‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतून घराघरात पोहचल्यानंतर ‘शी’ वेबसिरीजमध्ये काम केले आणि आता ‘अनन्या’ चित्रपटात दिसणारा लाडका अभिनेता सुव्रत जोशी. या अभिनेत्याने तरुण नाट्य कलावंतांसाठी आणि अभिनय क्षेत्रात रस असलेल्या मुलांसाठी ‘अभिनयासाठी आजीवन साधन‘ अशी कार्यशाळा म्हणजेच वर्कशॉप सुरु केले आहे. या कार्यशाळेत २९ जून ते ४ जुलैपर्यंत नवीन कलाकार घडविण्यात येणार आहेत. या ६ दिवसांत कार्यशाळेची वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे आणि या कार्यशाळेची फी ६०००/- रुपये आकारण्यात आली आहे.
या कार्यशाळेत आवाज, वाणी, शरीर यांचा उत्तम वापर आणि त्यावरील नियंत्रणाबद्दल शिकवण्यात येणार आहे. भावनांवर आणि श्वासावर प्रभुत्व मिळवणे आणि अभिनेता बनण्याच्या प्रवासात उपयोगी ठरणारी पुस्तके आणि माहितीपटाची यादी देण्यात येणार आहे. कॉन्स्टॅटाइन स्टॅनिसाव्स्की, मायकेल चेखोव्ह, जर्टझी ग्रोटोव्स्की आणि कुड्डीअट्टम यांच्या काही पद्धतीनुसार मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कलाकार म्हणून वाढत राहण्यासाठी सर्वसाधारणपणे जीवनात कसे सहभागी व्हावे याची तत्त्वे आणि सराव करून घेण्यात येणार आहे. एका कलाकाराने नवनवीन कलाकार घडवले पाहिजे आणि हेच उत्तम कार्य करतोय अभिनेता सुव्रत जोशी.
सुव्रत ही बातमी सोशल मीडियावर देत सांगतो “अभिनय क्षेत्रातील माझ्या कामाच्या अनुभवावर आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधील माझा अभ्यास तसेच प्रसिद्ध अभिनेते-शिक्षक आदिल हुसेन यांच्यासोबत केलेल्या कामाच्या आधारावर, मी अभिनेत्याचा सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रम विकसित केला आहे.” अनेक नाट्यमंडळी किंवा कलाकारांना कार्यशाळेसाठी लागणारी फी ही जास्त असते. त्यामुळे, अनेकांकडून वर्कशॉप टाळले जातात. पण सुव्रतने यावर ही उपाय काढून मुलांसाठी कमीत कमी फी ठेवण्याचा प्रयत्न केला आणि लवकरात लवकर आपण जागा बुक करावी असे सांगितले. या कार्यशाळेत मोठ्या संख्येने नाट्यकर्मी सहभागी होत आहेत.