रंगभूमीवर अनेक नाटक अजरामर झाली. अनेक नाटक त्यातील कलाकार महाराष्ट्रात सर्वाधिक प्रयोग करून लोकांच्या मनात रुजू झाले. असेच एक बहारदार विनोदी नाटक म्हणजे सही रे सही. या नाटकाने अनेक कलाकार घडवले. सही रे सही या नाटकाचा पहिला प्रयोग १५ ऑगस्ट २००२ ला झाला आणि यंदाच्या वर्षी हे नाटक २० वर्ष पूर्ण करत आहे.
सही रे सही चा प्रवास
लता नार्वेकर यांच्या श्रीचिंतमणी निर्मित केदार शिंदे लिखित आणि दिग्दर्शित ‘ सही रे सही’ नाटकाचा पहिला प्रयोग १५ ऑगस्ट २००२ रोजी झाला आणि सही रे सहीला सुरुवात झाली. हे नाटक उभे राहिले ते भरत, अंकुश आणि केदार शिंदे यांच्या मैत्रीमुळे. एका सही रे सहीच्या प्रयोगानंतर डॉ. श्रीराम लागू म्हणाले ” या नाटकातील प्रमुख नट आणि दिग्दर्शक नक्कीच घनिष्ट मित्र असले पाहिजेत त्याशिवाय एवढं वेगवान नाटक उभ राहूच शकत नाही”. कालांतराने सुधीर भटांचे सुयोग निर्मित सही रे सहीने प्रेक्षकांची मन जिंकली आणि आता भरत जाधवची एन्टरटेन्मेंट निर्मिती करत आहे. सही रे सही’ नाटकाच्या पहिल्याच वर्षात ३६५ दिवसात ५६७ प्रयोग हे हाऊसफुल्ल झाले आहेत. २००३ मधील अल्फा गौरव पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतचे पारितोषिक मिळवले. कोरोना काळात नाट्यसृष्टी काही काळासाठी थांबली आणि ‘ पुन्हा सही रे सही’ ने रंगभूमी सजवण्यास सुरुवात केली. टाळेबंदीनंतर पुण्यात प्रयोग करून पुन्हा प्रवासाला सुरुवात झाली. २०१९ मध्ये या नाटकाने ३००० प्रयोग पूर्ण केले तर यंदाच्या वर्षी ५००० प्रयोगांचा टप्पा गाठणार आहेत.
भरत आणि केदार यांचा किस्सा
मी ‘सही रे सही’ सोडतोय… असं मी १९ वर्षांपूर्वी केदार ला म्हणालो होतो. याला कारण होत ‘गोड गोजिरी’ गाण. ‘श्रीमंत दामोदर पंत’ मध्ये आधीच एकदा हे गाणं करून झालं होतं. आणि केदार ची इच्छा होती की ‘सही रे सही’ मधील हरी या पात्राची एन्ट्री याच गाण्याने व्हावी. आधीच्या नाटकात वापरलेलं गाण पुन्हा या नव्या नाटकात घेण्याबद्दल मी नाराज होतो. याला कारण होत की आज जरी ‘श्रीमंत दामोदर पंत’ हे रसिकांच्या पसंतीच नाटक असलं तरी प्रत्यक्षात रंगभूमीवर या नाटकाला तितकं यश त्या काळी मिळालं नव्हतं. केदार आपल्या निर्णयावर ठाम होता आणि या गाण्यावर न नाचण्यावर मी ठाम होता. शब्दाला शब्द वाढत गेला, अक्षरशः आमच्यात भांडण झाली आणि मी ‘सही रे सही’ सोडण्याचा निर्णय घेतला. या भांडणातून तोडगा काढण्यासाठी शेवटी आम्हा दोघांचाही प्रिय मित्र अंकुश चौधरी याने कृष्णशिष्ठाई केली. आणि प्रयोगा पुरत हे गाणं करून पाहायचं ठरवलं. जर पहिल्या प्रयोगात या गाण्याला चांगला रिस्पॉन्स नाही मिळाला तर हे गाणं काढून टाकायचं ठरल.
१५ ऑगस्ट २००२ ला पहिला प्रयोग झाला आणि या गाण्यावर अक्षरशः टाळ्या आणि शिट्ट्यानी नाट्यगृह दणाणून गेल. आजही या गाण्याला वन्स मोअर रिस्पॉन्स मिळतो. गोड गोजिरी वरील दामुचा डान्स आज एक सिग्नेचर स्टेप बनलीये. आणि ‘सही रे सही’ चा इतिहास सर्वश्रुत आहे. भरत जाधव
पुन्हा सही रे सहीला सुरुवात
“१९ वर्ष आज पुर्ण होतायत. १५.०८.२००२ रोजी हा “सही” रथ ज्या भरधावाने निघाला तो अजूनही त्याच वेगात आहे. मला अजूनही आठवतो तो दिवस. माझ्या टाटा इंडिका गाडीतून मी आणि भरत, शिवाजी मंदिरच्या दिशेने निघालो… तेव्हा एकच गोष्ट मी भरतला वारंवार सांगत होतो. “भरत आज दिवस तुझा आहे. जे जे आजपर्यंत करावसं वाटत होतं, ते साकार करण्याचा आजचा दिवस आहे. मी पडदा उघडल्यावर पडद्यामागे असणार. रंगमंच तुझा असणार आहे. त्यामुळे बागड त्या रंगमंचावर! आपल्या आण्णांनीच तो रंगमंच बांधलाय असं समज!” आणि… भरत जाधव याने परत परत परत परत तेच केलं. तब्बल १९ वर्ष.
या संपूर्ण प्रवासात त्याच्या सोबत त्याच तडफेने काम करणारे कलाकार आणि पडद्यामागचे तंत्रज्ञ… त्यांचं प्रेम अजूनही या जादूई नाटकावर तेवढच आहे आणि तेवढच राहील. मी मुलीच्या बापाच्या भुमिकेत होतो आणि राहीन ! आपण लाडाने प्रेमाने मुलीला वाढवायचं आणि योग्य वेळी तीचं लग्न लावल्यावर तीचा सुखाचा संसार पाहायचा! या दरम्यान मुलीला काही अडचण, त्रास झाला तर वेळोवेळी तत्परतेने पाठीशी उभंही राहायचं. माझ्या या मुलीचं लग्न भरत जाधव या कर्तव्यतत्पर मुलाशी लावलं. या दरम्यान “सासवा” बदलल्या. मुलीला आणि भरतलाही त्याचा त्रास झाला. पण नेटाने त्याने संसार केला. आणि आता तर त्याने स्वत:चा संसार थाटलाय. खुप समाधान वाटतं!!!! हे नाटक कधी बंद होऊ नये.. पण जेव्हा हे थांबेल त्याला कारणीभूत भरतच असेल. तो जोवर तडफेने काम करतोय तोवर हे नाटक सुरू राहील. त्याला कंटाळा येईल तेव्हा हे थांबेल! पण मला वाटत नाही की, अजून १९ वर्षाने ही वेळ येईल! कोरोनाच्या पार्श्वभुमिवर नाटक थांबलय. त्यामुळे खुप नुकसान कलाकार, तंत्रज्ञांचं होतय !!! पण त्याही पेक्षा अधिक नुकसान रसिक प्रेक्षकांचं होतय. त्यांचं दिलखुलासपणे हसणं थांबलयं. पण काळजी नको. कोरोनापें रोने के बाद, त्यावर जालिम इलाज फक्त एकच असणार आहे… “सही”
श्री स्वामी समर्थांच्या कृपेने अशी कलाकृती माझ्या हातून घडली. पण यात माझ्या पाठीमागे असणारे स्वामी होतेच, पण त्या सोबत अजून एक व्यक्ती होती, माझा मित्र अंकुश चौधरी.. मी, भरत, अंकुश या तिघांच्या मैत्रीचं प्रतिबिंब म्हणजे… “सही” #लवकरच भेटू केदार शिंदे
काही कलाकृती या विलक्षण असतात. त्यांपैकी एक म्हणजे सही रे सही ही विश्वविक्रमी कलाकृती. २० वर्ष होऊनदेखील सही रे सही हे नाटक तितकंच लोकप्रिय आहे.. प्रेक्षक अजूनही दिलखुलास प्रतिसाद देतात आणि मंत्रमुग्ध होऊन जातात. कारण सही रे सही म्हणजे जादुई अनुभव आहे आणि याचं श्रेय सर्वस्वी केदार शिंदे सर आणि भरत जाधव सर यांना जातं. या नाटकाच्या संपूर्ण टीमचादेखील तितकाच मोलाचा वाटा आहे आणि मी खरोखर भाग्यवान आहे की या प्रतिष्ठित कलाकृतीचा मी एक भाग आहे. नाटकात काम करताना खूपच धमाल येते आणि भरत सरांसोबत व पूर्ण टीमसोबत काम करण्याचा अनुभव तर खूप काही शिकवतो आहे. गौरी फणसे (अभिनेत्री)
सही रे सही आणि भरत जाधवने निभावलेल्या चार पात्राचे अनेक चाहते आहेत. चाहत्यांकडून आणि www.rangabhoomi.com कडून संपूर्ण सही रे सही टीमला असेच अजरामर राहण्यासाठी खूप खूप शुभेच्छा!