जागतिक रंगकर्मी दिवस २०२१ च्या सोहळ्यांतर्गत प्रख्यात रंगकर्मी प्रदीप कबरे यांच्या ‘दिल धक धक करे’ नावाच्या स्वलिखित पुस्तकाचे उत्सवमूर्ती अशोक सराफ यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले होते. याच पुस्तकावर आधारित नाटकाचा २४ मे रोजी प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली येथे शुभारंभ झाला. हे नाटक तमाम प्रेक्षकवर्गाच्या पसंतीस उतरत आहे. ‘दिल धक धक करे’ हे एक कौटुंबिक विनोदी नाटक आहे. त्यामुळे, या सहकुटुंब सहपरिवार हे नाटक तुम्ही एन्जॉय करू शकता!
अमर आणि अंजली या आनंदी विवाहित जोडप्याची ही कथा आहे. अमरला नेहमी त्याच्या तब्येतीबद्दल शंका असते ज्यामुळे अंजलीच्या मनात एक वेगळाच गैरसमज निर्माण होतो. त्यांचे कौटुंबिक डॉक्टर घोरपडेदेखील बरेच गोंधळ निर्माण करतात. अमरचा बालपणीचा मित्र बॉबी सलमलकर व्यवसायाने वकील आहे, जो एक धमाल सल्ला देतो, ज्यामुळे दांपत्याच्या जीवनात एक मजेशीर परिस्थिती निर्माण होते. अर्थात, शेवटी सर्व काही स्थिर होते आणि शेवट गोड होतो. हा पूर्णपणे एक काल्पनिक, रोमँटिक, मनोरंजक असा विनोदी फॅमिली ड्रामा आहे.
प्रदीप अभिनंदन, कालचा धक धकचा प्रयोग अप्रतिम झाला. तुझ्यातल्या अष्टपैलू कलाकाराची ओळख मला फार पूर्वीपासून आहे. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या क्षेत्रात तू दादागिरी करतोस. हे नाटक सुद्धा उत्तम लिहिलंयस. ते त्याच ताकदीने उभं केलंयस आणि सगळ्यांच्या अभिनयाने ते उंचीवर पोहोचलंय यात तुझे परिश्रम दिसून येत आहेत. काही कलाकार नवखे असूनसुद्धा त्यांचा अभिनय नवखा वाटत नाही. संदीप हा ताकदीचा कलाकार आहे. हे कालच कळलं. त्याने पकडलेली बेअरिंग लाजवाब. त्यास सलाम! हे नाटक भरभरून चालो आणि तुझ्या यशाचा आलेख असाच चढता राहो, ही ईश्वर चरणी प्रार्थना!
गोट्या सावंत.
नाटकाचे दिग्दर्शन आकाश आनंद आहेत. तसेच, नाटकाला अशोक पत्की यांचे संगीत लाभले आहे. नेपथ्य बाबा पार्सेकर यांचे असून शीर्षक गीताचे नृत्य दिग्दर्शन दीपाली विचारे यांनी केले आहे. प्रदीप कबरे यांच्यासोबत नाटकात सुदेश म्हशीलकर, वरदा साळुंके, संदीपराज, संजीव चव्हाण, निलेश देशपांडे व कोमल यांचा समावेश आहे.
पुढील प्रयोग
२९ मे, रात्रौ ८:३० वा. आचार्य अत्रे, कल्याण
५ जून, दु. १२:३० वा. चिंचवड, पुणे
१२ जून, दु. ४:३० वा. साहित्य संघ, गिरगांव