मंडळी, नाटक बघण्यासाठी नाट्यगृहात न जाता, अख्खं नाटकच तुमच्या घरी आलं तर? ‘फिरतं नाटक’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणत, टायनी टेल्स निर्मित आणि भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र व सर्जनशाळा प्रस्तुत ‘कडेकोट कडेलोट’ या नाटकाची चर्चा शहरापासून ते अगदी गावोगावीही सुरु आहे. या नाटकाला स्टेज, लाईट्स, मोठ्या जागा यांची सक्तीने गरज नसल्यामुळे हे नाटक आतापर्यंत भरपूर गावांमध्ये व शहरांमध्ये पोहचू शकलं आहे.
कल्पेश समेळ दिग्दर्शित ‘कडेकोट कडेलोट‘ हे नाटक फ्रँका रामे लिखित ‘अ वुमन अलोन’ या मूळ नाटकाचा मराठी अनुवाद आहे. ७०च्या दशकात फ्रँका रामे या इटालियन लेखिकेने लिहिलेलं हे नाटक जगातल्या सर्व वर्गातल्या स्त्रियांच्या व्यक्तिस्वातंत्र्याविषयी भाष्य करतं. त्यामुळे त्याचे वेगवेगळ्या भाषेत प्रयोग होत राहणं आणि ते सर्व वर्गातील स्त्रियांपर्यंत पोहोचणं गरजेचं वाटल्याने अमोल पाटील यांनी मूळ नाटकाचा अनुवाद केला.
हे नाटक घरात बंद असलेल्या एका बाईची गोष्ट आहे. तिच्या नवऱ्याने तिला स्वतःच्या घरात बंद करून ठेवलंय. त्यामुळे तिने स्वतःचं एक काल्पनिक जग तयार केलंय. अत्यंत विनोदी अंगाने जाणाऱ्या या नाटकात ती सगळ्या वेडेपणातून खूप काही सांगण्याचा प्रयत्न करतेय. या नाटकातली बाई अगदी टिपिकल नसली तरी आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहे. कडेकोट बंदोबस्तात डांबून ठेवलेल्या एखाद्या व्यक्तीचे आत्यंतिक दमन झाल्यावर कडेलोटाच्या क्षणी माणसाची मूळ प्रवृत्ती त्याला काय वर्तन करायला भाग पाडते हे या नाटकातून आपल्याला पाहायला मिळतं. विषयाची सहजता आणि विनोदनिर्मिती, या दोन्हीचा समतोल साधत नाटकाच्या अनुवादातून रंजकता आणि विषयाचे गांभीर्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हसत हसत विचार करायला उद्युक्त करणारं हे नाटक आहे.
अभिनेत्री प्रतीक्षा खासनीस या ५० मिनिटाच्या एकपात्री नाटकाचे सादरीकरण करते. या नाटकाच्या नेपथ्याची बाजू मयुरेश माळवदे सांभाळतात तर शुभम कुंभार रंगमंच व्यवस्थेची बाजू सांभाळतात.
‘टायनी टेल्स’बद्दल थोडंसं… (About Tiny Tales Theatre Company)
Travelling Theatre म्हणजेच ‘फिरतं नाटक’ या संकल्पनेवर आधारित, ‘टायनी टेल्स‘ ही नाट्यसंस्था गेली ४ वर्षं विविध नाट्यप्रयोग लोकांपर्यंत, अगदी गावोगावी फिरून पोहोचवण्याचा प्रयत्न करते. आत्तापर्यंत त्यांनी शंभरहून अधिक गावं आणि शहरांमध्ये नानाविध नाट्यानुभव पोहोचवले आहेत. त्यांना सादरीकरणासाठी स्टेज, लाईट्स, मोठ्या जागा असं काही लागत नाही. एखाद्या हॉलमध्ये, घरात, अंगणात अशा कुठल्याही छोट्या जागेत ते नाटक सादर करतात.
कोविडनंतरच्या काळात जेव्हा प्रत्यक्ष भेटणं, बोलणं सगळं ठप्प होतं, तेव्हा त्या काळात त्यांनी काही छोटे नाट्यप्रयोग सादर करण्यास सुरुवात केली. कमीत कमी संच, कमी नेपथ्य असल्यामुळे कमी खर्चात नाटक एखाद्या छोट्या जागेत सहज सादर होऊ शकत होतं. या काळात त्यांनी ‘आलोर गान’ हे बंगाली लोककथेवर आधारित नाटक बसवलं आणि शिळिंब, अहमदनगर, रुई, इचलकरंजी, मावळ, पुणे, कोल्हापूर, बेळगाव अशा अनेक ठिकाणी छोट्या जागेत प्रयोग सुरू केले. त्यांचं हे नाटक बघायला अख्खं गावच्या गाव येऊन बसायचं. जिथे नाटकाची फारशी परंपरा नाही अशा ठिकाणी लोकांना असं प्रत्यक्ष मनोरंजन हवं आहे हे त्या दरम्यान त्यांच्या लक्षात आलं आणि त्यातून त्यांच्या नाटकांची एक परंपरा सुरू झाली. त्यांच्या या नाटकाला आता महाराष्ट्रात आणि बाहेरही नावाजलं जातंय.
एक प्रयोग म्हणून सुरू केलेल्या या नाटकाची दिल्ली आणि बंगालच्या बहुचर्चित नाट्यमहोत्सवात नामांकनांसोबत निवडही झाली आहे. ‘कडेकोट कडेलोट’ नाटकासोबत ‘राजा आणि चोर’, ‘मंडी’ अशी नाटकंही ते करत आहेत.
मोठ्यांसोबतच ते बालसाहित्यावर आधारित कामही करतात. नाटकाचा वापर करून मुलांच्या वाचन व लेखन क्षमतेचा विकास व्हावा हे त्यांचं उद्दीष्ट आहे. बालसाहित्यातील गोष्टी सादर करून, त्या गोष्टींच्या प्रकट वाचनातून मुलांना तो अनुभव आणि त्याचबरोबर लेखन-वाचनातला आनंद मिळवून देण्याचे काम ते करतात.
कडेकोट कडेलोट या नाटकाचा पुढचा प्रयोग पुण्यात, १२ जून, २०२२ रोजी, मार्शल्स बुक कॅफे, औंध, येथे सायंकाळी ७ वाजता पार पडणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनी मोठ्या संख्येत आवर्जून हे नाटक पहावं.
तिकिटासाठी संपर्क-
८४११८७८४५९