कोरोनारुपी राक्षसाने हळूहळू अख्ख्या जगाला स्वतःच्या विळख्यात ओढून घेतले आणि त्यामुळे अखंड जीवसृष्टी हादरून गेली, हे आपण जाणून आहोतच! साधारण दोन अडीच वर्षांपूर्वी, या भयंकर महामारीची उत्पत्ती चीनमधील व्यूहान शहरात झाल्याची छोटीशी बातमी वर्तमानपत्राच्या एका कोपऱ्यात आली होती. पण ही बातमी भविष्यात असे काही भीषण रूप धारण करील याबद्दल कोणी विचारही केला नव्हता. सर्वसामान्य जनता जेव्हा या महामारीशी दोन हात करत होती आणि आपल्या जवळच्या माणसांना गमावत होती, तेव्हा या रोगावर Vaccine शोधू पाहणाऱ्या फार्मा रिसर्च कंपन्यांमध्ये जी काही चढाओढ झाली त्याचं खळबळजनक चित्रण करणारं एक वैचारिक नाटक आपल्या भेटीस येत आहे.
६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सादर झालेलं तसंच, मुंबईतील घाटकोपर केंद्रातून प्राथमिक फेरीत प्रथम पारितोषिक विजेतं, प्रयोग मालाड या संस्थेचं प्रा. अवधूत भिसे लिखित आणि उन्मेष वीरकर दिग्दर्शित ‘म’ हे नाटक बघण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांसाठी चालून आली आहे.
नाटकाबद्दल थोडंसं…
अचानक जन्माला आलेल्या संसर्गजन्य रोगावर उपाय म्हणून Vaccine शोधण्यासाठी सर्वच फार्मा रिसर्च कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू झाली. प्रत्येकजण आपल्या कंपनीने निर्माण केलेले Vaccine सर्वप्रथम आणण्यासाठी धडपड करू लागला. कारण जो आधी शोध लावेल तो अब्जावधी होईल हे या प्रत्येक फार्मा कंपनीचे मालक जाणून होते. यामधून निर्माण झालेली जीवघेणी ‘महत्वाकांक्षा’! या महत्वाकांक्षेपोटी फार्मा कंपनीचा मालक कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतो याचे चित्रण आपल्याला ‘म’ नाटकात पहायला मिळेल.
आत्तापर्यंत दोन महायुद्ध झाली मात्र दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बने मानवी संहार ज्या पद्धतीने झाला आणि त्याचे जे पडसाद उमटले ते आता जगातील या अति श्रीमंत आणि बलाढ्य व्यक्तींना नको आहे. परिणामी काही निवडक व्यक्ती एकत्र येऊन या ना त्या मार्गाने पृथ्वीतलावरील लोकसंख्या कमी करण्याच्या हेतूने वेगवेगळे प्रयोग करून पाहत आहेत. यात ‘म’ महत्वाकांक्षा असणारे, ‘म’ मरणाचा पाहणारे, ‘म’ मनस्वी आनंद लुटू पाहणारे असे ‘म’ चे अनेक अर्थ ही संहिता लिहिताना डोळ्यासमोर आल्याचे लेखक प्रा. अवधूत भिसे सांगतात.
औषध उत्पादनामध्ये याच मरण सूत्राचा उपयोग करून विविध घटना कशा घडत आहेत? या सगळ्यात सर्वसामान्य माणूस कसा धडपडतोय? चिरडला जातोय? शास्त्रज्ञ आणि संशोधन क्षेत्रात नेमकं काय चालू आहे? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आणि त्या उत्तरांमधून उद्भवणारे अधिक भयंकर प्रश्न, यांना सामोरं जाऊन अंतर्मुख होण्यास भाग पाडणारं ‘म’ हे नाटक ९ जून रोजी, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह (मिनी थिएटर), बोरिवली येथे रात्रौ ८:३० वाजता सादर होणार आहे. प्रयोगाचे तिकीट शुल्क मात्र १५०/- आहे.
या नाटकामध्ये अनेक भाकितं आहेत आणि लेखकाला विश्वास वाटतो कि येणाऱ्या काळात ती सत्यात उतरतील! म्हणूनच रंगभूमीच्या माध्यमातून आपण नव्हे तर साऱ्या जगाने गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे अन्यथा येणारा काळ खूपच भयावह ठरेल, असे मनोगत व्यक्त करत लेखकाने प्रेक्षकांना हे नाटक बघण्याचे आवाहन केले आहे.