नवरा आणि बायकोचे नाते म्हंटले की प्रेम, आपुलकी, राग, रुसवा, विश्वास अशा अनेक भावनांचा ताळमेळ असतो. असेच एक रंगभूमीवर गाजलेले जोडपे गौरव कुलकर्णी आणि आदिती कुलकर्णी. ‘तू म्हणशील तसं’ नाटकातील मिस्टर आणि मिसेस कुलकर्णी यांच्या नात्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये दिसते. या नाटकात, दिलखुलास जगणारा गौरव आणि नेमकेपणाने जगणारी आदिती यांचे प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यात उडणारे खटके आणि त्यानंतर होणारा गोड शेवट आनंददायी पद्धतीने मांडले आहे. आधुनिक युगातील जोडप्यांवर आणि त्यांच्या नात्यातील चढ-उतारांवर भाष्य करणारी अनेक नाटकं आहेत, परंतु, या नाटकाने स्वत:चे वेगळेपण जपत प्रयोगांची यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे. खुशखबर अशी की, गौरी प्रशांत दामले निर्मित, पुणे टॉकीज प्रस्तुत, संकर्षण कऱ्हाडे लिखित आणि प्रसाद ओक दिग्दर्शित ‘तू म्हणशील तसं’ या व्यावसायिक नाटकाने ३ जुलै, २०२२ रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे या नाट्यगृहात २०० वा प्रयोग सादर केला.
२०० व्या प्रयोगाच्या निमित्ताने नाटकाचे दिग्दर्शक प्रसाद ओक हे सोशल मीडियावर टीमला शुभेच्छा देत म्हणतात, “आज मी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचा २०० वा प्रयोग साजरा होतोय… प्रचंड आनंद… अभिमान वाटतोय… कारण ज्यांनी केलेली नाटकं पहात पहात मोठा झालो, शिकलो त्या प्रशांत दामले हे या नाटकाचे निर्माते झाले आणि मला त्यांनी ही संधी दिली आणि या नाटकाचा लेखक आणि नायक संकर्षण कऱ्हाडे ज्याने हे नाटक माझ्याकडे आणलं… या दोघांचे तर आभार मानतोच पण सर्वात जास्त आभार तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे… असंच प्रेम दाखवलंत तर लवकरच २००० प्रयोगापर्यंत मजल मारू…!!! आणि हो आमच्या पूर्ण टीम म्हणजे भक्ती, प्रिया, अमोल, चिन्मय, रुपेश आणि सर्व बॅकस्टेजचे मित्र या सर्वांचे सुद्धा आभार आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा…!!!”
तू म्हणशील तसं या नाटकाचा संपूर्ण रिव्ह्यू वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
तू म्हणशील तसं [Review] — सुखी संसाराचा मूलमंत्र
२ जुलै रोजी संपन्न झालेल्या प्रयोगाच्या शेवटी कर्टन कॉल दरम्यान संकर्षणने प्रेक्षकांना हा त्यांचा १९९ वा प्रयोग असल्याचे सांगितले व रसिक प्रेक्षकांचे आभारही मानले. अनेक वाचकांचा, नाट्यकर्मिंचा आणि चाहत्यांचा प्रश्न आहे की संकर्षण रंगभूमीवर प्रमुख भूमिका आणि मालिकेचं शूट कश्याप्रकारे सांभाळतो? या प्रश्नाचे उत्तर देत संकर्षण म्हणतो “काम करण्यात मला वेगळाच उत्साह जाणवतो. शूटची आणि तलमीची वेळ सांभाळून घेतली जाते. या सर्वाचे श्रेय मी माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचे, किचन कल्लाकार कार्यक्रमाचे आणि तू म्हणशील तस या नाटकाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांना देतो”.
२०० प्रयोग आणि या प्रयोगांचा प्रवास हा निराळा होता. महाराष्ट्रातील प्रत्येक भागातून प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद आणि प्रेम सर्व कलाकारांना उस्फुर्त करते. ‘तू म्हणशील तसं’ या संपूर्ण टीमला रंगभूमी.com कडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!