रिवायत प्रोडक्शनने रसिक प्रेक्षकांकरिता येत्या रविवारसाठी एक सुंदर बेत आखला आहे. अवतार प्रोडक्शन्स निर्मित ‘पूर्ण वर्तुळ’ आणि कलाकार मंडळी प्रस्तुत व अनाम निर्मित ‘पाहुणचार’ ह्या दोन्ही एकांकिकांचा आस्वाद प्रेक्षकांना एकाच तिकिटात घेता येणार आहे. या दोन्ही नाटकांचे प्रयोग दिनांक १० जुलै रोजी, १२:३० वाजता, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे येथे सादर होणार आहेत.
पूर्ण वर्तुळ — अन्यायाचा प्रतिशोध घेणारी एक रोमांचक एकांकिका.
लेखन व दिग्दर्शन — समर्थ चाफेकर
कलाकार — अतुल कुडलेन, दीपेंती चिकणे, वेदांत कुलकर्णी, शुभम राजापूरकर, अवनी हरकरे, वैभव जुमडे, आकाश हळगावकर.
स्री सक्षमतेच्या क्रांतिकारी विचाराची एक दुसरी बाजू ह्या नाटकात मांडली आहे. आपल्याला मिळणाऱ्या अधिकाराचा व सुरक्षिततेचा महिलांद्वारे होणारा चुकीचा वापर ह्या नाटकात दाखवला आहे. तसेच अशा खोट्या आरोपाच्या पिंजऱ्यातून मुक्त होऊन न्याय मिळवण्यासाठी पेटून उठलेल्या एका पात्राची वर्तुळाकार कथा ही एकांकिका पूर्ण करते.
सुखी संसारात असलेल्या एका युवकाच्या भूतकाळात एक खोल जखम असते. त्याच्या वडिलांवर त्यांच्याच ऑफीसमध्यें काम करणाऱ्या एका महिलेने बलात्काराचा खोटा आरोप केलेला असतो आणि त्याच्या निर्दोष वडीलांना एक आरोपी म्हणून जीव गमवावा लागतो. सत्याची कास धरणाऱ्या त्या युवकाला सत्य समजतच. आपल्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी तो फक्त योग्य संधीची वाट बघत असतो. ती संधी त्याला मिळते आणि तो आपला बदला पूर्ण करतो. असं हे न्याय अन्यायाचं वर्तुळ पूर्ण करणारी ही एकांकिका पाहण्यासारखी आहे. ही कथा मांडताना प्रव्रुत्तीमधला संघर्ष दिग्दर्शकाने अतिशय रोमांचक व उत्कंठावर्धक पद्धतीने मांडला आहे.
जेव्हा एखादी चुकीची गोष्ट घडते तेव्हा त्या गोष्टीचे परिणाम सतत आपला पाठलाग करत राहतात. तो पाठलाग नंतर त्रासदायक व जीवघेणा ठरतो. हेच अन्यायी असलेले परिणाम संपविण्याची व न्यायाचा प्रतिशोध घेणारी कथा म्हणजे ‘पूर्ण वर्तुळ’.
पाहुणचार — गावातल्या आपलेपणाच्या पाहुणचाराची एक गोष्ट.
लेखन — शंकर पाटील
दिग्दर्शन — सुरज राजेजाधव
ही एकांकिका, सुप्रसिद्ध चित्रपट ‘पिंजरा’ ह्याचे लेखक ‘शंकर पाटील’ ह्यांच्या कथेवर आधारित आहे. दुर्मिळ होत चाललेली पाहुणचाराची पद्धत, गावकऱ्यांची आपुलकी, गावरान पद्धतीचा अस्सल पाहुणचार, परिचीत नसलेली रितभात व ह्या आपलेपणाचं अप्रूप वाटत असलेले बाहेरचे सदस्य, अशा साध्या धाटणीच्या संहितेवर आधारित ‘पाहुणचार’ ही एकांकिका पाहण्यासारखी आहे. शिक्षण घेण्यासाठी बाहेर गेलेला अण्णांचा मुलगा वसंता जेव्हा मास्तरांना गावात घेऊन येतो तेव्हा गावात आणि मास्तरांसोबत झालेल्या गमतीजमती ह्या नाटकात दाखवल्या आहेत. गावातील लोकांची मनाची अनेक रुपं व विविध पात्रांमध्ये रमणारं गाव ह्या नाटकात बघायला मिळतं. ह्या नाटकात मुख्य पात्र अण्णा, मास्तर, वसंता व गावकरी आहेत. पाहुणचार कसा असावा दाखवणारं हे हलकं फुलकं नाटक नक्की पहा!
लेखकाविषयी थोडंसं…
शंकर पाटील ह्यांचा जन्म १९२६ साली झाला. कोल्हापुरात असतानाच शंकर पाटील ह्यांनी त्यांची बी.ए व बी.टी. ची पदवी प्राप्त केली. अनेक लघुकथा व चित्रपटांचे लेखन ह्यांनी केले आहे. वादळवाट, पिंजरा, भेटीगाठी हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. तसेच १९८५ साली ‘मराठी साहित्य संमेलनात’ त्यांचा सहभाग होता.
या दोन अतिशय भिन्न धाटणीच्या एकांकिका तुम्हाला केवळ २२०/- रु. तिकिटात बघायला मिळणार आहेत. ही संधी दवडू नका. एकांकिका पाहण्यास नाट्यगृहास नक्की भेट द्या!