सध्या रंगभूमीवर थोड्या हटके विषयावरील नाटकांचा ट्रेंड सुरू आहे. जितका हटके विषय तितकीच हटके नाटकांची नावंदेखील असतात. लवकरच सुमुख चित्र आणि अनामिका प्रस्तुत ‘पाहिले न मी तुला‘ हे नवंकोर नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे. नावावरून आपल्याला गोड प्रेमकथा असावी असे वाटते. पण तसं नाहीये. लेखक-दिग्दर्शक सुनिल हरिश्चंद्र यांनी नात्याच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टीचा वेध यातून घेतला आहे.
Sunil Harishchandra
सुनील हरिश्चंद्र लिखित-दिग्दर्शित ‘मानलेली गर्लफ्रेंड’, ‘मोस्ट वेलकम’, ‘ऊर्मिलायन’ या कलाकृती ज्यांनी पाहिल्या आहेत त्यांना त्याच्या लेखणीतील वेगळेपण आणि स्पष्टवक्तेपणा यांचा अंदाज असेल. जे आपल्याला लिखाणातून, विचारांतून किंवा अनुभवातून उमजलंय त्याची तंतोतंत अनुभूती प्रेक्षकांना घडवून देणे, यात सुनीलचा हातखंडा आहे.
नाटकाबद्दल थोडंसं…
सध्या जमाना ‘फिल्टर’चा आहे. एखादी गोष्ट अधिक छान असावी यासाठी ‘फिल्टर’ चा वापर केला जातो. नवे नाते निर्माण करताना किंवा असलेले नाते जपताना महत्त्वाचा असेलला ‘फिल्टर’ अर्थात, दृष्टिकोन व विश्वास आपण जाणीवपूर्वक निर्माण करतो का? योग्यवेळी तो वापरतो का? हे बघणं ही तितकंच आवश्यक असतं हे दाखवणाऱ्या ‘पाहिले न मी तुला’ या नाटकाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. या मुहूर्त प्रसंगी निर्माते प्रसाद कांबळी, अजय विचारे ही मान्यवर मंडळी उपस्थित होती. अंशुमन विचारे, हेमंत पाटील, सुवेधा देसाई या कलाकारांच्या या नाटकात भूमिका आहेत.
नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून संगीत निनाद म्हैसाळकर यांचे आहे. प्रकाशयोजननेची जबाबदारी राजेश शिंदे यांनी सांभाळली आहे. वेशभूषा वरदा सहस्त्रबुद्धे तर रंगभूषा उदयराज तांगडी यांची आहे अरविंद घोसाळकर व प्रसाद सावर्डेकर यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली आहे.
सुमुख चित्र निर्मिती संस्था
‘सुमुख चित्र’ ही निर्मिती संस्था आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् च्या सहकार्याने अनेक नव्या नाट्यकृती रंगभूंमीवर आणणार असून सुमुख चित्र’ संस्थेच्या माध्यामातून आगामी काळात अनेक चांगले सामाजिक विषय नाटकांच्या माध्यमातून रसिकांसमोर सादर केले जाणार असून नवोदित कलाकार, लेखक-दिग्दर्शक यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज विविध क्षेत्रात यशस्वी पद्धतीने कार्यरत असून आता ही कंपनी ‘सुमुख चित्र’ च्या माध्यमातून नाट्यक्षेत्रात पदार्पण करत आहेत. सुमुख चित्रचे कार्यकारी निर्माते निखिल जाधव आहेत. सूत्रधार दिनू पेडणेकर आहेत.
रंगभूमी.com कडून नाटकाच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा.