द बेस आयोजित दोन लघुनाटिका एकाच तिकिटात बघता येण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांसाठी चालून आली आहे. दोन वेगळ्या धाटणीचे विषय घेऊन कलाकार तुमच्या भेटीसाठी सज्ज झाले आहेत. ‘द रेप’ व ‘अंडासेल’ अशी दोन नाटकं ११ जून रोजी सायंकाळी ६ वाजता द बेस, एरंडवणे – पुणे येथे सादर होणार आहेत. प्रयोगाचे तिकीट शुल्क मात्र १५०/- आकारण्यात आले आहे.
अंडासेल
लेखक व दिग्दर्शक – शिवम पंचभाई
कलाकार – मंथन काळपांडे, दर्शन कुलकर्णी, कौशिक कुलकर्णी, स्वराली पेंडसे, अतुल कूडळे, किशोर क्षीरसागर, लकी वाघमारे
प्रकाशयोजना – लीना जोशी
संगीत संयोजन – चैतन्य बीडकर
अंडासेल ही जेल मधली एक शिक्षा आहे. अंडासेल मध्ये अडकलेल्या दोन कैद्यांची ही गोष्ट आहे. माणूस एकटं असेल तर त्याच्या वागण्यात कश्या पद्धतीने बदल होऊ शकतो. या बाबतीत हे नाटक मूलतः भाष्य करतं.या नाटकाचं सादरीकरण Emersive नाट्यप्रकारात केलं जातं. या नाटकात सादरीकरणाची पद्धत, संवाद या नाटकाच्या मूलभूत घटकांमध्ये काही नवीन प्रयोग करून पाहिलेले आहेत. हे नाटक हे प्रेक्षकांच्या मध्यभागी सादर होतं. आजवर या नाटकाचे पुणे आणि पुण्याच्या बाहेर प्रयोग झालेले आहेत.
द रेप
मूळ लेखिका – फ्रँका रामे
दिग्दर्शक – महेश खंदारे
सादरकर्ती – धनश्री साठे
भाषा – मराठी
कालावधी – २५ मिनिटे
द रेप हे एकल नाट्य एका बाईने तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाचं केलेलं कथन आहे. आपल्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराचे ती वर्णन करते आहे. राजकीय मुद्द्यांवर उघडपणे बोलत असल्याने तिला हि शिक्षा देण्यात आली होती. तिला जन्माची अद्दल घडवून तिचं तोंड कायमचं बंद करण्याचा त्यांचा हेतू होता. पण तिने तो हेतू साध्य होऊ दिला नाही. ती त्यानंतरही बोलतच राहिली.
बलात्कार झाला म्हणजे इज्जत गेली, बलात्कार झाला म्हणजे आयुष्य संपलं, बलात्कार झाला म्हणजे ती महिला अपवित्र झाली या सगळ्या पुरुषी शीर्षकांना लेखिका फ्रँका रामे या नाटकाद्वारे खोडून काढतात. हे नाटक हिंसा करून लोकांचा आवाज दाबाणाऱ्या व्यवस्थेचा निषेध करतं आणि अपराधीपणाची भावना महिलेला का यावी हा प्रश्न उपस्थित करतं.
लेखिकेविषयी थोडंसं…
फ्रँका रामे या इटलीमधील एक लेखिका आणि अभिनेत्री होत्या. त्यांच्या नाटकांमधून त्या तत्कालीन सामाजिक- राजकीय परिस्थितीवर टीका करीत असत. त्याचबरोबर या क्षेत्रांमध्ये त्या प्रत्यक्ष काम देखील करीत असत. त्यांचा हा सहभाग विरोधी विचारसरणीच्या अनेकांच्या डोळ्यांत खुपत होता.
९ मार्च १९७३ रोजी फ्रँका रामे यांचं काही लोकांनी अपहरण केलं. त्यांना मारहाण करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यावेळी रामे कैद्यांच्या मानवी हक्कांसाठी काम करीत होत्या. बलात्काराच्या घटनेनंतर काही दिवसांनी लक्षात आलं की बलात्कार उच्चस्तरीय पोलीस अधिकाऱ्यांनीच घडवून आणला होता. या सगळ्या प्रकारानंतरही रामे दबल्या नाहीत; उलट त्यांनी या प्रसंगावर आधारित एक नाटक लिहिलं आणि सादर करू लागल्या.
या दोन्ही लघुनाटिका प्रेक्षकांना कमी वेळात बरंच काही अर्थपूर्ण देण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे तुम्ही या प्रयोगाला नक्की भेट द्या.