मुंबईतील दादरस्थित श्री शिवाजी मंदिर हे नाट्यगृह आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचं आहे. दिग्गज रंगकर्मींच्या अजरामर कलाकृतींचा इतिहास लाभलेलं हे नाट्यगृह रसिक प्रेक्षकांसाठी भावनिक पातळीवर किती महत्वाचं ठरतं, हेही आपण जाणतो. परंतु, येत्या काही काळात, प्रेक्षकांना या नाट्यदालनापासून थोडं लांब राहावं लागणार असं दिसतंय. कारण, तब्बल २३ नाटकांकडून या नाट्यगृहावर येत्या १ जानेवारी, २०२४ पासून बहिष्कार टाकण्यात आलेला आहे.
Marathi Natak Producers Boycott Shree Shivaji Mandir Theatre
रसिक प्रेक्षकांचं मन जिंकतील अशी चांगली आणि दर्जेदार नाटकं सध्या रंगभूमीवर गाजतायत. येत्या ‘वीकेंड’ला नेमक्या कुठल्या नाटकाला प्राधान्य द्यावं, असा प्रश्न दर आठवड्याला प्रेक्षकांच्या मनात डोकावत आहे, आणि हीच खरं तर नाटकांसाठी जमेची बाजू आहे. पण अशातच, एका मोक्याच्या ठिकाणी वसलेल्या नाट्यगृहात, रसिक प्रेक्षकांना त्यांची आवडती नाटकं दाखवली जाणार नसतील तर? श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहासोबत असंच काहीसं घडत असल्याचं दिसून येतंय. कारण, या नाट्यगृहावर २३ नाटकांकडून येत्या १ जानेवारी, २०२४ पासून बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. यामागचं स्पष्ट कारण लक्षात आलेलं नसलं तरी सूत्रांनुसार, एक नाही तर बरीच कारणं यामागे आहेत, याचा अंदाज बांधता येतोय. श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहाचे विश्वस्त आणि यादीत नमूद केलेल्या नाटकांचे निर्माते यांच्यामध्ये काही दुमत झाल्यामुळेच नाट्यनिर्मात्यांना हे पाऊल उचलावे लागले असणार हे उघड आहे. परंतु, नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तरीही, थिएटर बुकींगमधील भाडेवाढ किंवा बदललेले नियम व अटी, अशी काही कारणं रंगकर्मींकडून कानावर येत आहेत. अद्याप याबद्दल कोणत्याही रंगकर्मीकडून भाष्य करण्यात आलेले नाही.
Shri Shivaji Mandir Theatre Boycott by Marathi Natak
काही दिवसांपूर्वी, परळमधील दामोदर नाट्यगृह बंद झाल्याचा शोक रंगकर्मींना अनावर झाला होता. त्यातच दादरमधील रवींद्र नाट्यमंदिर नूतनीकरणासाठी बंद झाले. त्यामुळे, तेथील परिसरातील रसिक प्रेक्षकांसाठी आधीच पर्याय कमी झाले होते. त्यातच श्री शिवाजी मंदिर सारख्या मध्यवर्ती आणि प्रवासाच्या दृष्टीने सोयीस्कर ठरणाऱ्या नाट्यगृहावर २३ दर्जेदार नाटकांकडून बहिष्कार म्हणजे दुष्काळात तेरावा महिना! इतकी मोठी भूमिका घेण्यामागे नाट्यनिर्मात्यांची खूप गंभीर कारणं असणार, हे निर्विवाद आहे. ती कारणं आम्हाला कळताच आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. पण, श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहाचे विश्वस्त आणि नाट्यनिर्माते यांनी लवकरात लवकर वाद मिटवून रंगकर्मी व नाट्यरसिकांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी विनंतीवजा अर्ज आपण तूर्तास व्यक्त करू शकतो.