रसिक प्रेक्षकांसाठी एक अगदी आनंदाची बातमी आहे. कारण ‘सृजन द क्रिएशन’ घेऊन येत आहेत ‘सृजनोत्सव २०२२‘ — एकांकिकांचा भव्य महोत्सव! येत्या १५ मे, २०२२ रोजी ‘सृजन द क्रिएशन’ या संस्थेचा दुसरा वर्धापन दिन आहे व त्या निमित्ताने, १ नाही, २ नाही, तर तब्बल ९ एकांकिकांचे सादरीकरण करून सृजन द क्रिएशनचा वर्धापन दिन रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे.
‘सृजन द क्रिएशन’बद्दल थोडंसं…
राजेश देशपांडे संस्थापित ‘सृजन द क्रिएशन‘ ची सुरुवात लॉकडाऊन मध्ये झाली. ऑनलाईन कार्यशाळांच्या माध्यमातून जगभरातील सृजनशील माणसे या संस्थेचा भाग होऊ लागले आणि पाहता पाहता ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्ताने जगभरातील सृजनशील माणसांचे हे कुटुंब बनत गेले. १६ ऑनलाईन आणि ५ प्रत्यक्षातल्या कार्यशाळांनंतर, हे कुटुंब विस्तारात जात आहे. वय वर्ष ७ ते ७० वयोगटातली लोकं इथे एकत्र येऊन अनेक कार्यक्रम व उपक्रमांचा भाग झाले आहेत. अनेक मान्यवरांनी हातचं काही राखून न ठेवता त्यांना मार्गदर्शन केलं व अजूनही करीत आहेत.
सृजनोत्सव २०२२
‘सृजन द क्रिएशन’ ही संस्था येत्या १५ मे रोजी २ वर्षांची होतेय. तेव्हा सकाळी १०:०० ते रात्री ११:०० वाजेपर्यंत ९ एकांकिकांचा ‘सृजनोत्सव २०२२’, सृजन द क्रिएशनचे कलाकार साजरा करणार आहेत. तिकिटाचा दर फक्त १५०/- असून, प्रबोधनकार ठाकरे, लघु नाट्यगृह, बोरिवली, येथे हा भव्य एकांकिका महोत्सव पार पडणार आहे. तिकीट विक्री शनिवार दिनांक १४ मे पासून नाट्यगृहावरच सुरू होणार आहे. फक्त देशभरातील विद्यार्थी नाही तर परदेशी असलेले सृजनचे विद्यार्थी व सदस्यसुद्धा या महोत्सवासाठी येणार आहेत.
या महोत्सवात रमेश पवार, आशिष पाथरे, वनमाला वेंदे, स्मिता पोतनीस, डॉ. स्मिता दातार आणि राजेश देशपांडे यांच्या विविध स्पर्धांमध्ये पारितोषिकप्राप्त एकांकिका सृजनोत्सवात सादर होणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमातल्या एकांकिकांच्या नेपथ्याची जबाबदारी संदेश बेंद्रे यांनी सांभाळली आहे व त्यांच्या प्रकाशयोजनेची धुरा श्याम चव्हाण यांनी सांभाळली आहे.
या कार्यक्रमात अनिल तांबे, शशांक पिटकर, दिपक लांजेकर, महेश येंद्रे, आदित्य गोमटे, गिरीश तेंडुलकर. गंधार बाबरे, श्रीपाद वैशंपायन, विष्णू सपकाळ, राज पवार, प्रतिक पवार, अमेय पोवार, यश भालेकर, संग्राम लवटे, संतोष राणे, अक्षय राणे, वैभव राणे, ओंकार खोचरे, प्रशांत सावंत, रिशील घोडेराव, अबीर श्रुंगारपुरे, सृजन देशपांडे, वैष्णवी चव्हाण, वनमाला वेंदे, अन्नदा परब, राज्ञी कुलकर्णी, सुरुची वीरकर, वर्षा सुर्वे, ऐश्वर्या परशुरामे, मंगल नाखवा, श्रद्धा घैसास जोशी, शिल्पा माहुली, अपूर्वा कामात लांजेकर, तन्मयी वैद्य, ऋचा सुर्वे, अपर्णा जाधव, कल्याणी गजगेश्वर, अनन्या जाधव, वरद शिराळे, विहान श्रुंगारपुरे व श्रेयन परब या ४१ कलाकारांची टोळी आहे.
सृजनोत्सव २०२२ मध्ये सादर होणाऱ्या एकांकिका
१) वस्तुस्तिथी
सजीव माणसांना मन असतं तसं वस्तुंना असेल का? मन असलं तर घरात झालेल्या घटनांविषयी ते आपसात काय बोलत असतील? याचे उत्तर तुम्हाला वस्तुस्थिती ही एकांकिका पाहून कळेल. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केले आहे, व या एकांकिकेला सुनील नार्वेकरांनी संगीताची जोड दिली आहे.
२) मॅड मॅडम ची मॅड शाळा
वनमाला वेंदे लिखित दिग्दर्शित ‘मॅड मॅडम ची मॅड शाळा’ हे एक विनोदी प्रहसन आहे. कोरोना मुळे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर परिणाम झालाय. शाळा सुरू झाल्यावर एखादी मॅड टीचर घरात जे काम करत असेल ते शाळेत करायला गेली तर काय होईल? मुलांना टीचरला लॅपटॉप मोबाईलमध्ये बघायची सवय झालेली असताना ते कधी व्हिडिओ ऑफ करतात किंवा टीचरला म्यूट करून नेट प्रॉब्लेम आहे असं सांगतात..पण आता शाळेत गेल्यावर ही मुले काय करतील हे पाहायला अतिशय धमाल येईल.
३) रोज मरे त्याला
मरण हे अंतिम सत्य असतं. माणूस येणाऱ्या प्रत्येक संकटाला घाबरू लागला तर जीवन मरणासारखे होऊन जाते. पण संकटाला भ्यायचं की तोंड द्यायचं? संकटांना घाबरणं मरण असतं आणि त्याला धैर्याने तोंड देणे जीवन. आशिष पाथरे लिखित ‘रोज मरे त्याला’ या एकांकिकेचे दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केले असून, या एकांकिकेच्या संगीताची बाजू वनमाला वेंदे यांनी सांभाळली आहे.
४) इडिया घर
माणसाचं जीवन निरागस राहिलं नाही. प्राणीच साधे असे आपण म्हणतो खरं, पण प्राण्यांना माणसांसारखी बुद्धी मिळाली तर? ते माणसांपेक्षा वेगळे वागतील की त्यांचे वागणे माणसांच्या वागण्याची अनुकृति होईल? राजेश देशपांडे लिखित दिग्दर्शित ‘इडिया घर’ ही एकांकिका याच विचाराभोवती फिरते. या एकांकिकेच्या संगीताची बाजू अंजली मायदेव यांनी सांभाळली आहे.
५) आपुले मरण
नातलग, मित्र मैत्रिणी, शेजारीपाजारी, सगळी नाती सांभाळताना आपण समजत असतो की इतकी माणसे आपल्या बरोबर आहेत, आपली आहेत. माणूस एकटेपणाला घाबरतो. पण जीवनातील सत्य काय असतं? माणूस आयुष्यभर गर्दीत एकटाच असतो याची जाणीव होणं हेच आपलं मरण आपण पाहण्यासारखं असतं. राजेश देशपांडे दिग्दर्शित या एकांकिकेचे लेखन स्मिता पोतनीस यांनी केले आहे व प्रितीश खंडागळे यांनी या एकांकिकेच्या संगीताची बाजू सांभाळली आहे.
६) झो झेंगाट झालं ना
माणसं खोटं बोलतात. ही सत्यापासून एक सुखद पळवाट असते ती स्वप्नात रंगण्याची. माणसं दुसऱ्यांना गोष्टी सांगताना स्वतःचे मनोरंजन करत असतील तर ते खरच गैर आहे का? याच विचारावर भाष्य करणारी ‘झो झेंगाट झालं ना’ या एकांकिकेची मूळ कथा द. मा. मिरासदार लिखित ‘नाना ९९ बाद’ या कथेवर आधारित आहे. या एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केले असून या एकांकिकेच्या संगीताची बाजू प्रतिक पवार यांनी सांभाळली आहे.
७) व्हेअर देअर इज ए विल
जीवन प्रत्येकाला प्रिय असतं. परंतु मरण गूढ असल्यामुळे सगळे त्याला घाबरतात. मुंगीही स्वतःचा जीव वाचवते. मग जीवन नेमकं नकोसं कधी होत असेल? आणि असं झालं तर जीवन जगायचं की मरायचं हा अधिकार माणसाला हवा की कायद्याच्या नियमात बांधलेला हवा? डॉ. स्मिता दातार लिखित या एकांकिकेचे दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केले आहे. त्याचबरोबर प्रतिक पवार यांनी या एकांकिकेला संगीताची जोड दिली आहे.
८) जांभुळ पडल्या झाडाखाली
माणसावर झाड पडलं असो वा कोणत्याही सामाजिक वैयक्तिक प्रश्न असो, माणूस एकदा लालफितीत अडकला की त्यातून त्याचा जीव जातो की प्रश्न सुटतो? जांभुळ पडल्या झाडाखाली ही एकांकिका याच प्रश्नाचे उत्तर देते. या एकांकिकेची मूळ कथा कृष्णचंदर यांची आहे. याचे लेखान व दिग्दर्शन राजेश देशपांडेंचे असून संगीत संग्राम लवटे यांचे आहे.
९) म्ह्या
चोरी करणारा चोर कायद्यानुसार गुन्हेगार, पण चोरी करणाऱ्या चोरांनी धमाल करताना जर शहर वाचवलं तर? रमेश पवार लिखित या एकांकिकेची कथा पन्नास वर्षांपूर्वीची आहे आणि ती दोन चोरांवर लिहिलेली आहे. पण ते चोर जर आत्ता चोरी करत असतील तर काय फरक पडेल? राजेश देशपांडे लिखित दिग्दर्शित ही एकांकिका याच प्रश्नाचे उत्तर देते.
रसिकांनी या एकांकिकांचा आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्रमुख राजेश देशपांडे ह्यांनी केले आहे. तेव्हा ९ दमदार एकांकिका पाहण्याची सुवर्णसंधी रसिक प्रेक्षकांनी साधावी व ‘सृजनोत्सव २०२२’ ला मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी.