लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हळूहळू सर्व नाट्यगृहं १००% आरक्षणावर सुरू झाली. मात्र तमाम रसिक प्रेक्षक आणि रंगकर्मींसाठी सोईस्कर आणि मध्यवर्ती असलेलं माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिर अद्याप सुरू झालेलं नाही. बऱ्याच रंगकर्मींनी त्याबद्दल खंतही व्यक्त केली आहे. कित्येक महिने प्रेक्षक व रंगकर्मी हे नाट्यगृह सुरू होण्याची वाट बघत आहेत. पण आज यामागचे कारण उघडकीस आले आहे.
दोन वर्षांनंतर रंगभूमी उभी होत असताना हे नाट्यगृह बंद असणं म्हणजे आपलं दुर्दैवच आहे, असे मनोगत अभिनय कल्याण संस्थेचे संस्थापक आणि दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांनी व्यक्त केले आहे. तसेच, लेखक-दिग्दर्शक यश नवले यांनीही आपण या नाट्यगृहाला यशवंत नाट्य ‘मंदिर’ असे संबोधतो असे म्हणत, तेथील काम लवकर पूर्ण करून हे नाट्यगृह खुले करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Yashwant Natya Mandir, Matunga — Reopening Delay
यशवंत नाट्य मंदिरात व्यावसायिक नाटकं सादर होतातच. परंतु, रंगकर्मींमध्ये हे नाट्यगृह प्रायोगिक नाटकांच्या प्रयोगांसाठी व बऱ्याच एकांकिका स्पर्धांसाठीही प्रसिद्ध आहे. नाट्यगृहाचे भाडे कमी असल्यामुळे व मोक्याच्या जागी स्थित असे हे नाट्यगृह म्हणजे प्रायोगिक संस्थांसाठी पहिला पर्याय असतो. आज सर्वत्र परिस्थिती हळूहळू सुधारत असतानाही हे नाट्यगृह मात्र अद्याप बंदच आहे. यामागचं कारण आज समोर आलं आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह व आपले लाडके अभिनेते शरद पोंक्षे यांनी मुंबई टाइम्सशी बोलताना सांगितले की, “यशवंत नाट्य मंदिराकडे अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नाही. गेल्या वर्षी शरद पवार यांनी एका बैठकीत शशी प्रभू यांच्याकडे नाट्यगृहातील या त्रुटी दार करण्याची जबाबदारी दिली होती. पण अजून त्याबाबत काहीच अंमलबजावणी झालेली नाही. नाट्यगृहाच्या या कामासाठी लागणारा खर्च मोठा आहे. अजून कोणतीच हालचाल संबंधित व्यक्तीकडून झाली नसल्यामुळे यशवंत नाट्य मंदिर पुन्हा कधी सुरू होईल हे सांगता येणार नाही.”
यशवंत नाट्य मंदिर हे मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे ते प्रत्येक रंगकर्मीला सोयीस्कर आहे. हे नाट्यगृह खऱ्या अर्थानं आम्हा प्रायोगिक रंगकर्मींचे मंदिर आहे. यशवंत नाट्य मंदिर माफक दरात मिळणारं नाट्यगृह आहे; शिवाय तेथील सोयी-सुविधाही योग्य आहेत. दोन वर्षांनंतर रंगभूमी उभी होत असताना हे नाट्यगृह बंद असणं म्हणजे आपलं दुर्दैवच आहे.अभिजीत झुंजारराव(अभिनय कल्याण संस्थेचे संस्थापक आणि दिग्दर्शक)
प्रायोगिक रंगभूमीसाठी महत्वाचं असलेलं यशवंत नाट्य मंदिर बंद असल्यामुळे आम्हा तरुण रंगकर्मींना प्रयोग कुठे लावायचा? असा प्रश्न पडतो. कल्याण, डोंबिवली, ठाणे इथून येणाऱ्या प्रेक्षकाला सोयीस्कर असं हे नाट्यगृह आहे. हे नाट्यगृह रंगकर्मींसाठीसुद्धा फार जवळचं आहे. आम्ही या नाट्यगृहाला यशवंत नाट्य ‘मंदिर’ असे संबोधतो कारण ते आमच्यासाठी मंदिरच आहे. तेथील काम लवकर पूर्ण करून हे नाट्यगृह खुलं व्हावं अशी आमची इच्छा आहे.यश नवले(लेखक-दिग्दर्शक)
शरद पोंक्षे यांच्या या वक्तव्यानंतर, प्रेक्षक आणि रंगकर्मी आता फक्त हीच आशा व्यक्त करू शकतात की लवकरात लवकर यशवंत नाट्य मंदिरातील काम पूर्ण होवो आणि प्रायोगिक संस्थांसाठी सादरीकरणाचा एक सोयीस्कर मार्ग मोकळा होवो.