‘क्रेसेंट थिएटर’चं शनैश्वरम् (दशावतार) हे नाटक सध्या प्रेक्षकांची खूपच वाहवा मिळवतंय. नाटकाचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की या नाटकातील बहुतांशी कलाकार हे ‘मुंबई स्कूल ऑफ ड्रामा’ या संस्थेतून अभिनयाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण संपादन केलेले विद्यार्थी आहेत. दशावतार हा लोकनाट्यप्रकार अतिशय लोकप्रिय आहे. कोकणात हा नाट्यप्रकार जितका सर्रास बघायला मिळतो तितकाच शहरांमध्ये तो आजही दुर्मिळच आहे. गावी वा इतरत्र किमान एकदा तरी दशावतार बघितलेल्या कित्येकांना, त्या अनुभवाबद्दल बोलताना रममाण होऊन जाताना मी स्वतः अनुभवलंय. ‘क्रेसेंट थिएटर’ने आज तमाम प्रेक्षकांसाठी दशावतार बघण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. मुंबईत या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग सध्या जोरात सुरू आहेत. ७ जुलै रोजी मुलुंड येथील प्रयोग ऐन रंगात आलेला असताना असं काही घडलं जे अनपेक्षित होतं. पण नाटकातील कलाकारांनी, खास करुन नवोदित विद्यार्थ्यांनी प्रसंगावधान दाखवत जे काही केलं ते कौतुकास्पद होतं.
नाटकात झालं असं की…
रविवार, ७ जुलै रोजी, मुलुंड मधील ‘महाराष्ट्र सेवा संघ’ येथील शनैश्वरम् (दशावतार) नाटकाचा जेमतेम तिसराच प्रयोग आयोजित करण्यात आला होता… बाहेर पावसाची रिमझिम सुरूच होती. प्रयोग ऐन रंगात आलेला असताना अचानक सभागृहातील लाईट्स गेले. परंतु, अचानक उद्भवलेल्या या अडथळ्यामुळे कलाकार थांबले नाहीत. ‘शो मस्ट गो ऑन!’ हे ब्रीदवाक्य जोपासत काळोखातही त्यांनी संवाद सुरू ठेवले. प्रयोगादरम्यान घडणाऱ्या अशा प्रसंगांना तोंड देण्यासाठी कलाकार नेहमीच सज्ज असतात, हे आपण जाणतो. पण, या प्रयोगात कलाकारांचा जोश बघून प्रेक्षकांनीही आपापल्या मोबाईलचे टॉर्च सुरू केले. त्या मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात पुढील ७-८ मिनिटे प्रयोग सुरू राहिला. तोपर्यंत, सभागृहाच्या व्यवस्थापकांनी जनरेटर सुरू केले. पुन्हा लाइट्स आले आणि पुढील प्रयोग बिनदिक्कत पार पडला.
या संपूर्ण प्रसंगातील कौतुकास्पद गोष्ट म्हणजे ‘मुंबई स्कूल ऑफ ड्रामा’ या संस्थेतील विद्यार्थ्यांनी अचानक ओढावलेल्या परिस्थितीवर केलेली मात आणि प्रेक्षकांनी त्यांच्या हजरजबाबीपणाला दिलेली सकारात्मक साथ!
‘मुंबई स्कूल ऑफ ड्रामा’ या संस्थेच्या १ वर्षाच्या अभिनय प्रशिक्षण कार्यशाळेच्या नवीन बॅचेस सुरू झाल्या आहेत. लवकरात लवकर संपर्क करा. यापुढेही रंगदेवता शनैश्वरम् दशावतार नाटकाच्या संपूर्ण टीमवर अशीच प्रसन्न राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!