वसंत कानेटकर, प्रभाकर पणशीकर, डॉ. काशिनाथ घाणेकर, डॉ. श्रीराम लागू, चित्तरंजन कोल्हटकर या आणि अशा कितीतरी दिग्गजांच्या ऐतिहासिक कलाकृतींनी अजरामर झालेलं आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून राहिलेलं असं आपलं लाडाचं शिवाजी मंदिर नाट्यगृह! या नाट्यगृहाला आज ३ मे, २०२० रोजी ५५ वर्षे पूर्ण झाली. मुंबईकरांसाठी शिवाजी मंदिर हे फक्त एक नाट्यगृह नसून एक भावना आहे!
काही वर्षांपूर्वी याच नाही तर प्रत्येक नाट्यगृहाला उतरती कळा लागली होती. शिवाजी मंदिरमध्ये नाटकाच्या तिकिटांसाठी होणारी गर्दीही आता पूर्वीसारखी दिसत नव्हती. लोक नाट्यगृहातील सादरीकरणाचा जिवंत अनुभव सोडून घरी असलेल्या इडियट बॉक्समध्ये अडकून पडू लागले होते. पण आजकाल नाट्यगृहांकडे जाणाऱ्या लोकांची गर्दी पुन्हा वाढू लागली आहे. रंगभूमीला जणू काही पुन्हा सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. तिकीटसुद्धा आता Online मिळत असल्याने तिकिटासाठी गर्दी दिसत नसली तरी प्रयोग हाऊसफुल असतात! आजच्याच दिवशी १९६५ साली शिवाजी मंदिरची स्थापना झाली. असं सांगितलं जातं की शिवाजी मंदिर हे नाट्यगृह उभं होण्याआधी त्या जागेवर कुस्तीचा आखाडा होता. नूतनीकरणानंतरही स्वत:चा साधेपणा राखून ठेवलेलं आणि मुंबईच्या हृदयात असलेलं हे नाट्यगृह जणू काही प्रेक्षकांमधील नाट्यवेड्याला सतत साद घालत असतं.
अशा ह्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या संस्कारांतर्गत प्रगल्भ झालेल्या या वास्तुला रंगभूमी.com च्या टीम कडून मानाचा मुजरा! तसेच ५५ वर्षांच्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा! आम्ही ही आशा व्यक्त करतो की मायबाप रसिक प्रेक्षक कधीच या आणि इतर कुठल्याच नाट्यगृहांकडे पाठ फिरवणार नाहीत आणि बघता बघता नाट्यगृहांना ७०-७५ च नाही तर १०० वर्षदेखील पूर्ण होतील.
[Image via Google Business Listing]