच वाईट अनुभव आला. वैभव मांगलेंनी या संपूर्ण प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. मुंबईबाहेरील बऱ्याच नाट्यगृहात AC व्यवस्थित सुरू नसल्याने प्रयोगादरम्यान कलाकारांचं आणि प्रेक्षकांचं पुरतं घामटं निघालं. नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिर येथे सुरू असलेल्या प्रयोगातून, उकाड्याला कंटाळून, पहिल्याच अंकात तब्बल ६० प्रेक्षकांनी संतापून एक्झिट घेत तिकिटाचे पैसेही परत मागितले. अखेरीस वैभव मांगले यांना चालू प्रयोगात, सर्व प्रेक्षकांसमोर हात जोडून दिलगिरी व्यक्त करावी लागली. या एकंदर परिस्थितीसाठी नाट्यगृहाची देखभाल करण्यात अयशस्वी ठरलेल्या व्यवस्थापकांना दोष द्यावा की महानगरपालिकेच्या दुर्लक्षी स्वभावाला? दोष कोणाचाही असला तरी त्याचा भूरदंड नाट्यकलाकार व नाट्यनिर्मात्यांनीका भरावा असा सवाल करत दिलीप जाधव यांनी त्या नाट्यगृहातील पुढील सर्व प्रयपग तूर्तास रद्द केले आहेत.
वैभव मांगले यांनी फेसबुकवर लिहिले आहे की, “पुणे, छ.संभाजीनगर, नाशिक येथे प्रयोग झाले संज्या छायाचे. एकाही ठिकाणी वातानुकूलित यंत्रणा काम करत नव्हती. रंगमंचावर एवढ्या प्रकाशात काम करताना प्रचंड उकाड्यात अतोनात त्रास झाला. प्रेक्षक डास आणि प्रचंड उकाड्यात (विशेषतः बालगंधर्व, पुणे खूप डास आणि उकाडा, कोथरूड, यशवंतराव… उकाडा) प्रयोग पहात होते. एक मर्यादेनंतर नाशिकमध्ये रसिकांचा राग हतबलता अनावर झाली. त्यांनी गोंधळ केला. तिकिटाचे पैसे परत घ्यावे का याचा विचार करू लागले. पण आपण show must go on वाले लोक. आम्ही विनंती केली की आम्हालाही त्रास होतोच आहे. इथे येई पर्यंत माहीत नव्हतं की AC नाहीये. आमचे निर्माते दिलीप जाधव यांनी १७ आणिं २७ चे शो रद्द केले. त्या हवेचे आवागमन नसलेल्या उकाड्यात प्रयोग पार पडला. कालिदासला तर उत्तर द्यायला ही अधिकारी जागेवर नव्हता. या सगळ्यात सगळ्यांची होलपट होतेय. कुणी कुणी आणि कुठे कुठे कशी दाद मागावी??? विचारलं तर सांगतात AC चालू आहे. पण खूप गर्मी असल्याने AC यंत्रणा नीट काम करत नाही. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ही समस्या येत नाही. काय बोलावं!”
आता प्रश्न असा उभा राहतो की सगळ्याच नाट्यगृहांची अवस्था अशी असली तर कलाकारांनी २-३ तासांचं नाटक कसं सादर करायचं? आणि प्रेक्षकांनी कडाक्याच्या गरमीत या नाट्यकृतींचा आस्वाद तरी कसा घ्यायचा? या परिस्थितीला जबाबदार कोण? मुंबईतील नाटकं पुणे, नाशिक, औरंगाबाद येथील प्रेक्षकांना बघता यायला हवीत. गावाकडील प्रेक्षक या नाट्यकृती बघण्यासाठी आसुसलेले असतात. त्यांना या नाट्यकृतींचा आस्वाद घेत यावा या दिशेने पावलं उचलायला हवीत. नाट्यगृहांच्या देखभालीचा सवाल पुन्हा उपस्थित झाला आहे. हे निराशाजनक तर आहेच. पण एका कलाकाराने या तंत्रिक गैरसोयीला वाचा फोडली आहे, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू, म्हणायला हरकत नाही.