खेळ नवा रंगेल
गेलं दिड वर्षं आपण नाट्यरसिक ज्या दिवसाची वाट पाहत होतो, तो दिवस आज अखेर उगवला आहे. मार्च २०२० मधे कोरोनामुळे संपूर्ण जगालाचा ब्रेक लागलेला. त्या नाटकाचा पडदाही अनिश्चित काळासाठी पडला होता. डिसेंबर महिन्यात पुन्हा रंगभूमी तग धरू लागली पण दुसऱ्या लाटेने एप्रिल २०२१ मधे कोरोनाने पुन्हा डोकं वरं काढलं. पण आता तब्बल साडेसहा महिन्यांच्या विरहानंतर रंगभूमी आजपासून पुन्हा सज्ज होतेय.
गेल्या दिड वर्षांत रंगकर्मी विविध अडचणींचा सामना करून संसाराच्या अर्थचक्राचा प्रयोग रंगवत होते. अनेक आघाड्यांवर लढत होते. त्यांना आपल्याच ‘रंगभूमी’च्या कुटुंबातून मदतही मिळाली होती. पण तरीही आस लागली होती नाटक सुरू होण्याची. अखेर आज २२ ऑक्टोबरपासून राज्य सरकारने ५०% क्षमतेने चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे यंदा दिवाळी आधीच प्रत्येक रंगकर्मीच्या मनात अपेक्षांचा आणि विश्वासाचा प्रकाश उजळू लागला आहे. अर्थातच, गाडी रूळावर येण्यासाठी बराच मोठा काळ लागणार आहे. नियमांच्या चौकटीत आणि भविष्यातील संभाव्य धोक्याची अनिश्चितता जाणून सगळ्यांनी कंबर कसली आहे. नाट्यगृहात भाडे सलवत आणि इतर सवलतींसोबत पुढचा काही काळ रंगकर्मींना सरकारने आर्थिक पाठबळ द्यावे, हीच अपेक्षा. कारण कलाकार जगला तरच कला टिकेल आणि बॅकस्टेजवाला उभा राहिला तरच नाटक उभं राहिल.
परवानगी मिळताच येत्या २३ तारखेपासून रंगभूमीचे विक्रमादित्य प्रशांत दामले यांनी त्यांच्या निर्मिती संस्थेची ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ आणि ‘तू म्हणशील तसं’ ह्या नाटकांचे प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, सावित्रीबाई फुले नाट्यगृह आणि दिनानाथ नाट्यगृह येथे प्रयोग लावले आहेत. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर इतर काही नाटके ‘कमबॅक’ करणार आहेत.
सोबत नाट्यरसिकांसाठी प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित एका नवीन नाटकाची घोषणाही झाली आहे. त्यामुळे आता रंगभूमी राखेतून पुन्हा फीनिक्स पक्ष्यासारखी उंच भरारी घेण्यासाठी सिद्ध आहे. नाट्यरसिकांनी आता पुन्हा एकदा नाट्यगृहाबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लावावा आणि होऊ द्यावी नाट्यसृष्टीच्या नव्या अंकाची तिसरी घंटा.