२०१७ साली कोल्हापुरातील प्रत्यय हौशी नाट्य संस्थेने कॉ. संतराम पाटील श्रमिक चॅरिटेबल ट्रस्टच्या सहयोगाने नाट्य महोत्सवाच्या आयोजनास सुरूवात केली. प्रत्ययची निर्मिती असणारे नाट्याविष्कार आणि महाराष्ट्र व भारतभरात सुरू असणाऱ्या प्रायोगिक नाटकांना कोल्हापुरात रंगमंचित करण्याची यामागे भूमिका होती. २०१७, २०१८ आणि २०१९ अशी तीन वर्षे सलग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कोल्हापुरातील जाणकार रसिक आणि समीक्षकांनी या महोत्सवाला उत्तम दाद दिली आणि महोत्सव यशस्वी केले. २०२० आणि २०२१ साली लॉकडाऊनच्या काळातही प्रत्ययतर्फे बरेच ऑनलाईन उपक्रम राबविले गेले. यंदा प्रत्यय नाट्य महोत्सव २०२२ चे हे चौथे वर्ष आहे. हा नाट्यमहोत्सव रा. शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे पार पडणार आहे. यावर्षी महोत्सवात पुढील नाटकं सादर होणार आहेत:
उत्तररामचरित
मंगळवार, दिनांक १७ मे, २०२२
निर्मिती: प्रत्यय, कोल्हापूर
लेखक: दिलीप धोंडो कुलकर्णी
दिग्दर्शक: डॉ. आदित्य खेबूडकर
दिलीप धोंडो कुलकर्णी यांनी ऐंशीच्या दशकात लिहिलेल्या या नाटकातून वाल्मिकींनी रचलेल्या या महाकाव्यातील प्रतिमांची आणि भारतीय समाजमनात प्रस्थापित झालेल्या त्यांच्या स्थानाची चिकित्सा केली जाते. भूमिकन्या सीता, शूद्र शंबूक याची रामराज्यातील कुचंबणा आणि रामाची एक माणूस आणि एक आदर्श यामध्ये सुरू असलेली ओढाताण यातून साकारत जातं उत्तररामचरित हे नाटक.
कुरूप
बुधवार दिनांक १८ मे २०२२
निर्मिती: अंतरंग प्लॅटफॉर्म, पुणे
दिशा पिंकी शेख यांच्या कवितांवर आधारित नाटक
पारलिंगी कवयित्री दिशा पिंकी शेख यांच्या कवितेवर आधारित कुरूप या नाटकाचा आणि अशा प्रकारच्या नाट्यप्रयोगाचा प्रथमच कोल्हापुरात प्रयोग होत आहे. एखादवेळी भीक मागणारा हात पुढे आला तर भीक देणे किंवा नाकारणे या व्यतिरिक्त आपल्याला काय माहित असतं या समूहाबद्दल? आकर्षण आणि घृणा या द्वंदात अडकलेल्या या समूहाचे स्पंदन समजून घेण्यासाठी नाट्य प्रयोग: कुरूप
मार्क्स इन सोहो
गुरुवार, दिनांक १९ मे, २०२२
रूपांतर: साहिल कल्लोळी
दिग्दर्शन: डॉ. शरद भुथाडिया
कार्ल मार्क्सचे वर्णन मानवी इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून केले जाते. मार्क्स आपल्याला एक राजकीय क्रांतिकारक, एक तत्ववेत्ता म्हणून माहिती आहे, पण मानवी मूल्यांवर गाढ श्रद्धा असणारा मार्क्स त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात कसा होता? त्याची मैत्री आणि नातेसंबंधांची वीण कशी होती… एकीकडे हे नाटक मार्क्सची मानवी बाजूसमोर आणते, तर दुसरीकडे आज आधुनिक जगाला मार्क्सवादी विचारपद्धतीची कधी नव्हे इतकी निर्माण झालेली गरज उलगडून दाखवते. डॉ. शरद भुथाडिया यांनी दिग्दर्शित आणि अभिनीत केलेला मार्क्स समोर येतोय मार्क्स इन सोहो या नाटकातून.
संपूर्ण महोत्सवाची प्रवेशिका रु. ३००/- आहे आणि दैनिक प्रवेशिका रु. १५०/- आहे. तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात तिकिटे दिली जातील.
प्रवेशिकांसाठी संपर्क: रसिया ९४२११०२६६४