वगनाट्य म्हणजे काय?
वग म्हणजे ‘वगनाट्य तमाशा’तला एक महत्वाचा घटक. वगनाट्य तमाशा हे एक विनोदी लोकनाट्य आहे जे महाराष्ट्रात गावांमध्ये १८६५ सालापासून सादर केलं जातं. गण, गवळण, लावणी, बतावणी या सगळ्या लोकसाहित्याच्या प्रकारांच्या माध्यमातून वगनाट्याचा प्रयोग सादर होतो. वगाचे स्वरूप सामान्यतः नाटकासारखेच असते आणि त्याचे सादरीकरण तमाशाच्या शेवटी होते. या अखंड सादरीकरणातून वेगवेगळ्या कथा, चर्चा आणि विषय पुढे आणले जायचे. जेव्हा मनोरंजनाची इतर कुठलीही माध्यमं नव्हती, तेव्हा तमाशा आणि वगनाट्य हेच लोकांचे मनोरंजनाचे साधन होते.
परंतु हा वगनाट्याचा प्रकार दिवसेंदिवस मागे पडत चालला आहे. नवीन पिढीला वगनाट्य या प्रकाराबद्दल काहीच माहिती नाही आहे. वगनाट्य मराठी मातीत जन्मलेले लोकनाट्य आहे. आपल्या या लोकधारेचा आपल्याला विसर पडू नये आणि नवीन पिढीला वगनाट्य म्हणजे काय हे समजण्यासाठी एका धमाल वगनाट्याने रंगभूमीवर पदार्पण केले आहे ज्याचे नाव आहे स्वरगंधार निर्मित व बालाजी ऑन क्रिएशन प्रस्तुत ‘वास इस दास‘!
काय आहे ‘वास इस दास’?
‘वास इस दास‘ हे दोन अंकी वगनाट्य आहे. सुंदरगाव गावातल्या लोकांची ही गोष्ट आहे. जर्मनीवरून मार्टिना नावाची एक बाई सुंदरगाव पहायला येते. इतर कोणतीही भाषा येत नसल्यामुळे ती जर्मन मध्ये सगळ्यांशी संवाद साधते. परंतु गावात कोणालाही तिच्या बोलण्याचा अर्थ लागत नाही. ती सगळ्या गावकऱ्यांना वास इस दास हा प्रश्न विचारून भंडावून सोडते आणि यामुळे होणारा गोंधळ, गडबड आणि गावकऱ्यांच्या मनात निर्माण होणारे कुतूहल म्हणजेच वास इस दास हे नाटक.
गावातील बहुढंगी लोकांच्या मानसिकतेचा आणि त्यांच्यातील अशिक्षित जीवनाचा प्रवास या नाटकात विनोदी अंगाने दाखवला आहे. जीवनात हसत राहणं महत्वाचं आहे या विचाराभोवती नाटक फिरतं. वगनाट्य असल्यामुळे गण, गवळण, लावणी, बतावणी आणि वग या सगळ्या प्रकारांच्या माध्यमातून हे नाटक पुढे सरकतं. आजकालच्या सामाजिक व राजकीय समस्यांवर हसत-हसत अंतर्मुख करणारं हे नाटक जगण्याचं तारकमंत्र देऊन जातं.
वास इस दास ची टीम
प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक ज्ञानेश भिलारे दिग्दर्शित व आयुष किरण ओसवाल निर्मित ‘वास इस दास’ हे एक विनोदी वगनाट्य आहे. नाटकाच्या संगीताची धुरा सुद्धा ज्ञानेश भिलारे यांनी सांभाळली आहे व ते गीतकार म्हणून सुद्धा या नाटकाचा भाग आहेत. या नाटकाचे लेखन कुमार जाधव आणि आनंद भळगट यांनी केले आहे. शशीकांत वाघमारे (ढोलकी) आणि अजीत चाफे (हार्मोनियम) यांनी नाटकाच्या संगीत संयोजनेची पूर्ण बाजू सांभाळली आहे व विक्रम विनीत (ढोलकी) हे या नाटकाच्या संगीत संयोजनेचा भाग आहेत.
कल्पेश जडिया आणि संदीप पाटील यांनी वास इस दास ची प्रकाश योजना सांभाळली आहे. त्याचबरोबर, संतोष कुंवर यांनी नेपथ्य तर विजय चव्हाण यांनी वेषभूषेची बाजू सांभाळली आहे. सिद्धार्थ कांबळे यांनी या नाटकाला महत्वाचे सहाय्य केले आहे.
या नाटकात २० कलाकारांची भली मोठी फौज आहे- कुमार जाधव, स्वाती चव्हाण, अंकिता शिवतरे, कामेश लांडे, युवराज बंड, अविनाश धुळेकर, अमोल ढमाळ, आकाश तावरे, मनोज तोळे, प्राजक्ता घोलप, श्वेता सकट, प्रियांका नागटिळक, दीप्ती वाघ, नितांत धिवर, अर्षद शेख, अश्वजीत कांबळे. महेश वैद्य, दीप्ती वाघ, कुमार जाधव (शाहीर सोबत) आणि युवराज बंड (गण सोबत) हे कलाकार या नाटकात गायक-कलाकार म्हणून काम करतात.
आता त्या जर्मन बाईचे प्रश्न शेवटपर्यंत कोणाला कळतात की नाही, तिचे प्रश्न ऐकून गावकऱ्यांची काय तारांबळ उडते, त्यांनी लावलेल्या तिच्या भाषेचे तर्क-वितर्क नक्की काय असतील आणि त्यावरून काय गोंधळ उडेल? हे सगळं जाणून घेण्याची जर तुम्हाला उत्सुकता असेल, तर प्रेक्षागृहात जाऊन ‘वास इस दास’ हे नाटक अगदी आवर्जून पहा.
प्रयोगासाठी/तिकिटासाठी संपर्क-
युवराज बंड– ९८६०५९३४७८.