आम्ही काही दिवसांपूर्वी कणकवली येथे सादर होणाऱ्या परिवर्तन कला महोत्सवाबद्दल तुम्हाला इत्यंभूत माहिती दिली होती.
कणकवलीत रंगणार तीन दिवसीय परिवर्तन कला महोत्सव!
या तीन दिवसीय महोत्सवाला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे आजपासून पुन्हा एकदा कोल्हापूरात हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र व अमृता इंडस्ट्रीज कोल्हापूर आयोजित या तीन दिवसीय महोत्सवामहोत्सवाबद्दल संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे:
स्थळ: शाहू स्मारक, कोल्हापूर
वेळ: सायंकाळी ६:३० वाजता
प्रवेश सर्वांसाठी खुला!
परिवर्तन कला महोत्सव वेळापत्रक
दि. १ एप्रिल, २०२२ रोजी शंभु पाटील लिखित व मंजुषा भिडे दिग्दर्शित अमृता साहिर इमरोज हे नाटक सादर होणार आहे व या नाटकाचे सादरीकरण परिवर्तनचे कलावंत पार पाडणार आहेत.
दि. २ एप्रिल, २०२२ रोजी दोन नाटकं सादर होणार आहेत.
- त्यातील पहिलं नाटक म्हणजे पथेर पांचाली भारतीय साहित्यातील अजरामर कादंबरी! बंगाली साहित्यातील मैलाचा दगड ठरलेल्या या कादंबरीचे उत्तम सादरीकरण परिवर्तनचे कलावंत करतात. दारिद्र्य, दैन्याचे जीवन जगत असलेल्या बंगाली ब्राह्मण कुटुंबातील नातेसंबंध दर्शवणा-या या कादंबरीतून रसिकांना बंगाली साहित्याचे दर्शन घडणार आहे. कादंबरीच्या आशयाला अनुरूप नेपथ्य, संगीत व प्रकाश योजनेचा चपखल उपयोग करून पथेर पांचालीतील दुर्गा, आत्या व सुनबाई ही पात्रे अनुभवण्यासाठी पथेर पांचाली अनुभवायला हवे.
- दुसरं नाटक म्हणजे श्रीकांत देशमुख लिखित, शंभु पाटील नाट्यरुपांतरीत व योगेश पाटील दिग्दर्शित नली हे एकलनाटय सादर होणार आहे व या एका निरपेक्ष प्रेम कहाणीचे सादरीकरण हर्षल पाटील करणार आहेत.
दि. ३ एप्रिल, २०२२ रोजी महोत्सवाची सुरुवात बहिणाईंच्या कविता व गाण्यांवर आधारित अरे संसार संसार या सुरेल मैफिलीने होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना विजय जैन यांची असून दिग्दर्शन नारायण बाविस्कर यांचे आहे. परिवर्तनचे कलावंत या कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत.
या सगळ्या प्रयोगांसाठी प्रवेश अगदी मोफत आहे.
ज्याप्रमाणे, कणकवलीत या दर्जेदार नाटकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले तसेच प्रेम कोल्हापूरातही या कलाकृतींना मिळेल याबद्दल आम्हाला खात्री वाटते.
1 Comment
कार्यक्रम भन्नाट होता. आत्ताच पाहून घरी आलोय. अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, लेखन सारेच उत्तम. आता उद्या अन परवा! मजा येणारेय.