नव्यानेच सुरू झालेल्या २०२० साली कोरोना या जागतिक महामारीची एकच अशी लाट आली की तिने अख्ख्या जगाला हादरवून सोडले. अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नसताना आजही हा महाराक्षस गरीब जनतेचे बळी घेतच सुटला आहे. काल या जागतिक महामारीला बळी पडलेला बहुगुणी कलाकार म्हणजे ज्येष्ठ मराठी लेखक, दिग्दर्शक, पटकथाकार, अभिनेता, कादंबरीकार श्री. रत्नाकर मतकरी! काल दिनांक १७ मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमाराला रत्नाकर मतकरी यांचे देहावसान झाले. गेले काही दिवस त्यांना अशक्तपणा जाणवत होता. चार दिवसांपूर्वी गोदरेज इस्पितळात चेक अप साठी ॲडमिट झाले असताना त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली, जी पाॅझिटीव असल्याचे लक्षात आले. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथेच त्यांचे देहावसान झाले. ते ८१ वर्षांचे होते.
रत्नाकर मतकरी यांनी रंगसृष्टीला भरभरून दिलं. त्यांचं लहान मुलांसाठी लिहिलेलं “अलबत्या गलबत्या” हे नाटक चांगलंच गाजलं. तसंच, आरण्यक, चार दिवस प्रेमाचे, घर तिघांचे हवे, खोल खोल पाणी, जादू तेरी नजर ही अजून काही त्यांनी लिहिलेली नाटके. त्यांनी लिहिलेल्या चार दिवस प्रेमाचे या नाटकाचे ८५० पेक्षा जास्त प्रयोग झाले. तसेच हे नाटक हिंदी आणि गुजराती भाषेत अनुवादितही केले गेले. चित्रपटसृष्टीला त्यांनी केलेले योगदानही काही कमी नाही. त्यांनी लिहिलेल्या ‘इन्वेस्टमेन्ट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. मतकरी यांनी त्यांनी स्वत: लिहिलेल्या “प्रेम कहाणी”, “विनाशाकडून विनाशाकडे”, “लोककथा ७८”, “साठे लोटे” अशा काही नाटकांत अभिनयही केला आहे. आपलं महानगर’ या वृत्तपत्रामधून “सोनेरी सावल्या” नावाचे स्तंभलेखनही त्यांनी केले होते.
संगीत नाटक अकादेमी आणि साहित्य ॲकेडमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून रत्नाकर मतकरी याना पुरस्कृत करण्यात आले आहे. कोरोनाने आज एका हरहुन्नरी लेखकाला आपल्या विळख्यात घेतले आणि रंगभूमीला झालेली ही खोल जखम आता सहजासहजी भरून निघणे खूप कठीण आहे. तरीही रंगभूमी.com च्या संपूर्ण टीमकडून या हुतात्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली…