या दशकातल्या तरुण पिढीची प्रेमाबद्दल अनेक वेगवेगळी मतं आहेत. खरं प्रेम सापडणं फार अवघड होत चाललंय, आणि त्यामुळे दिवसेंदिवस लोकांचा प्रेमावरून विश्वास उडत चाललाय असं अनेकांचं मानणं आहे. या अश्या वातावरणात प्रेम किंवा समर्पणाची भावना जरी मनात आली तरी त्यांना धस्स होतं. तर एकीकडे प्रेमावर अतिशय विश्वास दाखवणारे जीवही या जगात वावरतात. त्यामुळे बिनधास्त मोकळेपणाने प्रेम व्यक्त करणारे, आणि सावधपणे, प्रेमात प्रत्येक पाऊल मोजून मापून टाकणारे, असे दोन गट आपल्याला बघायला मिळतात. या अशा परस्पर विरोधी मतांच्या दोन व्यक्ती जर एकत्र आल्या तर? त्यांचं नातं कसं उलगडेल? त्यांच्या नात्यात काय अडथळे येतील आणि त्या सगळ्या विरोधाभासांना ते कसे सामोरे जातील? ही अशीच काहीशी कथा आहे ‘प्रेम करावं पण जपून’ या नाटकाची.
अर्चना थिएटर आणि मधुसंगीता थिएटर्सचं माधुरी तांबे निर्मित व विशाल असगणकर आणि दिपेश सावंत दिग्दर्शित, ‘प्रेम करावं पण जपून‘ हे प्रेमाची सत्यता पडताळून सांगणारं नाटक आहे. या नाटकाचे लेखन व संगीत संकेत शेटगे यांचं आहे. प्रकाशयोजना शिवाजी शिंदे आणि नेपथ्य विशाल असगणकर यांचे आहे. अक्षय गायकवाड, मधश्री राऊत, विशाल असगणकर, चैताली कुडतरकर व मानसी सावंत यांनी पार्श्वगायन केले आहे व शेखर दाते हे या नाटकाचे निर्मिती सूत्रधार आहेत.
हे नाटक आहे श्रावणी नावाच्या बिनधास्त, बेभानपणे स्वतःला व्यक्त करणाऱ्या एका मुलीचं जी सावधपणे प्रेम करणाऱ्या आकाशच्या प्रेमात पडते. त्यांच्या या स्वभावातल्या तफावतीमुळेच त्यांच्यात बरेच अंतर पडत जाते. आणि मग उलगडते प्रेमाची दुसरी, काळोखी बाजू. या नाटकात आकाशचे पात्र संकेत शेटगे साकारतायेत तर श्रावणीचे पात्र मृदुला कुलकर्णी साकारतेय. आकाशचा भाऊ संत्या याचे पात्र विशाल असगणकर साकारतायेत तर श्रावणीची मैत्रीण सुरेखा हिचे पात्र भक्ती तारलेकर साकारतेय.
या नाटकाचा पुढील प्रयोग २० मार्च, २०२२ रोजी दुपारी ४ वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरीवली येथे सादर होणार आहे.
तुम्ही या नाटकाचे बुकिंग, www.bookmyshow.com वरून करू शकता.
नाटक रोमँटिक, विनोदी आणि तरुण पिढीच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. तेव्हा आपल्या जवळच्या नाट्यगृहात जाऊन आवर्जून पहा, ‘प्रेम करावं पण जपून’.
फोन बुकिंग साठी संपर्क- ९९२०९११४२९
प्रयोगासाठी संपर्क- ९९२०९११४२९/ ९९८७४१०१६३