१ जानेवारी, २०२२ पासून सुरू होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धा २०२२ आता १५ दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मागच्या आठवड्यात घोषित झालेल्या स्पर्धेत प्रवेशिका दाखल करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर अशी जाहीर करण्यात आली होती व स्पर्धा १ जानेवारी पासून सुरू होणार होती. परंतु, अनेक रंगकर्मींनी आणि संस्थांनी प्रवेशिका दाखल करण्याची व सादरीकरणाची तारीख पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या मागणीचा विचार करून सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी राज्य नाट्य व बालनाट्य स्पर्धा १५ जानेवारीपासून सुरू होतील असे जाहीर केले आहे.
ह्याच बरोबर प्रवेशिका भरण्याची मुदत सुद्धा ३० नोव्हेंबर ऐवजी १५ डिसेंबर करण्यात आली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त संस्थांना ह्या स्पर्धेत सहभागी होता येईल, अशी आशा अमित देशमुख यांनी व्यक्त केली.
राज्यातील नाट्यकर्मींची मागणी तसेच @INCMaharashtra चेअध्यक्ष @NANA_PATOLE जी यांच्या यासंदर्भातील सूचनेचा आदर करून नाट्यस्पर्धा प्रवेशिका पाठवण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२१ ऐवजी १५ डिसेंबर २०२१ आणि नाट्यस्पर्धा आयोजनासाठी १ जानेवारी ऐवजी १५ जानेवारी २०२२ अशी मुदतवाढ करण्याचा (१/२) https://t.co/LrHpWorHXR
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) November 23, 2021
नाटकांची तालीम व प्रयोग सादरीकरण करताना कोविड विषयक नियमांचे पालन अनिवार्य असेल, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे. स्पर्धक हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी प्रवेशिका व नियम संचालनालयाच्या www.mahasanskruti.org या वेबसाईटवर उपलब्ध होतील, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पष्ट केले आहे.