मराठी सिनेसृष्टीत ‘लेखक दिग्दर्शक अभिनेता आणि निर्माता’ अशी हरहुन्नरी ओळख असणारे कलाकार पुरुषोत्तम बेर्डे. प्रयोगशील, सर्वसामान्यांना तरीही रुचणारा आशय व सादरीकरण हे बेर्डे यांचे वैशिष्ट्य! ‘शेम टू शेम’, ‘हमाल दे धमाल’, ‘घायल’ असे अनेक लोकप्रिय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणारे पुरुषोत्तम बेर्डे यांची लेखणी पुस्तकरुपात त्यांच्या चाहत्यांसाठी उपलब्ध होणार आहे. अनघा प्रकाशन, ठाणे प्रस्तुत पुरुषोत्तम बेर्डे लिखित ६ नाटकांच्या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. बुधवार दि. ४ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ ते ८ दरम्यान जयंतराव साळगांवकर प्रायोगिक रंगमंच, यशवंत नाट्यगृह, माटुंगा येथे प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
१९८३ मध्ये त्यांनी लेखन-दिग्दर्शन केलेले ‘टूरटूर’ नाटक, ‘गांधी विरुद्ध सावरकर — एक चौकशी, दोन नेत्यांची’, ‘जाऊबाई जोरात’, लक्ष्मीकांत बेर्डेचे अनोखे नाटक ‘सर आले धावून’, ‘चिरमिरी’ आणि १९७८ च्या राज्यनाट्य स्पर्धेत गाजलेले एक राजकीय द्वन्द्व नाट्य ‘अलवरा डाकू — रस्त्यावरच्या राजकारणातील सापशिडीचा खेळ’ या सहा पुरुषोत्तम बेर्डे लिखित नाट्य पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सहा नाटककारांच्या हस्ते पार पडणार आहे.
सहा प्रसिध्द नाटककार सर्वश्री प्रेमानंद गज्वी, शफाअत खान, प्रशांत दळवी, अभिराम भडकमकर, श्रीरंग गोडबोले आणि आनंद म्हसवेकर यांच्या हस्ते सहा पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. संजय कृष्णाजी पाटील म्हणजेच कवि, लेखक आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सह व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा पार पडणार असून प्रशांत दामले, विजय केंकरे, चेतन दळवी, विजय पाटकर, जयवंत वाडकर, रघुवीर कुल, प्रकाश निमकर, दीपक शिर्के, निर्मिती सावंत, दिलीप जाधव, उदय धुरत आणि डॉ दिलीप बोराळकर या दिग्गज कलाकरांच्या विशेष उपस्थिती या सोहळ्याला ताऱ्यांची शोभा येणार आहे.
कार्यक्रमातील रुपरेषेप्रमाणे प्रस्तावना (लेखक-दिग्दर्शक) कुमार सोहोनी, विवेक आपटे, राजेश देशपांडे, महेंद्र तेरेदेसाई आणि अभिनेता सुशील इनामदार देणार असून समीक्षक अरुण घाडिगांवकर आहेत. अभिवाचन दीपक करंजीकर, संदीप पाठक आणि स्वत: पुरुषोत्तम बेर्डे (व दृकश्राव्य) करणार असून सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रमोद पवार पार पडणार आहेत. तसेच श्री मुरलीधर नाले, श्री अमोल नाले (अनघा प्रकाशन, ठाणे) हे निमंत्रक आणि डॉ महेश केळूस्कर संपादक आहेत.
अनघा प्रकाशन
अनघा प्रकाशनची सुरुवात १९७९ साली विजय तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ नागनाथ कोत्तापल्ले व ना. ज. जाईल या प्रसिद्ध लेखकांच्या कादंबऱ्यांच्या प्रकाशनाने झाली. त्यानंतर दरवर्षी सहा पुस्तकांचे प्रकाशन होत होते. याप्रमाणे यंदाच्या सोहळ्यातही अनघा प्रकाशन ६ पुस्तके प्रकाशित करणार आहेत. अनघा प्रकाशनाने आजवर प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये शरद काळे, मधु मंगेश कर्णिक, प्रा. पु. द. कोडोलीकर, प्रा. म द हातकणंगलेकर, डॉ विजय पांढरीपांडे, मोहिनी वर्दे, अरुण साधू, डॉ. भारतकुमार राऊत, अरुण शेवते, माधवी घारपुरे, चंद्रसेन टिळेकर, फादर फ्रान्सिस दिब्रिटोयांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. मराठीतील सर्व वाङमय प्रकारातील पुस्तके अनघा प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत.
पुरुषोत्तम बेर्डे यांच्या रंगभूमीवर या गाजलेल्या नाटकांच्या वाचनातून रसिक प्रेक्षकांच्या आणि उभरत्या लेखकांच्या कल्पनाशक्तीला नवी दिशा मिळणार आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.