कोरोनाचे भीषण स्वरूप ओसरून नाट्यसृष्टी पुन्हा नव्या जोमाने सुरू होईल असं चित्र काही दिवसांपूर्वी दिसत होतं. प्रशांत दामले, भरत जाधव अशा काही आघाडीच्या नाट्यकलाकारांनी पुढाकार घेऊन नाटकाचे प्रयोग सुरूही केले होते. परंतु तितक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मारा झाला आणि हळूवार डोकं वर काढू पाहणारी नाट्यसृष्टी पुन्हा शांत झाली. पण आता दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरू लागला आहे. लसीकरणही सर्वत्र वेगाने सुरू आहे. अशा परिस्थितीत रंगभूमीचा पडदाही हळूहळू उघडावा अशी विनंती महाराष्ट्रभरातील आघाडीच्या रंगकर्मींनी मा. मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्षेत्रांवर निर्बंध लागू करण्यात आले. यामध्ये नाट्यसृष्टीचे आणि पर्यायाने नाट्यकर्मींचे सगळ्यात मोठे नुकसान झाले. रंगभूमीचा पडदा बऱ्याच काळासाठी बंद राहिला. तरीही काही रंगकर्मींनी हॉटेल, सभा व ऑनलाईन माध्यमातून नाटक जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. आता मात्र सर्व काही पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील काही प्रख्यात रंगकर्मींनी माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे नाटकं सशर्त सुरू करण्याची मागणी केली आहे. या पत्रात इतरही बऱ्याच गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. निदान ५० लोकांकरता छोट्या स्वरूपातील प्रयोग करायला आपण परवानगी द्यावी अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. पत्र लिहिणारे रंगकर्मी अनिल कोष्टी, अतुल पेठे, शंभू पाटील, वामन पंडित, अभिजीत झुंजारराव आणि दत्ता पाटील आहेत. या सर्व रंगकर्मींनी प्रायोगिक रंगभूमीवर मोलाची कामगिरी बजावली आहे. व्हॉट्स ऍप आणि इतर सोशल मीडियावरही हे पत्र चांगलेच व्हायरल झाले आहे. अभिजीत झुंजारराव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘हे पत्र आम्ही सगळ्यांनी मिळून लिहिले आहे. नाटक समाजाचा अविभाज्य घटक आहे. त्याअर्थाने सशर्त का असेना नाटक सुरू होणं आवश्यक आहे. म्हणूनच हे पत्र. ईमेलद्वारे हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. मा. मुख्यमंत्री नक्कीच याचा सह्रदयतेनं विचार करतील याची खात्री वाटते.’ मा. मुख्यमंत्र्यांना लिहिण्यात आलेल्या पत्रातील मजकूर पुढीलप्रमाणे आहे.
माननीय उद्धव ठाकरे,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य.
सप्रेम नमस्कार,
आमचे हे पत्र तुमच्या पर्यंत पोहोचेल की नाही कल्पना नाही. आम्ही सारे प्रायोगिक नाटक करणारे कलावंत आहोत. आम्हाला पूर्ण कल्पना आहे की सारे जग गेले दीड वर्ष अतिशय संकटातून जात आहे. विविध क्षेत्रांसमोर जीवघेणे प्रश्न कोविडने उभे केले आहेत. त्याकरता आपला देश आणि आपले राज्य आपापल्या पातळीवर उपायही करू पाहात आहे. या संकटातून बाहेर पडण्याकरता इथल्या नागरिकांनीही आपापल्या मगदुराप्रमाणे मदत केली आहे. त्यात आम्हीही आपापल्या कुवतीने मदत केली आहे. कोविडची स्थिती नक्की आणि पक्की कोणालाच वर्तवता येत नसल्याने सरकार आपल्या परीने जबाबदार पावले टाकत आहे हेही आम्हाला कळत आहे. शिक्षण या अतिशय महत्वाच्या गोष्टीला अजून कुलूप आहे हेही आम्ही जाणत आहोत. हे सर्व सुरळीत सुरू झाल्यावर मग करमणूक या नावाखाली जे काही क्षेत्र येते ते सुरू होणार याबाबतही आम्ही सहमत आहोत. पण हे सर्व आता दीड वर्ष सुरू आहे. आधीपेक्षा आता थोडीफार सुधारणा होत आहे. लसीकरण त्यात मोलाची भर घालत आहे. लोक आता हॉटेलात काही दिवस का होईना, पण जाऊन जेवूखाऊ लागलेले आहेत.
बदलत्या या चित्रात सर्वांनी कोविडची काळजी घेणं अर्थातच आवश्यक आहे. त्याबाबत सतत जनजागृती होणं गरजेचं आहे. या संकटाने आर्थिक प्रश्न जसे निर्माण केले तसे मानसिक प्रश्न गंभीर केलेले आहेत. त्याकरता समुपदेशन आणि मार्गदर्शन काही डॉक्टर्स करत आहेत. आपल्यावरील हे असह्य ताण दूर होण्याचा एक मार्ग नाटक ही जिवंत कला पाहाणे हाही आहे. पहिली लाट ओसरल्यावर मराठी रंगभूमीवर काही लोकांनी सर्व काळजी घेऊन नाट्यप्रयोग केले. प्रायोगिक रंगभूमीवर केवळ २५/३० लोकांसमोर आम्ही काही लोकांनी अतिशय सुरक्षित आणि यशस्वीरीत्या प्रयोग केले. सभा, समारंभ, मंडई, हॉटेल अशा जागांपेक्षा ‘थिएटर’ ही अधिक सुरक्षित जागा आहे. याचा आम्ही अनुभव घेतला आहे.
आपणांस नम्र विनंती अशी की निदान ५० लोकांकरता छोट्या स्वरूपातील प्रयोग करायला आपण परवानगी द्यावीत. यामुळे समाजात मनस्वास्थ्य टिकायला नक्की मदत होईल.
कृपया आमच्या या रंगभूमीच्या प्रातिनिधिक पत्राचा आपण गंभीरपूर्वक विचार करावा ही विनंती.
करोनाविरुद्धच्या या संकटात आमची साथ होतीच आणि पुढेही असेलच.
कळावे,
आपले नम्र.
अतुल पेठे (पुणे), शंभू पाटील (जळगाव), वामन पंडित (कणकवली), दत्ता पाटील (नाशिक), अभिजित झुंजारराव (कल्याण), अनिल कोष्टी (भुसावळ)
आणि अनेक गावांतील रंगकर्मी.
१२ जुलै २०२१
अभिजीत झुंजारराव यांनी आशा व्यक्त केली आहे की लवकरच माननीय मुख्यमंत्री या पत्राची नोंद घेतील आणि नाट्यक्षेत्रासाठी योग्य असा निर्णय घोषित करतील.
1 Comment
खरंतर जबाबदार राज्यकर्त्यांशी या विषयावर पत्रव्यवहार करावा लागतो,हिच दुर्दैवाची गोष्ट आहे.असो.आतातरी त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा!