सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य हौशी स्पर्धा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २०२१ साली घेता आल्या नव्हत्या. यंदाचे या स्पर्धेचे हीरक महोत्सवी वर्ष असणार आहे. आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा यंदा होत असल्याने त्यास विशेष महत्त्व असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले. मराठी, हिंदी, संस्कृत तसेच बालनाट्य, संगीतनाट्य व दिव्यांग बालनाट्य अशा सहा वेगळ्या प्रकारांमधून राज्यातील ३४ केंद्रांवर या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या या हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेचा राज्यस्तरीय उद्घाटन सोहळा सोमवारी २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली. या स्पर्धेचे उद्घाटन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार असून या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमास सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि १९ जिल्ह्यांमधील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असेही देशमुख यांनी सांगितले.
साधारण तीन महिने चालणाऱ्या या स्पर्धांमधून एकूण ६७४ संघ भाग घेणार आहेत अशी माहिती देत सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघ व कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.