वीर-झारा, रोमिओ-ज्युलिएट, राज-सिमरन या आणि अशा काही खास ऑन-स्क्रीन जोड्या कित्येक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर गारूढ करुन आहेत. जानेवारी, २०२२ मध्ये या यादीत अजून एका सुपरहीट जोडीचं नाव जोडलं गेलं. ते म्हणजे, ‘संज्या छाया’! इतर जोडयांप्रमाणे गुडीगुडी किंवा भडक लव्ह स्टोरी नाही तर त्यांच्या आयुष्यातील साधेपणा हीच या जोडप्याची खासियत आहे आणि याच साधेपणाच्या जोरावर २७ नोव्हेंबर रोजी ‘संज्या छाया’ दमदार सेंच्युरी पूर्ण करणार आहेत.
प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘संज्या छाया’ हे नाटक सहज सोप्या आयुष्याची व्याख्या करुन देतं. सहज सोपं आयुष्य कसं जगावं यासाठी मार्गही सुचवतं. प्रशांत दळवी यांचं दर्जेदार लेखन, वैभव मांगले व निर्मिती सावंत या कसलेल्या कलाकारांच्या अभिनयामधील जुगलबंदी, त्यांना सुनील अभ्यंकर, योगिनी चौक-बोऱ्हाडे, अभय जोशी, आशीर्वाद मराठे, मोहन साटम, संदीप जाधव, राजस सुळे या कलाकारांची मिळालेली साथ आणि या कलाकारांचा रंगमंचावरील वावर सहजसोपा करणारं चंद्रकांत कुलकर्णी यांचं दिग्दर्शन हे या नाटकाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. या नाटकाला यंदाच्या ‘मा. दीनानाथ मंगेशकर’ पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे. या नाटकाचे विस्तृत समीक्षण तुम्हाला या लिंकवर वाचता येईल. तसेच, नाटकाचा रिव्ह्यू व्हिडीओ पुढील लिंकवर बघता येईल.
जिगीषा व अष्टविनायक या नाट्यसंस्थांची निर्मिती असलेल्या, ‘संज्या छाया’ या नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग रविवार, २७ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात दुपारी ४ वाजता हा प्रयोग होणार आहे. यावेळी ‘संज्या छाया’ या नाटकाच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा अनोख्या पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे.
प्रदीप मुळे यांनी या नाटकाचे नेपथ्य केले असून, रवी-रसिक यांची प्रकाशयोजना या नाटकाला आहे. नाटकाचे पार्श्वसंगीत पुरुषोत्तम बेर्डे यांचे आहे. दासू यांनी गीतलेखन केले असून, अशोक पत्की यांनी या नाटकाचे संगीत केले आहे. प्रतिमा जोशी व भाग्यश्री जाधव यांची वेशभूषा आणि उलेश खंदारे यांची रंगभूषा या नाटकाला लाभली आहे. दिलीप जाधव व श्रीपाद पद्माकर हे या नाटकाचे निर्माते असून, प्रणित बोडके हे सूत्रधार आहेत.
शतकपूर्ती करणाऱ्या ‘संज्या-छाया‘च्या जोडीला प्रेक्षक असेच भरभरून प्रेम देत राहतील याबद्दल शंकाच नाही. रंगभूमी.com कडून संज्या-छाया च्या संपूर्ण टीमला १०० व्या प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा!