आपण आरशात पाहतो तेव्हा आपल्याला आपल्यासोबत सभोवतालच्या जगाचं प्रतिबिंब दिसतं. आरश्याच्या आवाक्यातील एकही गोष्ट त्याच्या प्रतिबिंबापासून लपत नाही. सगळं जसंच्या तसं दिसतं. एका ‘प्रतिबिंबाच्या’ स्वरूपात! लेखकाचंही असंच असतं. त्याचे विचार, त्याच्यावरील संस्कार आणि त्याच्या सभोवतालची परिस्थिती या सगळ्याचं प्रतिबिंब शब्दांच्या स्वरूपात कथा, कविता, गीताच्या माध्यमातून एखाद्या कागदावर, खडकावर आणि आजकाल मोबाईल फोनवरही उमटतं. अशाच काही प्रतिभावंत लेखकांच्या लेखणीचा सन्मान करत त्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देणारा, NCPA द्वारे आयोजित मराठी नाट्य उत्सव म्हणजे प्रतिबिंब २०२४!
NCPA Pratibimb 2024
यंदाचा उत्सव बऱ्याच कारणांसाठी महत्त्वाचा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दिलीप प्रभावळकर लिखित आणि नीरज शिरवईकर यांची रंगवृत्ती असलेलं, विजय केंकरे दिग्दर्शित नाटक ‘पत्रा पत्री’. या नाटकाचा शुभारंभ प्रतिबिंब उत्सवात करण्यात येणार आहे. महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट अशी की दिलीप प्रभावळकर या नाटकात अभिनयही करणार आहेत. त्यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरेही दिसणार आहेत.
शिल्पा कुमार यांच्या सहकार्याने, १७ ते १९ मे, २०२४ दरम्यान हा उत्सव NCPA च्या विवध रंगमंचांवर रंगणार आहे. नाटकांची तिकिटे NCPA च्या वेबसाईटवर तसेच BookMyShow वर उपलब्ध आहेत. तिकिटांच्या किंमती ₹२०० ते ₹१२०० च्या मधील आहेत. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन ओळखपत्र/कॉलेज आयडी दाखवून नाटकांच्या तिकिटांवर २०% विशेष सवलत मिळणार आहे.
या उत्सवाचं स्वरूप पुढीलप्रमाणे असणार आहे.
NCPA Pratibimb Marathi Natya Utsav 2024 — Program Schedule
- 17 May, 2024
- 7:30pm — Patra Patri
- 18 May, 2024
- 3:00pm — Dagad Aani Maati
- 4:00pm — Love is Haanikaarak
- 6:00pm — Kavi Jaato Tevha
- 8:00pm — Astitva
- 19 May, 2024
- 3:00pm — Golkonda Diamonds
- 5:00pm — Ghanta Ghanta Ghanta Ghanta Ghanta
- 7:00pm — Jar Tarchi Goshta
प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव २०२४ — रूपरेषा
पत्रा पत्री (भव्य शुभारंभ)
🗓️ १७ मे २०२४ • ⏰ सायं. ७:३० वाजता
दिलीप प्रभावळकर लिखित ‘पत्रा पत्री’ हे नाटक म्हणजे तात्यासाहेब आणि माधवराव या उतारवयाकडे झुकलेल्या दोन दोमधील खुसखुशीत गप्पा आहेत. त्यांच्या आठवणीतील काही गोड किस्से, दोघांच्या संपर्कात आलेल्या काही इरसाल व्यक्ती अशा सगळ्यांबद्दल खुमासदार गप्पा. मला खात्री आहे की दिलीप प्रभावळकर आणि विजय केंकरे असे दोन दिग्गज जेव्हा रंगमंचावर येतील तेव्हा पुढचे पावणे-दोन तास प्रेक्षक त्यांच्या सादरीकरणामध्ये हरवून जातील.
दगड आणि माती
🗓️ १८ मे २०२४ • ⏰ दुपारी ३:०० वाजता
२०२३ मध्ये भरपूर पारितोषिके जिंकलेल्या ‘कलगीतुरा’ या नाटकाची लेखक-दिग्दर्शक जोडी परत आलेली आहे. दत्ता पाटील लिखित आणि सचिन शिंदे दिग्दर्शित ‘दगड आणि माती’ हे १ तास ४० मिनिटांचे नाटक पहायला मिळणार आहे.
नाटकाची गोष्ट बाभूळगांवात सुरू होते. या गावात पाणी, रोजगार उपलब्ध नसला तरी मोबाईल मात्र पोहोचला आहे. गावातील त्यातल्या त्यात जास्त शिकलेला एक तरुण म्हणजे नाना! काहीसा आक्रमक आणि नेतृत्व करण्याचा स्वभाव असलेला नाना एका इंटरव्ह्यूसाठी जातो तेव्हा बाभुळगाव जगाच्या नकाशात कुठे आहे असे विचारले जाते. नकाशावर कुठेच बाभूळगाव न आढळल्याने त्याला नोकरी मिळत नाही. इथून नानाचा एक नवा प्रवास सुरू होतो. बाभूळगावचा इतिहास शोधून काढण्यासाठी! एक लढा सुरू होतो. गावाला ओळख मिळवून देण्यासाठी!
लव्ह इझ हानिकारक
🗓️ १८ मे २०२४ • ⏰ दुपारी ४:०० वाजता
दोन पात्रांमधील, अनेक दशकं मुरलेलं, गुंतागुंतीचं आणि अशांततेचं नातं या नाटकात दर्शविलं आहे. चपखल विनोद आणि नात्यातील बरकाव्यांचा हळूवार होणारा उलगडा प्रेक्षकांना नाटकभर असा काही खिळवून ठेवतात की प्रेक्षकांच्या मानवी जाणिवा जागरूक होतात.
कवी जातो तेव्हा
🗓️ १८ मे २०२४ • ⏰ सायं. ६:०० वाजता
‘अनुभव’ नामक मासिकात, डॉ. समीर कुलकर्णी यांचा ‘कवी जातो तेव्हा’ नावाचा एक लेख आला होता. त्याच लेखाच्या आधारावर या कार्यक्रमाची रचना करण्यात आलेली आहे. कवी ग्रेस यांचं खरं नाव माणिक सीताराम गोडघाटे होतं. कवी ग्रेसांचं काव्यसाहित्य गीतांच्या स्वरूपात या कार्यक्रमात ऐकायला मिळतं. कविता कशा वाचाव्यात? कविता कशा ऐकायला हव्यात? कविता कशा समजून घ्यायला हव्यात? एखाद्या भाषेचं किंवा साहित्याचं कवी ग्रेसांसारख्या महान साहित्यिकाला गमावल्यावर काय नुकसान होतं? आपण समाजातील कवींना खरंच आदरयुक्त वागणूक देतो का? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांवर ‘कवी जातो तेव्हा’ या कार्यक्रमात चर्चा करण्यात आली आहे. हा एकूणच मनाला तुष्टी देणारा असा मनोरंजक नाट्यप्रयोग ठरतो.
अस्तित्व
🗓️ १८ मे २०२४ • ⏰ सायं. ८:०० वाजता
‘अस्तित्व‘ नाटकाला यावर्षी बरेच पुरस्कार प्राप्त झालेत. भरत जाधव एंटरटेनमेंट निर्मित ‘अस्तित्व’ या नाटकासाठी ‘झी गौरव’ आणि ‘मटा सन्मान’चा सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार भरत जाधव यांना प्राप्त झाला. त्यासोबतच सर्वोत्कृष्ट नाटक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक — स्वप्नील फडके, सर्वोत्कृष्ट संगीत — साई पियुष यांनाही मटा सन्मान पुरस्कारांनी गौरविण्यात आले. याव्यतिरिक्त माझा पुरस्कार सोहळ्यातही ‘अस्तित्व’ नाटकाला गौरविण्यात आले. संतोष हासोळकर नावाच्या, नजीकच्या काळात निवृत्त होण्याच्या वाटेवर असणाऱ्या एका इसमाची व त्याच्या कुटुंबीयांची ही गोष्ट आहे. निवृत्त झाल्यावर नोकरदार म्हणून मिळालेलं घरही त्यांना सोडावं लागणार आहे. इतकी वर्षे एका घरात राहिल्यावर ते घर सोडून जाताना, घरातील प्रत्येकाच्याच मनाची जी काही घालमेल होतेय, ती या नाटकात आपल्याला पहायला मिळते.
Bharat Jadhav Interview about Astitva
गोलकोंडा डायमंड्स
🗓️ १९ मे २०२४ • ⏰ दुपारी ३:०० वाजता
एक आर्टिस्ट आणि एक आयटी प्रोफेशनल, असे दोघे, रेल्वेच्या प्रवासात असताना अचानक अशा एका गूढ ठिकाणी पोहोचले आहेत, जिथून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना सापडत नाहीये. या अकस्मात प्रवासात त्यांच्यामध्ये बऱ्याच मुद्द्यांवर नैतिक मतभेद होतात. ज्यातून, आजच्या पिढीला त्रासदायक अशा सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक समस्यांवर भाष्य होते.
घंटा घंटा घंटा घंटा घंटा
🗓️ १९ मे २०२४ • ⏰ सायं. ५:०० वाजता
ललित प्रभाकर आणि मल्लिका सिंग हंसपाल अभिनीत या नाटकाचा विषय थोडक्यात सांगायचा झालं तर, सरकार अचानक एके दिवशी असा नियम पास करतं की प्रत्येक नागरिक हा दिवसाला फक्त १४० शब्दच बोलू शकतो. आहे ना गंमत? एखादं जोडपं या अशा १४० शब्दांमध्ये कसे दिवस काढणार? ‘लेमन्स लेमन्स लेमन्स लेमन्स लेमन्स’ या सॅम स्टायनर लिखित मूळ इंग्रजी नाटकाचे मराठी अनुसर्जन निरंजन पेडणेकर या गुणवंत कलाकाराने केले आहे. नाटकाचं नेपथ्य आणि दिग्दर्शन मोहित टाकळकर यांचं आहे. झी नाट्य गौरव सोहळ्यात या नाटकाला, प्रायोगिक श्रेणीतील जवळपास सगळ्याच पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
Mohit Takalkar Interview about Ghanta Ghanta Ghanta Ghanta Ghanta
Niranjan Pednekar Interview about Ghanta Ghanta Ghanta Ghanta Ghanta
जर तरची गोष्ट
🗓️ १९ मे २०२४ • ⏰ सायं. ७:०० वाजता
समर आणि राधा यांच्या नात्यामध्ये काहीसा दुराव येतो. पण त्या दुराव्यामुळे ते दुरावले जातात का? याचाच शोध घेणारं हे आजच्या काळातलं नाटक. उमेश कामत आणि प्रिया बापट या आपल्या लाडक्या जोडीने या नाटकात समर व राधाची भूमिका साकारली आहे. तसेच, पल्लवी पाटील आणि आशुतोष गोखले यांनाही या नाटकासाठी गौरविण्यात आले.
Jar Tarchi Goshta Video
तर असा हा अभूतपूर्व तुम्हीही चुकवू नका आणि तुमच्या मित्रपपरिवारात किंवा आप्तेष्टांना निदान एके दिवशी तरी हजेरी लावण्यास प्रवृत्त करा.