दीर्घ कवितेचे रसमय सादरीकरण अनुभवण्याचा सुवर्णयोग प्रेक्षकांसाठी चालून आला आहे. या कार्यक्रमांतर्गत, रानकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘अजिंठा’ या दीर्घ कवितेचे रंगमंचीय सादरीकरण अक्षय वाटवे, माधवी तोडकर, उदय रामदास हे कलाकार करतात.
या प्रयोगाची काही खास वैशिष्ट्ये
• मातीशी नातं सांगणाऱ्या लोकसंगीताचा वापर
• नाट्यानुभव देणारं अभिवाचन
• पूरक प्रकाशयोजना आणि वैशिष्ट्यपूर्ण ध्वनी संयोजन
• पार्श्वसंगीतासाठी देशी आणि परदेशी लोकवांद्यांचा वापर
• प्रत्यक्ष मंचावर ‘उदू’ या आफ्रिकन आणि ‘दॉयरा’या पर्शियन वाद्यांची साथसंगत
तसेच या दीर्घ कवितेतील
• पाण्यास बिलगले ऊन रंग विखरून,
• मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले,
• पानं कानात सांगतात, पानं पांगतात,
• तळपायावर मेंदी ओली,
• तळ्याकाठी निरभ्रसं कर्दळीचं बन,
• सावळ्या मेघांचे आभाळात बन,
या काव्यांशांना उदय रामदास यांनी संगीतबद्ध केलं आहे. हे कांव्याश माधवी तोडकर आणि उदय देशपांडे गीत रूपात सादर करतात.
या प्रयोगासाठी अमन क्षीरसागर यांनी प्रकाशयोजना केली आहे. राघवेंद्र जेरे यांनी पार्श्वसंगीत संयोजन केले आहे. वेशभूषा भुवन दिवेकर यांनी केली आहे. जाहिरात आरेखन आणि फोटोग्राफी श्रीनिवास पतके यांची आहे.
रॉबर्ट गील वाघूर नदीच्या पाण्यात शिरतो काय!
अजिंठा पाहून थक्क होतो काय!!
त्या पाठमोऱ्या बाईचं दर्शन झालेला रॉबर्ट गील पारूच्या अद्वितीय सहकार्याच्या आणि अतुलनीय प्रेमाच्या बळावर आपल्या कुंचल्यातून संपूर्ण अजिंठा साकारतो काय…!!
हा हा म्हणता दृष्ट लागावी तशा घटना घडत जातात काय आणि पाहता पाहता होत्याचं नव्हतं होतं.
हे सगळं ना. धों. महानोरांनी जितक्या आर्ततेने शब्दांत मांडलं तितकाच आर्त अनुभव हे कलाकार आपल्या सादरीकरणातून प्रेक्षकांना मिळवून देण्याचा प्रयत्न करतात…
सादरकर्ते
अक्षय वाटवे हे गेली काही वर्ष सातत्याने अभिवाचनाचे प्रयोग करत असतात. मराठीसह काही हिंदी लेखकांच्या साहित्यावर आधारित सादरीकरणं त्यांनी केली आहेत. तसंच ते व्हॉइसओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करतात.
माधवी तोडकर ह्या गेली काही वर्षे चित्रपट क्षेत्राशी निगडित असून समांतर तसेच व्यावसायिक सिनेमांसाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक, वेशभूषाकार म्हणून काम केले आहे. तसेच त्या आकाशवाणी पुणे केंद्राच्या नैमत्तिक उद्घोषक आहेत आणि व्हॉइसओव्हर आर्टिस्ट म्हणूनही काम करतात.
उदय रामदास हे प्रसिद्ध तबलावादक आहेत. गेली तीस वर्षे संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच संगीत दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी विविध गीतांची निर्मिती केली आहे. भारतात व भारताबाहेरही त्यांनी वेगवेगळ्या कॉन्सर्टसमधून सादरीकरण केले आहे.
लपझप प्रॉडक्शन्स
रंगभूमी.com शी बोलताना पार्थ टाकळकर यांनी सांगितले, “आम्हा मित्रमंडळींची मिळून एक छोटीशी टीम आहे, जी व्यावसायिक तत्वावर ऑडियो व्हिडिओ प्रॉडक्शनची कामे करते. आम्ही जाहिराती तयार करून देतो, ईबुक्स, ऑडियोबुक्स करून देतो. comercial videos तयार करतो. हे सगळं करत असतानाच आम्ही काही स्वतंत्र निर्मिती करायचे ठरवले आहे. या स्वतंत्र निर्मिती रंगमंच, ध्वनी आणि ध्वनीचित्र अशा माध्यमातून केल्या जातील. या उद्देशाने काम सुरू केल्यानंतरची आमची पहिली निर्मिती म्हणजे, पद्मश्री ना. धों. महानोर यांनी लिहिलेली दीर्घ कविता अजिंठा…”
रंगरेज
रंगरेज हे एक मनोरंजन गृह असून विविध कलांचा सराव करणारे काही विद्यार्थी ही संस्था चालवतात. आमच्यासारख्या अधिक निर्माते आणि कलाकारांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे, असे पार्थ टाकळकर यांनी रंगभूमी.com शी बोलताना सांगितले.