प्रसिद्ध नाटककार, गूढकथाकार, दिग्दर्शक रत्नाकर मतकरी ह्यांचा १७ मे २०२२ हा दुसरा स्मृतिदिन आहे. या ज्येष्ठ रंगकर्मीस आदरांजली म्हणून दिग्दर्शक संतोष वेरुळकर रत्नाकर मतकरी लिखित ‘पोलीस — पोलीस’ हा नवा दीर्घांक १४ मे २०२२ पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या ९० मिनिटांच्या दीर्घांकात समाजातील विसंगतीवर भाष्य केलं गेलं आहे.
‘पोलीस पोलीस’ या दीर्घांकाचं महत्वाचं वैशिष्टय असं की केवळ तीन कलाकार, पाच तंत्रज्ञ आणि सुटसुटीत तसेच वाहतुकीस अत्यंत सोपी अशी नेपथ्यरचना यामुळे हा प्रयोग अत्यंत किफायतशीर खर्चात कुठेही सादर करता येतो. नाट्यगृहातील बंदिस्त प्रयोगदेखील तितकाच रंगतदार व्हावा आणि मोजक्या प्रेक्षकांत व उपलब्ध रिसोर्सेसमध्येही प्रयोग उठावदार करता यावा अशी नाटकाची बांधणी आहे.
चकमकींपासून दंगलीपर्यंतच्या घटना कोळून प्यायलेला पोलीस निरीक्षक रगडे, हा त्याच्या हाताखालील उपनिरीक्षक शेवडेला हरप्रकारे त्रास देतो. संवेदनशील असणाऱ्या शेवडेला खोटी चकमक, गोळीबार, भ्रष्टाचार स्वीकारता येत नाही आणि सुरू होतो त्याच्या मानसिक द्वंद्वाचा खेळ. सहनशक्तीचा अंत होऊन शेवडे पोलीस स्टेशनमध्येच गळफास लावून आत्महत्या करतो, पण जाता जाता रगडेच्या नावाची चिट्ठी आणि महत्वाचा पुरावा मागे सोडून जातो आणि मग सुरू होतो सगुण-निर्गुणाचा लपंडाव.
‘सदरक्षणाय-खलनिग्रहणाय’ असे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या पण स्वतःच्या पोलीस बळाचे रक्षण करू न शकणाऱ्या पोलीस व्यवस्थेवर “पोलीस-पोलीस” हे नाटक जळजळीत प्रश्नचिन्ह उभे करतं. रत्नाकर मतकरींच्या शैलीतील लेखन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे असणार याबद्दल वादच नाही. या नाटकाचे प्रयोग मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, वाशी, पनवेल, वसई-विरार, नाशिक, पुणे, नागपूर, सोलापूर, इंदोर, सांगली, सातारा, मिरज, कोकण, गोवा असे सर्वदूर करण्याचा मानस दिग्दर्शक संतोष वेरूळकर यांची व्यक्त केला. तुम्हीही तुमच्या नजीकच्या नाट्यगृहात या नाटकाचा लवकरात लवकर आस्वाद घ्या!
प्रयोगासाठी संपर्क: [email protected]