मुंबई नगरीच्या हृदयस्थानी वसलेले दादर येथील नाट्यरसिकांचे लाडके, ‘श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह’ पुन्हा एकदा नव्याने सुरू होणार आहे आणि तेही अगदी नव्या रुपात! कित्येक अजरामर कलाकृतींनी संपन्न अशा या पवित्र वास्तूचा ताजातवाना चेहरा जगाच्या कानाकोपऱ्यात पसरावा आणि नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालेल्या श्री शिवाजी मंदिरचे नवे रुपडे नाट्यरसिकांना बघता यावे, या मनीषेने आम्ही २७ एप्रिल रोजी, श्री शिवाजी मंदिरची भेट घेतली आणि ही ‘Exclusive’ भेट आम्ही व्हिडिओ स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.
२७ एप्रिल रोजी सकाळी ८:३० वाजल्यापासून नाट्यगृहातील तिकीट खिडकीवर बुकिंग सुरू करण्यात आले. प्रेक्षकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. लोक नाटकांचे फलक वाचून जात होते, तिकीट खिडकीवर चौकशी करत होते, आवडत्या नाटकांची तिकिटेही बुक करण्यात मग्न होते. एक आजी प्रवेशद्वाराजवळून जात असता नाटकांचे फलक बघून, ‘अरे व्वा! पुन्हा सुरू होतंय की काय!’, असे स्वत:शीच गुणगुणत खुशीखुशीत निघून गेल्या. आम्ही काही प्रेक्षकांशी संवादही साधला. शिवाजी मंदिरच्या नूतनीकरणासोबतच या गप्पाही तुम्हाला प्रस्तुत व्हिडिओमध्ये बघता येणार आहेत.
Note: व्हिडिओमध्ये संपूर्ण नूतनीकरण संदेश बेंद्रे यांनी केले आहे, असा उल्लेख झाला आहे. परंतु, नाट्यगृहाचे इंटिरिअर करण्यात ‘G.L. Pangam & Associates, Architechts & Interior Designers’ यांचा मोठा वाटा आहे व ‘संदेश बेंद्रे’ यांनी रंगमंचाचे नूतनीकरण केले आहे. तसेच, सिव्हिल इंजिनिअर ‘संतोष शिंदे’ यांनी सल्लागाराची भूमिका बजावली. या संपूर्ण टीमचे पुन्हा एकदा अभिनंदन!!!
असंख्य कलाकारांच्या अजरामर कलाकृतींनी समृद्ध अशीही वास्तू! आजवर अनेक कलाकारांनी त्यांच्या नाटकाचा पहिला प्रयोग याच नाट्यगृहात सादर केला आहे. ही वास्तू आजही त्यांच्या रंगमंचावरील उत्तमोत्तम सादरीकरणाची साक्ष देत राहते. आजच्या काळातले आघाडीचे नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी शिवाजी मंदिरच्या रंगमंचाच्या नूतनीकरणाची धुरा सांभाळली आहे. नाट्यगृहाचे इंटिरिअर करण्यात ‘G.L. Pangam & Associates — Architechts & Interior Designers‘ यांचा मोठा वाटा आहे. डॉ. स्मिता चोगले या नूतनीकरणात अकॉस्टिक्स (ध्वनीशास्त्र) सल्लागार होत्या. तसेच, संतोष शिंदे यांनी श्री. छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट), मुंबई यांच्या नियामक मंडळाचे सल्लागार म्हणून भूमिका पार पाडली. नूतनीकरणाचे महत्वाचे वैशिष्टय म्हणजे या संपूर्ण टीमने श्री शिवाजी मंदिर या पवित्र वास्तूचा मूळ बाज कायम ठेवत, त्यावर एक सुबक आणि सुंदर असा साज चढविला आहे. त्यावर उगीचच अनेकानेक रंगछटांचा खोटा मुलामा अजिबात नाही. त्यामुळे या नाट्यगृहातील जुन्या आठवणी न पुसताच नव्या आठवणींचा प्रवास त्यांच्याशी जोडला जाणार आहे.
रुबाबदार रेखीव कमान, रंगमंचाच्या दोन्ही बाजूंना कोरलेली नक्षी, त्यासोबत नव्या ढाली व तलवारी, ‘श्री शिवाजी मंदिर‘ हे नव्या हस्ताक्षरातील नाव या सर्व गोष्टी अतिशय देखण्या आणि सुबक आहेत. रंगमंचाची रुंदीही ५ फुटाने वाढविण्यात आलेली आहे. पुरुष कलाकारांच्या मेकअप रुमही आता वातानुकूलित करण्यात आल्या आहेत. रंगमंचासोबतच नाट्यगृहाचे इंटिरियरदेखील बदलण्यात आले आहे. त्याचे डिझाईन आणि रोषणाई मन मोहून टाकणारी आहे. जिगिषा अष्टविनायक च्या ‘संज्या छाया‘ या नाटकाच्या प्रयोगाने श्री शिवाजी मंदिर, २९ एप्रिलपासून पुन्हा नवा श्वास घेणार आहे. त्यानंतर ओळीने ‘अलबत्या गलबत्या’, ‘मी, स्वरा आणि ते दोघं‘, ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे‘, ‘चमत्कार‘, ‘दादा एक गुड न्युज आहे‘, ‘आमने सामने‘, ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ या नाटकांचे प्रयोग सादर होणार आहेत.
नाट्यगृहातील फलकांचे अनावरण सूत्रधार गोट्या सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तसेच, ३ मे रोजी नाट्यगृहाच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ‘श्री शिवाजी मंदिर नूतनीकृत नाट्यगृहाचा उदघाटन सोहळा‘ पार पडणार आहे. या कार्यक्रमाला श्री शिवाजी मंदिर ट्रस्टचे सभासद आणि मा. नामदार, श्री. अमितजी देशमुख, मा. नामदार श्री. उदयजी सामंत हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तुम्हीही लवकरात लवकर श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहाला व येथे सादर होणाऱ्या अनेकानेक नाट्यकृतींना भेट द्या आणि नाट्यगृहाबद्दलच्या व नाटकांबद्दलच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका.