समाजात भ्रष्टाचार किती बळावला आहे याबद्दल आपण जितकी चर्चा करू ती कमीच आहे. सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक अशा सर्वच स्तरांवर आज भ्रष्टाचाराचं काहूर माजलंय. याच ज्वलंत विषयाचे असंख्य पैलू विविध पात्रांमार्फत प्रेक्षकांना दाखवणारं एक नाटक येत्या १० फेब्रुवारी रोजी रंगभूमीवर पदार्पण करत आहे.
ज्येष्ठ निर्माते कै.सुधीर भट यांचे सुपुत्र संदेश भट सादर करीत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर लिखित आणि हृषिकेश जोशी दिग्दर्शित ‘येतोय तो खातोय’ हे नाटक! ही सुयोग नाट्यसंस्थेची ९० वी कलाकृती असणार आहे. कांचन सुधीर भट, मोहन दामले, मिलन टोपकर, चंद्रशेखर आठल्ये, यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. संतोष पवार, हृषिकेश जोशी, भार्गवी चिरमुले या कलाकारांसोबतच मयुरा रानडे, स्वप्नील राजशेखर, अधोक्षज कऱ्हाडे, ऋषिकेश वांबुरकर, सलीम मुल्ला, महेंद्र वाळूंज हे कलाकारही या नाटकाच्या निमित्ताने आपल्या भेटीस येणार आहेत.
‘Yetoy to Khatoy’ या नाटकाची काही खास वैशिष्ट्ये:
- हे एक आधुनिक लोकनाट्य आहे.
- या नाटकात ७ गाणी आहेत. ही गाणी नाटकाचे लेखक व ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी स्वतः लिहिली आहेत.
- नाटकातील गाण्यांची नृत्यरचना प्रख्यात नृत्यदिग्दर्शक मयुर वैद्य यांनी केली आहे.
- अभिनेते संतोष पवार यांच्या सगळ्याच तारखा उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे पात्र ते आणि दिग्दर्शक हृषिकेश जोशी असे दोघेही आलटून पालटून साकारणार आहेत.
- हे नाटक ज्वलंत घडामोडींवर भाष्य करतं. पण कुठल्याही ठराविक पक्षाचं, व्यक्तीचं नसून हे नाटक प्रवृत्तीचं आहे.
- लेखक विजय कुवळेकर यांनी १९७३ साली लिहिलेल्या पहिल्या ‘पूल’ नावाच्या प्रायोगिक नाटकाचं दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांचे वडील ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी केलं होतं आणि आज त्यांच्या या व्यावसायिक नाटकाचं दिग्दर्शन हृषिकेश जोशी करत आहेत, याचा त्यांना आनंद आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
भार्गवी चिरमुले यांनी त्यांना या नाटकात काम करायला मिळतंय याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. “लॉकडाऊनपूर्वीच या नाटकाची तयारी सुरू झाली होती. परंतु, कोविडमुळे सगळंच स्थगित झालं, तरीही लॉकडाऊनमध्ये हृषिकेश जोशी यांच्यासोबत ‘नेटक’ नावाच्या ऑनलाईन उपक्रमात मी सहभागी झाले होते. त्यामुळे लॉकडाउन संपल्यावर हृषिकेशला त्वरितच या नाटकासाठी होकार कळवला,” असे त्या म्हणाल्या.
View this post on Instagram
लेखक विजय कुवळेकर नाटकाची पूर्ण प्रक्रिया बघून खूपच खूश असल्याचे सांगतात. त्यांनी लिहिलेले विचार नाटकाच्या स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार या गोष्टीबद्दलचे समाधान आणि आनंद त्यांनी व्यक्त केला. “हृषिकेश जोशी आणि माझ्यात एखाद वेळेस राजकीय मतांमध्ये तफावत असू शकते. पण, नाटकाच्या प्रक्रियेबद्दल आमचं एकमत आहे”, असे त्यांनी सांगितले. तसेच, “काही जुन्या राजकीय, सामाजिक संवादांचे संदर्भ मला माहीत होते ते मी कलाकारांना सांगू शकलो. त्यामुळे कलाकारांना मदत झाली असेल असे मला वाटते.”, असेही त्यांनी सांगितले.
नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी यावेळीही सुंदर नेपथ्य साकारले आहे. संदेश बेंद्रे यांनी सांगितले की, “दिग्दर्शकाच्या मागणीनुसार आधुनिक लोकनाट्य या विषयाला साजेसा सेट उभा करण्याचा मी प्रयत्न केला आहे. नाटक वेगाने पुढे सरकतं. त्यामुळे देखावे बदलण्यासाठी वेळ नाही असे दिग्दर्शकाचे सांगणे होते. त्याप्रमाणे मी नेपथ्य उभे केले.”
प्रख्यात नृत्यदिग्दर्शक मयुर वैद्य हे गेले २० वर्षांपासून सुयोग संस्थेसाठी नृत्यरचनेची धुरा सांभाळतात. “सुयोग म्हटलं की गाणी ही आलीच आणि या नाटकामधील ७ गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन मी केले असल्याचा मला अतिशय आनंद आहे.”, असे मयुर वैद्य यांनी सांगितले.
आपले लाडके नट, लेखक आणि दिग्दर्शक संतोष पवार यांनी हे नाटक दोन कारणांमुळे करायचे ठरवले. पहिलं कारण म्हणजे या नाटकाचे लेखन. सद्य परिस्थितीवर भाष्य करणारे नाटक हा संतोष पवार यांचाही आवडीचा लेखनाचा विषय आहे. दुसरं कारण म्हणजे, “एरव्ही दिग्दर्शन करुन अभिनय करत असल्यामुळे माझ्या अभिनयाकडे मला लक्ष देता येत नाही. हृषिकेश जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली माझ्या अभिनयालाही वळण लागेल अशा हेतूने मी हे नाटक स्वीकारले.”, असे ते म्हणाले.
“नाटकाचे दिग्दर्शक हृषिकेश जोशी हे अतिशय कडक शिस्तीचे आहेत आणि त्यामुळेच नाटकाला एक शिस्त आहे, जो या नाटकाचा एक जमेची बाजू ठरली आहे.”, असे नाटकाच्या निर्मात्यांनी सांगितले.
“नावावरूनच हे एक राजकीय व्यंग आहे हे लोकांनी ओळखले आहे. इतर नाटकांसारखं आखीव रेखीव नसलं तरी बांधेसूद दंगामस्ती हे या नाटकाचं वैशिष्ट्य ठरणार आहे”, असे नाटकाचे दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांनी सांगितले.
तर मंडळी! नृत्य, गाणी, दमदार कलाकार, उत्कृष्ट लेखन अशा सर्वच मनोरंजक गोष्टींनी समृद्ध असं हसत खेळत बघण्यासारखं नाटक येत्या १० फेब्रुवारी रोजी रंगभूमीवर पदार्पण करत आहे. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली येथे दुपारी ४ वाजता हा शुभारंभाचा प्रयोग पार पाडणार आहे. लवकरात लवकर तुम्हीही या नाटकाला आवर्जून भेट द्या.
1 Comment
Yesterday we saw this drama, their was not cast of Santosh Pawar his Name is included in cast list and we were taken Rs. 400/ three tickets to see his role . What is this?
Also this drama has no any story , no any links to see as continuity, total bore in whole drama. sorry to write this.
Subhash Mali & Family.