आपण जेव्हा एखादं नाटक बघतो तेव्हा एका वेळेला आपल्याला एक कथा अनुभवायला मिळते. पण जर एका तिकिटात, पाठोपाठ, तुम्हाला दोन कथा बघायला मिळाल्या तर? डोंबिवलीमध्ये ‘तो, पाऊस आणि ताफेटा’ आणि ‘नवरा आला वेशीपाशी‘ या दोन दीर्घांकाचे प्रयोग सादर होणार आहेत व एका प्रयोगामध्ये रसिक प्रेक्षकांना दोन वेग-वेगळे दीर्घांक पाहायची सुवर्णसंधी मिळणार आहे.
अबस्ट्रॅक्ट आर्ट प्रस्तुत, ‘तो पाऊस आणि टाफेटा‘ याचे सादरीकरण पहिल्या अंकात होईल तर करनाटकू निर्मित, ‘नवरा आला वेशीपाशी‘ या दीर्घांकाचे सादरीकरण मध्यांतरानंतर दुसऱ्या अंकात होईल.
तो पाऊस आणि टाफेटा
नितीन सावळे आणि जुईली शिर्के दिग्दर्शित व तुषार गोडसे लिखित ‘तो पाऊस आणि टाफेटा’, आयुष्यातील प्रवास मांडणारी, भूतकाळाच्या आठवणीतून वास्तवापर्यंतचा प्रवास घडवणारी कथा आहे. भविष्याची स्वप्ने रंगवत एक तरुणी घराबाहेर पडते आणि तिला भेटणाऱ्या एका अनोळखी व्यक्ती बरोबरच्या संभाषणात ही कथा पुढे सरकते. ही कथा एक तिसरीच व्यक्ती मांडत असते, जो त्याच्या वर्तमानात व्यस्त असतो आणि त्याच्या आयुष्यात होणाऱ्या बदलांचं प्रतिबिंब त्या कथानकात घडत असतं. ही कथा वास्तव आहे की कल्पना? हा प्रश्न सोडवत कथा पुढे घडत जाते. परंतु या काल्पनिक कथेत आणि कथा घडवणाऱ्या माणसाच्या आयुष्यात एक गोष्ट साम्य आहे तो म्हणजे पाऊस… पाऊस या संपूर्ण कथेत फार महत्वाची भूमिका बजावतो. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीवर प्रेमापेक्षा ही जास्त विश्वास असला पाहिजे या वाक्यावर कथेचा सगळा डोलारा उभा आहे. या कथेत शक्यता आहे पूर्ण झालेल्या आणि अपूर्ण राहिलेल्या प्रेमाची. ही कथा नेमका कोणाच्या आयुष्याचं वास्तव मांडते याचा शोध आपल्याला कथेच्या शेवटी लागतो.
जुईली शिर्के, नितीन सावळे, मंदार भुर्के, तुषार गोडसे व सौरभ रानडे प्रमुख कलाकारांच्या भूमिकेत आहेत. या दीर्घांकाचे संगीत केदार देसाई यांचे आहे व नेपथ्य आशिष पवार आणि निलेश जाधव यांनी केलं आहे. या दीर्घांकाच्या प्रकाशयोजनेची धुरा राजेश शिंदे व यश नवले यांनी सांभाळली आहे.
नवरा आला वेशीपाशी
यश नवले व राजरत्न भोजने लिखित व दिग्दर्शित ‘नवरा आला वेशीपाशी’ हा दीर्घांक खूप महत्वाचे प्रश्न विचारतो आणि प्रश्न विचारण्याबरोबरच उत्तरं ही देतो. ही कथा आहे एका तरुणीची जी लग्नाच्या आदल्या रात्री हळदीच्या अंगाने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला भेटायला एका लॉज वर जाते. तिला त्याच्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं असतं. तिला नक्की त्याला काय सांगायचं असतं? ते त्याच रात्री सांगणं का गरजेचं असतं? आणि त्या संवादानंतर त्यांचं लग्न मोडतं की टिकतं या सगळ्याची उत्तरं आपल्याला या दीर्घांकाच्या शेवटी मिळतात. स्त्री ही काही वस्तू नाही, की काही बिघाड झाला आणि तिला फेकून दिलं. या गोष्टी वर ही कथा भर देते आणि नक्कीच आपले डोळे उघडते.
संदेश रणदिवे, सिमरन सैद आणि अभिजीत पवार या दीर्घांकात मुख्य पात्रे सांभाळतात. या दीर्घांकाच्या नेपथ्याची धुरा अमेय भालेराव यांनी सांभाळली आहे तर प्रकाश योजनेची बाजू राजेश शिंदे यांनी सांभाळली आहे. या दीर्घांकाला ओंकार सोनवणे आणि निनाद म्हैसाळकर यांनी संगीत दिलं आहे.
१२ मार्च, २०२२ रोजी, शनिवारी, दुपारी ४ वाजता सावित्रीबाई फुले कलामंदिर, डोंबिवली येथे ‘तो, पाऊस आणि ताफेटा’ आणि ‘नवरा आला वेशीपाशी’ या दोन दीर्घांकांचे प्रयोग सादर होणार आहेत. तिकिटाचे दर १००/-, १५०/-, २००/- असे आहेत.
तिकिटांसाठी संपर्क- ८१०४०६२४९८, ८२९१०३५३५९
तेव्हा एका तिकिटात या दोन कमाल आणि दर्जेदार दीर्घांकांचा लाभ रसिक प्रेक्षकांनी नक्की घ्यावा!