सध्या रंगभूमीवर बरीच नाटकं धुमाकूळ घालत आहेत. काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत तर काहींना प्रेक्षकांच्या टीकांचे वार सहन करावे लागत आहेत. प्रेक्षकांसाठी खुशखबर म्हणजे या यादीत लवकरच अजून काही नाटकं सामील होणार आहेत. व्यावसायिक रंगभूमीवर सातत्याने नवनवीन लेखन दिग्दर्शन पहायला मिळते. यंदाच्या वर्षीही काही नवीन तर काही गाजलेली जुनी नाटकं पुन्हा नव्याने व्यावसायिक रंगभूमीवर सादर होणार आहेत. इब्लिस, चारचौघी, करायचं प्रेम तर मनापासून, संभ्रम ही नाटकं लवकरच रंगभूमीवर दिसणार आहेत.
इब्लिस
अद्वैत थिएटरला यावर्षी १६ वर्ष पूर्ण झाली आणि लवकरच इब्लिस या नाटकाचे नव्याने प्रयोग होणार आहेत. या नाटकाचे लेखन दिग्दर्शन मिलिंद शिंत्रे यांनी केले असून निर्माते राहुल भंडारे आहेत. या नाटकातील इतर पात्र तेच असले तरी वैभव मांगले नसून ते पात्र पावनखिंडमधील बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका करणारे अजय पुरकर साकारणार आहेत. बुध्दीचा, धमक्यांचा रंगमंचावरील जीवघेणा खेळ नवीन स्वरूपात कसा पाहण्यात येईल याची सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
करायचं प्रेम तर मनापासून
प्रवेश निर्मित नवीन नाटक लवकरच रंगभूमीवर सादर होणार आहे. करायचं प्रेम तर मनापासून या नाटकाचे लेखन अरविंद औंधे यांनी केले आहे तर दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले आहे. या नाटकाचे सुत्रधार संतोष शिंदे आहेत. प्रेम ही न संपणारी कल्पना आहे. आता हे नाटक प्रेमातील नावीन्य पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण करणार आहे.
संभ्रम
रत्नाकर मतकरी यांचे लेखन, नाटक लोकप्रिय आहेच. लवकरच व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश आणि वरदा क्रिएशन्स घेऊन येत आहेत रत्नाकर मतकरी लिखित संभ्रम – असत्यात दडलेल सत्य की… नाटक. या नाटकाची निर्मिती आदिती राव यांनी केली आहे. विजय केंकरे यांनी दिग्दर्शन केले आहे. नेपथ्य संदेश बेंद्रे, प्रकशयोजना शीतल तळपदे, वेशभूषा मंगल केंकरे यांनी केले आहे. या नाटकाचे सूत्रधार संतोष शिदम आहेत. सध्याच्या रत्नाकर करंडक निमित्ताने रत्नाकर मतकरी यांच्या चाहत्यांची संख्या वाढली आहे. म्हणून या नाटकाला प्रेक्षक पसंती मिळेलच असे बोलणे वावग ठरणार नाही.
चारचौघी
१५ ऑगस्ट १९९१ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग पार पडून यावर्षी प्रशांत दळवी लिखित चारचौघी नाटकाला ३१ वर्ष पूर्ण झाली. या नाटकाने हजारहून अधिक प्रयोग करून इतिहास घडवला होता. या नाटकाच्या निर्मात्या लता नार्वेकरांना बंडखोर निर्माती अशी उपाधी मिळू लागली. हे नाटक ‘श्री चिंतामणी’ निर्मित होते. आता चारचौघी नाटक नव्या संचात घेऊन आले आहेत जिगिषा. या नाटकाची पात्र रचना जुनी असेल की नवीन ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. नुकत्याच मिळालेल्या वृत्तानुसार नवीन कलाकारांच्या संचातील मुक्ता बर्वे या अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे. भगिनीभाव असणारे हे नाटक पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी पहायला मिळेल अशी सदिच्छा. इतर नावांचा खुलासा होण्याकरिता प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा पाहावी लागेल.
लवकरच रंगभूमीवर धमाकेदार नवीन नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन होणार. या यादीत अजूनही काही नाटकं जोडली जाणार आणि या सगळ्याचे अपडेट्स आम्ही रंगभूमी.com द्वारे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार. त्यामुळे, आजच रंगभूमी.com ला Subscribe करा. सर्व निर्माते संस्थांना सदिच्छा आणि प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी सुरू होणार म्हणून त्यांचं अभिनंदन!