गौरी थिएटर निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘सारखं काहीतरी होतंय!’ या आगामी नाटकाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नाटकाची चर्चा होण्यामागे बरीच कारणं आहेत. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हास्यसम्राट प्रशांत दामले या नाटकातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहेत. दुसरं कारण म्हणजे या नाटकाचा लेखक-दिग्दर्शक असणार आहे आपल्या सगळ्यांचाच लाडका संकर्षण कऱ्हाडे! तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या नाटकाच्या निमित्ताने आपली अत्यतं प्रिय अशी प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर ही जोडी आपल्या भेटीस येणार आहे. आता याहून आनंदाची बातमी!
‘सारखं काहीतरी होतंय!‘ या नाटकाच्या शुभारंभाची तारीख जाहीर झालेली आहे. शुक्रवारी, २५ मार्च रोजी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर होणार असल्याचे कळले आहे. पण, कुठे आणि किती वाजता या प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाहीत. कारण, नाटकाचं ऑनलाईन तिकीट बुकींग ६ मार्चपासून सुरू होणार आहे.
साधारण ३६ वर्षांपूर्वी आपण ‘ब्रम्हचारी‘ या नाटकात प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर ही जोडी आपण पहिली होती आणि त्या नाटकाच्या आठवणी अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. पुढील लिंकवर क्लिक करून तुम्ही या सदाबहार नाटकासोबतच प्रशांत दामले ह्यांच्या इतरही काही सुंदर नाटकांचा आस्वाद घेऊ शकता.
हास्यरसाची खवय्येगिरी पूर्ण करण्यासाठी प्रशांत दामलेंच्या ६ गाजलेल्या नाटकांचा हा नजराणा!
जुन्या नाटकांच्या आठवणींनी ‘सारखं काहीतरी होतंय!’ नाटक बघण्याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच जात आहे. आणि आता लवकरच हे नाटक आपल्या भेटीलाही येणार आहे. या एव्हरग्रीन जोडीला पुन्हा एकत्र बघण्याची संधी प्रेक्षक सहजासहजी गमावणार नाहीत हे निर्विवाद आहे!