रोम रोम रंगमंच आणि ऑर्फियस स्टुडिओ यांची निर्मिती असलेलं ‘पाच फुटाचा बच्चन’ या नव्याकोऱ्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग यशवंतराव चव्हाण नाटयसभागृहात ५ फेब्रुवारी रोजी सादर झाला. या नाटकाचे लेखन कौस्तुभ रमेश देशपांडे याने केले असून दिग्दर्शन आणि सादरीकरण श्रुती मधुदीपने केले आहे.
‘पाच फुटाचा बच्चन’ हे नाटक अत्यंत समकालीन आहे आणि म्हणूनच वर्तमानातील पेच अगदी मनोरंजक पद्धतीने आपल्यासमोर मांडणारं आहे. ही गोष्ट आहे एका गावातून आलेल्या तरुण मुलीची, जी अध्यात्मिक क्षेत्रात सुपरस्टार आहे. आपण सगळेचजण कुठे ना कुठेतरी पोचायचं, पुढे जायचं स्वप्न बघत असतो, त्या दृष्टीने कष्ट घेत असतो मात्र पुढे जाताना आपल्या आत नेमकं काय काय होतं. आपल्या मूल्यांसोबत आपण एकनिष्ठ असतो का? चार भिंतीतले आपण आणि स्वप्न साकारताना लोकांसमोरची आपण निर्माण करत असलेली प्रतिमा यामुळे काही पेच उभे राहतात का? या आणि अशा अनेक गोष्टी आपण स्वतःसकट सगळेच अनुभवतो आहोत. तेव्हा आपल्या अगदी जवळची, पण जवळ असल्यानेच आपण डोळसपणे पाहू न शकलेली अशी ही गोष्ट! तुमची – आमची! कुठल्याही वयोगटातील, शहरी – ग्रामीण कुणालाही आपलीशी वाटावी अशी. हे नाटक आजच्या भाषेत सांगायचे तर प्रत्येक वयोगटातील माणसाला एंगेज तर करतेच पण त्याच वेळी आपल्याला आपल्यातच खोल आत डोकावण्याची संधी देते.
अभिनव जेऊरकर (सहायक दिग्दर्शक), मयूर देशमुख (निर्मिती प्रमुख), निरंजन पेडगावकर (संगीत आणि ध्वनी संयोजन), विक्रांत ठकार (प्रकाशयोजना ), आशिष हेमंत देशपांडे (रंगभूषा आणि वेशभूषा), स्वप्नील कर्नावट (नेपथ्य), मयूर प्रकाश कुलकर्णी (प्रसिध्दी डिझाईन) ही रोम रोम रंगमंचची अशी अनुभवी आणि तगडी टीम हे नवे नाटक आपल्यासमोर सादर करते आहे. याशिवाय बॅक स्टेजला वरुण जोशी, कौस्तुभ हिंगणे, सार्थक जाधव, वेशभूषा सहायक म्हणून दीपाली देशमुख, उमेश जाधव आणि ध्वनी संयोजनामध्ये शर्वरी हळदवणेकर हे काम करत आहेत.
पाच फुटाचा बच्चन या नाटकाची वैशिष्ठ्ये
- बच्चन – सिनेमा याचा खास प्रभाव असलेलं हे नाटक कॉमेडी करत प्रेक्षकाला खिळवून ठेवणारं आहे.
- नाटकाचा आशय हा आताच्या काळातला असून त्याची भाषा आणि सादरीकरण कुणालाही आवडेल असे आहे.
- या नाटकाचा फॉर्म कीर्तन असल्याने त्यात अनेक गाणी – अभंग, संगीत याने नाटक अधिक मनोरंजन करते.
- शाळकरी मुलांपासून वृद्धांपर्यंत आणि शहरी भागातील जनतेपासून ग्रामीण भागापर्यंत सर्वांना मनापासून साद घालणारे हे नाटक आहे.
- खरीखुरी संत परंपरा उलगडणारे हे नाटक आहे.
- नाटय-आशयाला पूरक नेपथ्य, प्रकाशयोजना, वेशभूषा या सा-या अंगांनी हे नाटक एक उत्तम अनुभव देते.
येणाऱ्या काळात या नाटकाचे पुणे मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दौरे होणार आहेत.
‘पाच फुटाच्या बच्चन’ या नाटकाचा दुसरा प्रयोग रविवार, दिनांक ५ मार्च २०२३ रोजी दुपारी १ वाजता यशवंतराव चव्हाण नाटयगृह, कोथरुड, पुणे येथे होणार आहे.