लॉकडाऊनमुळे सगळे घरात कैद झाले. आपल्या मराठी नाट्यसृषटी ला देखील कुलूप लागलं. त्यामुळे अनेक नाटके जी रंगभूमीवर अगदी नवीन होती, त्यांच्या प्रयोगांमध्ये खंड पडला. पण जसा लॉकडाऊन उघडत चाललाय तसेच बरीच नाटके रंगमंचावर पुनरागमन करत आहेत. त्यातलं एक नाटक म्हणजे सागर कारंडे ह्यांचे ‘इशारो ईशारो में’ हे नाटक!
दिग्दर्शक जय कपाडिया, ह्यांचे ‘ईशारों ईशारों में’, ह्या नाटकाचा, पहिला प्रयोग २५ जानेवारी २०२० रोजी पार पडला. परंतु अखंड देशभर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे १५-१६ प्रयोगांनंतर नाटक बंद पडले होते. डिसेंबर २०२० ला बोरिवलीमध्ये नाटकाचा पुनश्च हरी ॐ झाला. ह्या १७ व्या प्रयोगनिमित्त कलाकार खूपच आसुसले होते. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात हा प्रयोग पार पडला.
एका संगीतकाराची काय इच्छा असते? त्याचे गाणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे. त्याचे गीत ऐकले जावे. पण असाच एक संगीतकार जर एखाद्या बहिऱ्या मुलीच्या प्रेमात पडला तर काय गंमत होईल? त्यांचा संवाद कसा होईल? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारं एक अनोखं मनोरंजक नाटक म्हणजे ‘ईशारों ईशारों में’. अनेक छटा असलेली, ही एक प्रेम कथा आहे. नाटकाच्या प्रमुख भूमिकेत, घराघरात पोहोचलेला चेहरा, सागर कारंडे हे संजय देशमुख, या गाण्यावर अतिशय प्रेम करणाऱ्या एक संगीतकाराची भूमिका निभावतात. संजना हिंदुपूर ही सरगम ह्या मुक्या-बहीऱ्या मुलीची भूमिका निभावते. अभिनेते उमेश जगताप, कौन्सिलर ची भूमिका निभावतात. आणि शशिकांत गंगावणे हे सागर कारंडे ह्यांच्या मोठ्या भावाचे पात्र निभावतात. ते हृदय तज्ञाच्या भूमिकेत आपल्याला दिसतात. एका संगीतकाराचा एका मुक्या-बहीऱ्या मुलीबरोबर संसार, ही कल्पनाच मुळात नवीन आहे, वेगळी आहे. ऐकून असंभवच वाटत. पण उत्कृष्ट अभिनेत्यांची ही पंगत प्रेक्षकांना अगदी आकर्षित करते व भुरळ घालते.
‘ईशारों ईशारों में’ नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २५ डिसेंबर रोजी दुपारी ४:३० वाजता आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण येथे सादर होणार आहे. तुम्ही BookMyShow वरुन तिकिटं बुक करू शकता. नाटकाची संपूर्ण टीम अगदी आवर्जून प्रेक्षकांची वाट पाहत आहे.