कोरोनाचा फैलाव वाढत गेल्यामुळे प्रत्येक नागरिक घाबरून गेला आहे. प्रत्येकाला आज स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याबद्दल काळजी वाटत आहे. सर्वत्र नैराश्याचे वातावरण असताना आणि हजारो मनःस्ताप असताना लोकांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत ते म्हणजे रंगभूमीवरील कलाकार! कधी प्रशांत दामले, प्रसाद ओक असे दिग्गज रंगकर्मी Facebook च्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी Live गप्पा मारत आहेत. तर कधी शिवानी रांगोळे तिच्या वाचनात आलेल्या कथा व कवितांचं Instagram वर वाचन करत आहे. काहींनी निवड केली आहे ती YouTube माध्यमाची!
डॉ. गिरीश ओक यांचे बहारदार चिवित्रांगण
डॉ. गिरीश ओक यांनी मात्र YouTube चा मार्ग अवलंबिला आहे. अग्गबाई सासूबाई, जुळून येती रेशीमगाठी अशा विविध कार्यक्रमातून दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या लाडक्या कलाकाराने Lockdown मध्येही त्यांच्या चाहत्यांची साथ सोडलेली नाही. डॉ. गिरीश ओक YouTube च्या “Chivitra” चॅनलवर त्यांनी स्वत: लिहिलेले काही लेख प्रेक्षकांना वाचून दाखवत आहेत. प्रत्येक गुरुवारी डॉ. त्यांच्या खुमासदार अभिवाचनाने परिपूर्ण असा एक एपिसोड YouTube च्या “Chivitra” चॅनलवर तुमच्या भेटीस आणणार आहेत. त्यांचे चाहते त्यांच्या या चिवित्रांगणाला भरभरून प्रेम देतील हे साहजिकच आहे. तरीही नवनवीन एपिसोड सहजगत्या मिळवण्यासाठी चिवित्रा चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.
आसक्त कलामंच प्रस्तुत दमदार नाटकं
प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी “आसक्त कलामंच” या संस्थेनेही YouTube चा मार्ग अवलंबिला आहे. पुण्याच्या या नावाजलेल्या नाट्यसंस्थेने आपल्या भेटीस काही दमदार नाटकं आणली आहेत. ही सर्व नाटकं आणि पुढे येऊ घातलेली नाटकं पाहण्यासाठी येथे क्लिक करा. राधिका आपटे, सागर देशमुख, प्रदीप वैद्य, आशिष मेहता, वरुण नार्वेकर, सारंग साठे, आणि ओंकार गोवर्धन असे बहुचर्चित अभिनेते या संस्थेचे माजी विद्यार्थी राहिलेले आहेत. २०१८ साली या संस्थेने पृथ्वी थिएटर मध्ये ४ नाटकं सादर करून दिमाखात १५ वा वाढदिवस साजरा केला. अशा या बहुगुणी कलाकारांनी संपन्न आणि सतत प्रयोगशील असणाऱ्या संस्थेची नाटकं तुम्ही नक्की पाहाल याबद्दल आम्हाला काहीच शंका नाही.
डॉ. गिरीश ओक अभिवाचित चिवित्रा आणि आसक्त कलामंच प्रस्तुत नाटकं या दोन्ही उपक्रमांना तुम्ही भरघोस प्रतिसाद द्याल अशी आम्हाला आशा आहे. तरीही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका.