४,४४४ वा प्रयोग, ४ भूमिका आणि कलाकार मात्र एक…ही नाइंसाफी नाही तर, सहीची जादू आहे. १५ ऑगस्ट २०२४ रोजी बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात भरत जाधव एंटरटेनमेंट निर्मित आणि केदार शिंदे लिखित व दिग्दर्शित ‘पुन्हा सही रे सही’ नाटकाचा ४,४४४ वा प्रयोग रंगणार आहे. या ऐतिहासिक दिवशी प्रेक्षकांच्या साक्षीने सही रे सही नाटक २२ वर्ष पूर्ण करत २३ व्या वर्षात पदार्पण करणार आहे.
‘सही रे सही’ची कारकीर्द
१५ ऑगस्ट २००२ रोजी रंगमंचावर धुमाकूळ घालून इतिहास घडविणाऱ्या आणि आजच्या तारखेपर्यंत जगभरातील प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ‘सही रे सही’ नाटकाचे रंगभूमीवर पदार्पण झाले. सलग १६ ते १७ वर्षे सही रे सहीच्या प्रयोगादिवशी नाट्यगृहाबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लागत होता. रंगभूमीला नवनवीन कलाकार देणारे विश्वविक्रमी नाटक! कोरोना काळात नाटकाचे प्रयोग थांबले. पण, प्रेक्षकांच्या मनातली जागा या नाटकाने सोडली नाही. नाट्यगृह सुरू होताच, भरत जाधवची चौरंगी भूमिका पुन्हा नाट्यगृहात हसविण्यासाठी सज्ज झाली. आजही नवीन पिढीला या ऐतिहासिक नाटकाची ओढ आहे.
१५ ऑगस्टला भरतच्या सहा भिन्न भूमिकांचा षटकार!
Bharat Jadhav 3 Shows in one Day
भारतीय स्वातंत्र्यदिनी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात भरत पोटभर मनोरंजनाचा षटकार मारणार आहे. १५ ऑगस्ट २०२४ रोजी ‘भरत जाधव’ या लोकप्रिय कलाकाराचे ३ वेगवेगळ्या नाटकाचे सलग प्रयोग होणार आहेत. सकाळी ११ वाजता ‘अस्तित्व’, दुपारी ३.३० वाजता ‘मोरूची मावशी’ आणि संध्याकाळी ७.३० वाजता ‘पुन्हा सही रे सही’ नाटकाचा प्रयोग असा भरत सोहळा पार पडणार आहे. या संपूर्ण दिवशी भरत जाधव तुम्हाला ६ भूमिकेत पहायला मिळणार आहे. अस्तित्व नाटकात गंभीर बाबा, मोरूची मावशी नाटकात धमाल मावशी आणि पुन्हा सही रे सही नाटकात चार अजरामर भूमिका तो एकाच दिवशी सलग साकारणार आहे. त्यामुळे, १५ ऑगस्ट हा दिवस नाट्यप्रेमींसाठी कलाकृतीची मेजवानी ठरणार आहे.
भरत जाधवची धुवाधार नाटकांची बॅटिंग अनुभवायची असेल तर प्रेक्षकांनी १५ ऑगस्टला प्रबोधनकार नाट्यगृहात हजेरी लावावी. भरत जाधव आणि तिन्ही नाटकांच्या टीमला रंगभूमी.com कडून शुभेच्छा.