‘अहो मुंबई कोणाची…आपलीच ना, जर ती आपली आहे तर तिची काळजी घ्या…. नाहीतर आपल्या निष्काळजीपणामुळे या मुंबईची ‘तुंबई’ होईल’, असं म्हणत ‘तुंबई’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालं आहे. ‘आमची मुंबई’च्या सद्य परिस्थितीवर सडेतोड भाष्य करणारं आणि राज्य नाट्य स्पर्धेमध्ये पालघर, ठाणे, रायगडमधून ‘तृतीय पारितोषिक’ विजेतं हे नाटक आज प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी होताना दिसतंय. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल प्रस्तुत चैतन्य सरदेशपांडे लिखित आणि गणेश जगताप दिग्दर्शित ‘तुंबई’ या नाटकात अगदी हसत खेळत काही गंभीर आणि आवश्यक विषयांना हात घातला जाणार आहे.
तुंबई नाटकाचे दिग्दर्शक गणेश जगताप या नाटकाबद्दल सांगतात की, ‘मुळात या मुंबईवर आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे. ही मुंबई प्रत्येकाला भरभरून देत असते. पण ज्या वेळेला एखादं शहर भरभरून देत असतं, त्या वेळेला आपण त्या शहराच्या ऱ्हासाकरितासुद्धा कारणीभूत ठरत असतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर आपण आजवर खूप प्रगती केली आहे. आपली शहरं स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करतात. पण एक ‘नागरिक’ म्हणून, एक ‘समाज’ म्हणून आपण खरंच स्मार्ट झालो आहोत का? या सगळ्याचा उहापोह तुंबई या नाटकात केलेला आहे, आणि खऱ्या अर्थाने एका शहराच्या असण्याला, सोशल कॉन्टेक्स्टला, त्याच्या समाजिक कॉन्टेक्स्टला, सगळ्यांच्या अधिष्ठानांना हात लावण्याचे काम ‘तुंबई’ हे नाटक करतं. आणि प्रत्येक मुंबईकराने किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये, गावामध्ये या नाटकाचे ज्या वेळेला प्रयोग होतील त्या वेळेला ती फक्त मुंबईची नाही तर प्रत्येक गावाची व्यथा म्हणून समोर येणार आहे. आणी या हेतूने आम्ही तुंबई हे नाटक करण्याचे योजले आहे.’
पुढील प्रयोग
१० एप्रिल २०२२, रात्री ८:०० वाजता
स्थळ – आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल.
तिकिटांसाठी संपर्क
अमोल खेर – 9820233349
गणेश जगताप – 9870116964
तिकिट दर – १५० रु, १०० रु, ७५ रु
आजच्या घडीला अतिशय महत्वाच्या अशा विषयावर हलक्याफुलक्या पद्धतीने प्रकाश टाकणाऱ्या या नाटकाला जरूर भेट द्या.