क्लेअर डॉवी लिखित ‘why is jhon lennon wearing a skirt?’ या नाटकाचे अनुसर्जन म्हणजेच ‘शक्तीमान ने स्कर्ट का घातलाय?’ हे तेजस कुलकर्णी दिग्दर्शित एकलनाट्य आपल्या भेटीसाठी सज्ज झाले आहे. समाजात स्त्री अथवा पुरुष या दोन लिंगांपैकी एखादं लिंग स्वीकारणं प्रत्येक मनुष्याला अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त काही भावना त्याने व्यक्त केली अथवा लक्षणं त्याने दर्शविली तर त्याला समाजमान्यता मिळत नाही. याच विषयाला अनुसरून समाजाच्या लिंगरचनेकडे बघण्याच्या निरर्थक स्वभावाबद्दल सडेतोड भाष्य करणारं हे नाटक आहे. भाग्यश्री पवार ही या नाटकातील अभिनेत्री आहे.
‘शक्तीमान ने स्कर्ट का घातलाय?‘ हे नाटक क्लेअर डॉवीच्या why is jhon lennon wearing a skirt? या नाटकाचे अनुसर्जन. लिंगअपेक्षा (Gender Expectations) आणि स्टिरियोटाइप बद्दलचं हे एक बेछूट आणि आक्रमक एकल नाट्य आहे. हे एका अश्या व्यक्तीचं ‘म्हणणं’ आहे; जिला ‘मुलगी’ व्हायचं नाही, स्कर्ट घालायचे नाहीत आणि ‘शक्तीमान’ व्हायचं आहे. अनिवार्य शालेय स्कर्टच्या अव्यवहार्यतेबद्दल निराश होऊन जे बोलणं सुरू होतं ते अनिवार्य स्त्रीत्वाच्या विरोधात एक स्पष्ट, उत्कट आणि स्फोटक भाष्य बनतं. ‘शक्तीमान ने स्कर्ट का घातलाय?’ हे समाजाच्या लिंगरचनांच्या आक्रमक मजबुतीकरणाचा आणि तुम्हाला जे व्हायचं आहे ते बनण्याचा मार्ग शोधण्यात येणार्या अडचणींचा एक तीव्र निषेध आहे.
हे नाटक १२ जून रोजी सायंकाळी ७ वाजता द बेस, एरंडवणे, पुणे येथे सादर होणार आहे. या अनोख्या विषयाला हात घालण्याचा विचार केल्याबद्दल नाटकाच्या संपूर्ण टीमचे कौतुक करावे तितके कमीच! प्रेक्षकांनी हा चाकोरीबाहेरचा विषय हाताळणाऱ्या नाटकाला भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती!