Update 11/10/2022: मिरा-भाईंदरमध्ये नव्या नाट्यगृहाचे उद्घाटन — उद्घाटन सोहळ्यात वाद होऊनही कार्यक्रम यशस्वी
रंगभूमी आणि रंगभूमीवर सादर होणाऱ्या विविध कलाकृती यांचा आस्वाद घेण्यासाठी जास्तीत जास्त नाट्यगृहे बांधणं आणि त्यांचं योग्य संगोपन होणं हे खूप महत्वाचं आहे. रंगभूमी.com तर्फे आम्ही नाटकाबद्दल प्रेक्षकांशी संवाद साधतो तेव्हा कित्येकदा, “अमुक नाट्यगृह आमच्या घरापासून नजीक असल्यामुळे आम्ही आजवर नवीन जागा घेण्याचा विचारही केला नाही.”, अशाप्रकारच्या प्रतिक्रिया ऐकून पराकोटीचं समाधान मिळतं. मिरा-भाईंदर शहरातील रसिक प्रेक्षकांसाठीही आज आम्ही अशीच एक खुशखबर घेऊन आलो आहोत. गेले बरेच दिवस रखडलेल्या मिरा-भाईंदर महापालिकेच्या नाट्यगृहाच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त मिळाला आहे! २७ जुलै रोजी हे नाट्यगृह सुरू केले जाणार आहे.
Bharat Ratna Lata Mangeshkar Auditorium Mira Bhayandar
२०१५ साली उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या नाट्यगृहाचे भूमीपूजन करण्यात आले आणि येत्या २७ जुलै रोजी त्यांच्याच हस्ते या नाट्यगृहाचे उदघाटनही होणार आहे. आमदार प्रताप सरनाईक आणि आयुक्त दिलीप ढोले यांनी नाट्यगृहाच्या कामाची पाहणी करून नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले असून ते उद्घाटनासाठी सज्ज असल्याचे सरनाईक सांगितले आहे. गुरुवारी केलेल्या पाहणीमध्ये नाट्यगृहातील ध्वनी यंत्रणा व प्रकाश योजनेची पाहणी करण्यात आली, तसेच नाट्यगृहात ध्वनिचित्रफीतही सादर करून सर्व यंत्रणा सुस्थितीत आहेत, याची खात्री करण्यात आली. मध्यंतरी नाट्यक्षेत्रातील राजन भिसे, भरत जाधव, सुशांत शेलार व शरद पोंक्षे अशा काही नामवंत कलाकारांनी नाट्यगृहाला भेट देऊन काही सूचना केल्या होत्या, त्या सूचनांचीही अंमलबजावणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे नाट्यगृह टीडीआरच्या बदल्यात खासगी विकसकाकडून बांधून घेण्यात आले असल्यामुळे सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या या नाट्यगृहाच्या बांधणीसाठी महापालिकेचा एकही पैसा खर्च झालेला नाही.
MBMC Auditorium near Dahisar Check Naka
Mira Bhayander Natak Theatre
दहिसर चेकनाकाजवळ आणि प्रसाद इंटरनॅशनल हॉटेलच्या मागे हे नाट्यगृह वसलेले आहे. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली ते काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे यादरम्यान आजवर एकही नाट्यगृह नव्हते. त्यामुळे, मिरा-भाईंदर येथील या नव्या नाट्यगृहाच्या माध्यमातून घोडबंदर रोड पट्ट्यामधील तसेच मीरा-भाईंदर ते अगदी वसई-विरार पट्ट्यामधील प्रेक्षकांसाठी हे एक हक्काचे नाट्यगृह उपलब्ध होणार आहे.
MBMC Natak Theatre Details
एक लाख एक हजार चौ.फूट क्षेत्रामध्ये ही चार मजल्यांची वास्तू उभारण्यात आली आहे. पहिल्या व दुसऱ्या माळ्यावर मुख्य नाट्यगृह (Main Theatre) आणि लघु नाट्यगृह (Mini Theatre) तयार करण्यात आले आहे व तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर आर्ट गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य थिएटरमध्ये ९०० प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था आहे. तर लघुनाट्यगृहात ३०० आसनांची व्यवस्था करण्यात आल्याचे समजले आहे.
MBMC Auditorium Name
Free Press Journal च्या वृत्तानुसार शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेला (MBMC) प्रख्यात गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव सभागृहाला देण्याची मागणी केली आहे. सरनाईक यांनी आपल्या पत्रात येत्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये नामकरणाचा प्रस्ताव ठेवण्याची महापौरांना विनंती केली आहे. ७ जून, २०१९ रोजी सभागृहाला भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यासाठी मंजुरी देणारा ठराव यापूर्वीच सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. MBMC मध्ये असाही आदेश आहे की एकदा नाव दिल्यावर वास्तूचे नाव बदलता येत नाही.
“आम्हालाही लता दीदींना योग्य ती आदरांजली द्यायची आहे, पण आधीच नाव ठरवलेल्या सभागृहाचे नाव बदलणे हा आणखी एका महान व्यक्तिमत्त्वाचा अपमान होईल. त्याऐवजी, मी दिग्गज गायिका लता दीदींच्या स्मरणार्थ एक नवीन कलासंकुल बांधण्याचा प्रस्ताव मांडला आहे, जिथे आपण केवळ सांस्कृतिक आणि शास्त्रीय कार्यक्रमच नाही तर नवोदित गायकांसाठी आवश्यक तालमीची व्यवस्थादेखील करू शकतो.” असे सभागृह नेते प्रशांत दळवी (भाजप) म्हणाले.
MBMC Natyagruha Opening Date
नाट्यगृहाचे नाव लवकरच घोषित होईल व २७ जुलै रोजी एक दिमाखदार नाट्यगृह नाट्यरसिकांसाठी खुले होईल. तुम्ही या नाट्यगृहाला भेट द्यायला तयार असालच… आम्हीही आहोत! या नाट्यगृहाची रचना दाखवणारा, वास्तूचा आढावा घेणारा संक्षिप्त व्हिडिओ आम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आताच आमच्या YouTube चॅनेलला Subscribe करून ठेवा.