रसिक प्रेक्षकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण २६ मे, २०२२ रोजी ठाण्यात एक भव्य एकांकिका महोत्सव पार पडणार आहे. स्मित हरी प्रोडक्शन्स निर्मित व प्रणा थिएटर्स आयोजित रंगकर्मी एकांकिका महोत्सव! सन्मान कलेचा, उत्साह कलाकारांचा! नवोदितांना संधी मिळावी म्हणून हा महोत्सव साजरा केला जाणार आहे.
जास्तीत जास्त नवनवीन प्रेक्षक नाट्यगृहात यावे व त्यांनी नाटकं पाहावी हा या महोत्सवाचा प्रयत्न आहे. रंगकर्मी एकांकिका महोत्सव हा एकांकिकांचा महोत्सव आहे व कुठलीही स्पर्धा नाही.या महोत्सवात प्रत्येक संघ, प्रत्येक कलाकार आपल्या कलेचं सादरीकरण करतो. कलेचा सन्मान व्हावा आणि कलाकारांचा उत्साह वाढावा हा या महोत्सवाचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे या महोत्सवामार्फत नवनवीन कलाकारांना रंगमंचावर काम करण्याची संधी मिळावी तसेच रंगभूमीला नवनवीन कलाकार, लेखक, दिग्दर्शक मिळावेत हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.
२०२२ हे रंगकर्मी एकांकिका महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे व या वर्षी या महोत्सवात प्रेक्षकांना एका तिकिटात ६ एकांकिका, १ दीर्घांक आणि १ नृत्य सादरीकरण पाहण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.
महोत्सवात सादर होणाऱ्या एकांकिका
विटनेस (वर्ल्ड आर्ट फॅक्टरी, मुंबई)
नितीन कांबळे लिखित व अभिषेक किरण दिग्दर्शित, विटनेस ही एकांकिका आहे दोन साक्षीदारांची . इतरांच्या प्रेमाचे साक्षी होता होता, केव्हा त्यातला एक, एका अनोळखी प्रेमाच्या स्वाधीन होऊन जातो त्याचं त्याला ही कळत नाही. एका साक्षीदाराला मिळालेल्या सुखद धक्क्याची ही गोष्ट आहे. आणि त्या घटनेला शेवट पर्यंत फक्त पाहत असलेल्या एका ‘विटनेस’ ची ही कथा आहे. ओंकार, नितीन, प्रणित, हेमांगी, वामन, यश, स्नेहल, तेजस, हर्षल, राज, अमृता व अभिषेक या एकांकिकेत कलाकारांची भूमिका पार पाडणार आहेत.
रंसूरि (विजिकीषा नाट्य अकादमी, नाशिक)
प्रेम करावं, पण त्याला मर्यादा हव्यात. प्रेमाचं रूपांतर प्रेमातच व्हावं, कारण आघात पोहोचला की घात निश्चित असतो. असे कथानक असणारी रंसूरि ही एकांकिका विजिकीषा नाट्य अकादमी, नाशिक, या संस्थेची प्रस्तुती असून, या एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन शो मॅन विक्रम यांचे आहे.
पडद्यामागील स्वर्ग (दादासाहेब फाळके नाट्य कला, नाशिक)
पडद्यामागील स्वर्ग ही एकांकिका आहे लॉकडाऊन मधील कलाकारांची आणि रंगभूमीच्या अवस्थेची. कलाकारांचे झालेले हाल, त्यांची मानसिक स्थिती, त्यातून मार्ग काढण्यासाठी चाललेले प्रयत्न, रंगभूमी आणि कलाकाराचं एक गोड नातं आणि नाट्यगृहांची झालेली दुरावस्था ह्या एकांकिकेत द्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन ओमकार टिळे यांनी केले आहे.
लज्जा द्यावी सोडून
‘प्रत्येक वेळेला लाज सोडायची म्हणजे निर्लज्ज व्हायच अस नसतं’, या वाक्याभोवती या एकांकिकेचं कथानक फिरतं. ही अशी एकांकिका आहे, जी सर्व वयोगटातील प्रेक्षक मनमुराद आनंद घेत पाहू शकतात. ही कथा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडेल. प्रणा थिएटर्स प्रस्तुत लज्जा द्यावी सोडून या एकांकिकेचे लेखन अजय पाटील यांनी केले असून याचे दिग्दर्शन प्रणय एकनाथ आहेर यांनी केले आहे.
झुला (अनंत थिएटर, अलिबाग)
झुला ही एकांकीका एका सत्य घटनेवर आधारित आहे. आजपर्यंत ब-याच निर्जीव वस्तू कथेमध्ये बोलताना आपण पाहिल्या आहेत.पण या एकांकिकेत झुला बोलतोय, सूत्रधार म्हणून वावरतोय. एका स्रीच्या आयुष्यात जेवढे पुरुष तिच्या जवळ आले, त्या सगळ्यांना तिला तिच्या आयुष्यातून अचानक गमवावे लागले. तिचे जीवन एका काटेरी वाटेसारखे असूनही तिला चालावे लागले. पण झुला हा एकच तिच्या आयुष्यातील सुख दुःखाचा साक्षीदार असतो. तोच तीचा आधार बनतो. या एकांकिकेचे लेखन नरेंद्र ठाकूर यांनी केले असून याचे दिग्दर्शन राजन पांचाळ यांनी केले आहे.
यात्रा – दीर्घांक (चक्री, पुणे)
यात्रा म्हणजे एक प्रवास. दरवर्षी अगणित वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी यात्रेला निघतात. या कथेतली छोटी काशी, आपल्या आई-वडीलांसोबत आपल्या आयुष्यातील पहिल्या यात्रेसाठी जेव्हा निघते, तेव्हा ती प्रचंड उत्साहात असते. पण विठ्ठलाने तिच्या प्रवासात योजलेल्या वळणांची तिला कल्पनाच नसते. तिला यात्रेतून पळवून एका कोठीवर विकलं जातं. आणि सुरु होते काशीची धडपड – काहीही करुन यात्रा पूर्ण करण्याची. तिची ही धडपड सफल होते का? तिला पंढरपुराला जाता येतं का? आणि आयुष्याची यात्रा म्हणजे नेमकं काय? ह्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हा एकपात्री दीर्घांक बघायला हवा.
मुक्ता बाम लिखित व दिग्दर्शित यात्रा हा दीर्घांक प्रायोगिक पद्धतीने मांडला गेला आहे. हा प्रयोग पुरुषत्ताक व्यवस्थेत बाईचं अडकत जाणं दाखवून देतो आणि समाजाच्या व्हिक्टीम-ब्लेमिंग मानसिकतेला प्रश्न विचारतो.
यात्रा (नॅचरल परफॉर्मिंग आर्ट्स, डोंबिवली)
यात्रा या एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन निखिल जाधव यांनी केले आहे. काही नाती ही मृगजळासारखी असतात. एका विशिष्ट अंतरावरून चांगली, गोड, हवीहवीशी वाटतात. पण वास्तवात त्यांचं चित्र काही वेगळं असतं. हेच चित्रं एका आगळ्या-वेगळ्या पद्धतीने दर्शवणारी यात्रा ही एकांकिका.
नृत्य सादरीकरण
अंजली आढवकर, निधी मोरे, अंजली सुतार आणि रोहित गायकवाड या कार्यक्रमात नृत्य सादरीकरण करणार आहेत.
गेल्या वर्षी सिनेअभिनेते सुनील गोडसे या महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच ह्या वर्षी विजय पटवर्धन, निमिष कुलकर्णी, शेखर फडके आणि रमेश चांदणे हे कलाकार प्रमुख पाहुणे म्हणून महोत्सवात उपस्थित असतील. या महोत्सवाचे आयोजन प्रणय एकनाथ आहेर यांनी केले असून सुरेश भोसले या महोत्सवाचे सूत्रधार आहेत.
हा महोत्सव गडकरी रंगायतन, ठाणे, येथे २६ मे २०२२ रोजी, सकाळी ११ वाजल्यापासून सुरु होणार आहे. तिकिटाचा दर आहे २००/- व एका तिकिटात प्रेक्षकांना ६ एकांकिका, १ दीर्घांक आणि १ नृत्य सादरीकरण पाहण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. तिकिटांसाठी खाली नमूद केलेल्या संपर्क क्रमांकावर उत्सुक प्रेक्षक संपर्क साधू शकतात.
तेव्हा रसिक प्रेक्षकांनी रंगकर्मी एकांकिका महोत्सवाला भरगोस प्रतिसाद द्यावा व कलाकारांना प्रोत्साहन द्यावं.
संपर्क- ८१०८३०७३६१